Join us

Saffron Farming : कॅन्सर झाल्यावर व्यवसाय थांबवला अन् घराच्या छतावर सुरू केली यशस्वी 'केसर शेती'!

By दत्ता लवांडे | Updated: October 12, 2024 20:08 IST

पुण्यातील तळेगाव दाभाडे येथील गौतम राठोड यांनी आपल्या घराच्या छतावर केवळ १० फूट बाय १० फूट खोलीमध्ये ही शेती सुरू केली आहे.

पुणे: पुण्यातील तळेगाव दाभाडे येथे राहणाऱ्या गौतम राठोड यांनी आपल्या घराच्या छतावर केसर शेती फुलवली आहे. छतावरील केवळ १० बाय १० फुटाच्या जागेत त्यांनी हा यशस्वी प्रयोग केला असून आत्तापर्यंत त्यांनी अनेकांना केसर शेतीचे प्रशिक्षण दिले आहे. या शेतीमधून ते चांगला नफा कमावत आहेत.

तळेगाव येथे गौतम यांचा गॅरेजचा व्यवसाय होता. कुटुंब सांभाळून गॅरेजचा व्यवसाय सुरू असताना कोरोना काळात त्यांना आपल्याला किडनीचा कॅन्सर झाल्याचे कळाले. यानंतर त्यांनी लगेच ऑपरेशन केले, पण गॅरेजचा व्यवसाय बंद करून ऑफिसमध्ये बसून किंवा फ्रेश जागेत काहीतरी व्यवसाय करण्याचा सल्ला डॉक्टरांनी त्यांना दिला.

हॉस्पिटलमध्ये उपचार घेऊन त्यांनी काही काळ घरीच आराम केला. त्यानंतर त्यांनी केसर शेती सुरू करण्याचा निर्णय घेतला. पुढे पुण्यात केसर शेतीचे प्रशिक्षण घेऊन त्यांनी प्रत्यक्ष काश्मीर येथे जाऊन केसर शेती कशी केली जाते यासंदर्भातील माहिती घेतली आणि डिसेंबर २०२१ मध्ये त्यांनी आपल्या घराच्या छतावर केसर शेती सुरू केली.

छतावरील मोकळ्या जागेपैकी त्यांनी १० बाय १० फूट जागेवर एक रूम बांधली आणि त्यामध्ये कुलींग मशीन आणि रॅक बसवल्या. त्यांनी सुरूवातील २०० किलो केसरचे कंद आणून शेती करण्यास सुरूवात केली आणि त्यामधून यशस्वी उत्पादनही घेतले. कंदाची लागवड केल्यापासून केवळ २ महिन्यात कंदाला फुले येण्यास सुरूवात होते आणि पुढील २ महिने कंदापासून केसर काढता येऊ शकते.

विक्रीबाजारात मिळणारे केसर हे अनेकदा भेसळ केलेले असते. बाजारात १६० रूपये ग्रॅमपासून १ हजार ६०० रूपये ग्रॅमपर्यंत केसर विकत मिळते. पण गौतम यांच्याकडून थेट ग्राहक केसरची खरेदी करतात. त्यामुळे ग्राहकांना फ्रेश आणि खात्रीशीर केसर मिळते. तर साधारण ५०० ते ७०० रूपये ग्रॅमप्रमाणे या केसरची विक्री गौतम यांच्याकडून केली जाते.

उत्पन्नएका वेळी गौतम हे सरासरी ४०० ग्रॅम केसरचे उत्पादन घेतात. ओळखीच्याच ग्राहकांना विक्री करून यातून ते अडीच लाखांचे उत्पन्न मिळवतात. या चार महिन्यात साधारण ५० हजार रूपयांचे लाईट बील वगळले तर त्यांना २ लाखांचे निव्वळ उत्पन्न या केसर शेतीतून मिळते.  

प्रशिक्षण आणि संधीत्यांनी आत्तापर्यंत ६० ते ६५ लोकांना केसर शेतीचे प्रशिक्षण दिले आहे. त्याचबरोबर भारतात जवळपास ७० टक्के केसर आयात केले जाते. त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना केसर शेतीमध्ये खूप संधी असल्याचं गौतम सांगतात. येणाऱ्या काळात ग्राहकांना फ्रेश आणि खात्रीशीर केसर विक्री करणारे शेतकरी फायद्यात राहतील असंही ते सांगतात.

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीपुणे