Lokmat Agro >लै भारी > जावलीचे साहेबराव घेता आहेत ज्वारीचे १०१ क्विंटल पर्यंत उत्पादन

जावलीचे साहेबराव घेता आहेत ज्वारीचे १०१ क्विंटल पर्यंत उत्पादन

Sahebrao from Jawali satara is taking 101 quintal production of jowar | जावलीचे साहेबराव घेता आहेत ज्वारीचे १०१ क्विंटल पर्यंत उत्पादन

जावलीचे साहेबराव घेता आहेत ज्वारीचे १०१ क्विंटल पर्यंत उत्पादन

सातारा जिल्ह्यातील जावली तालुक्यातील सोनगाव गावचे श्री. साहेबराव मन्याबा चिकणे हे त्यापैकीच एक शेतकरी. श्री. चिकणे हे आपली दोन मुले संदीप आणि सचिन यांच्या मदतीने आपली १२ एकर जमीन पिकवत आहेत. यांची ज्वारी पिकातील कामगिरी.

सातारा जिल्ह्यातील जावली तालुक्यातील सोनगाव गावचे श्री. साहेबराव मन्याबा चिकणे हे त्यापैकीच एक शेतकरी. श्री. चिकणे हे आपली दोन मुले संदीप आणि सचिन यांच्या मदतीने आपली १२ एकर जमीन पिकवत आहेत. यांची ज्वारी पिकातील कामगिरी.

शेअर :

Join us
Join usNext

सातारा जिल्ह्यातील दुर्गम भागातील अनेक शेतकरी आपल्या कष्टाच्या जोरावर आपल्या उत्पादनात वाढ करून थेट राज्यस्तरीय पुरस्कार मिळवून आपल्याबरोबर सातारा जिल्ह्याचेही नाव प्रसिद्धीस आणत आहेत. जावली तालुक्यातील सोनगाव गावचे श्री. साहेबराव मन्याबा चिकणे हे त्यापैकीच एक शेतकरी. श्री. चिकणे हे आपली दोन मुले संदीप आणि सचिन यांच्या मदतीने आपली १२ एकर जमीन पिकवत आहेत. सुरवातीला सिंचनाची सुविधा नसल्याने ते जिरायती शेती करत होते. परंतु शेतीमधून अपेक्षित उत्पादन येत नव्हते. ही परिस्थिती बदलण्यासाठी त्यांनी मुलांच्या मदतीने २००५ साली विहीर खोदली आणि स्वताचे क्षेत्र ओलिताखाली आणणेसाठी १००० फुट पाईपलाईन करून जमीन सपाटीकरण करून घेतले. यामध्ये प्रामुख्याने भात, ऊस, रब्बी, ज्वारी, हरभरा, गहू अशी पिके घेत होते.

बागायताची सुविधा झाल्यावर आधुनिक तंत्रज्ञान वापरून त्यांनी पीक पद्धतीत बदल करून अधिक उत्पादनाचे उद्दिष्ट ठेवले. हे साध्य करण्यासाठी त्यांनी कृषि विज्ञान केंद्र, बोरगाव येथील शास्त्रज्ञ व जावलीचे कृषि अधिकारी यांच्याशी संपर्क केला. त्यातूनच त्यांना ज्वारीच्या बागायत वाण फुले रेवतीची माहिती तसेच प्रमाणित बियाणे उपलब्धता झाली. जमिनीच्या प्रकारानुसार योग्य वाणाची निवड, बीजप्रक्रिया, खतांची संतुलित मात्रा, कीड व रोगांची ओळख व वेळेवर नियंत्रण या एकत्रित प्रयत्नामुळे ज्वारीचे विक्रमी १०१ क्विटल प्रति हेक्टरी उत्पादन घेणे शक्य झाले. यामुळेच सन २०२० मध्ये रब्बी ज्वारी पीक स्पर्धेमध्ये राज्यस्तरीय प्रथम क्रमांक मिळाला.

तसेच सन २०२१ मध्ये खरीप भात राज्यस्तरीय पीक स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळविला. अशा रीतीने प्रथम वर्षी ज्वारी व द्वितीय वर्षी भात या दोन्ही पिकांमध्ये विक्रमी उत्पादन घेऊन राज्यामध्ये सातारा जिल्ह्याचे नाव उज्वल केले. याबद्दल महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. प्रशांतकुमार पाटील यांनी शेतकऱ्याचा गौरव करुन कृषि विद्यापिठातील शास्त्रज्ञांना शेतकऱ्याने वापरलेले तंत्रज्ञान अभ्यास करणेसाठी सुचना केली. तसेच विद्यापीठाच्या शेतकरी आयडॉलसाठी श्री. साहेबराव चिकणे यांची यशोगाथा प्रसिद्ध करण्यात आली.

रब्बी ज्वारी लागवड तंत्रज्ञानातील त्यांनी राबविलेले महत्वाचे मुद्दे
वाण
फुले रेवती, बियाणे ४ किलो प्रति एकरी
जमिनीची पूर्वमशागत
ट्रॅक्टरच्या साहयाने एकवेळ खोल नांगरट, एकवेळ फणपाळी, एकवेळ रोटर मारला.
बिजप्रक्रिया
रासायनिक बिज प्रक्रिया: ४ किलो बियाण्यास विटावॅक्स १० ग्रॅम आणि गाऊचो १० मिली या औषधांची पेरणीच्या आदल्या दिवशी बियाण्यास बिज प्रक्रिया केली.
जैविक बिज प्रक्रिया : पेरणी दिवशी सकाळी ४ किलो ज्वारीच्या बियाण्यास अॅझेटोबॅक्टर १०० ग्रॅम, स्फुरद विरघळणारे जिवाणू १०० ग्रॅम पावडर १०० मिली पाण्यात २५ ग्रॅम गुळ टाकून द्रावण तयार केले व याची बियाण्यास बिज प्रक्रिया केली. बियाणे सावलीमध्ये एक तास सुकवले व त्यानंतर लगेच पेरणीसाठी वापरले.
लागवड पध्दती
४५ बाय २० सेमी वर बैलाच्या दोन चाडी पाभरीने पेरणी केली. (तिफणीने) या पाभरीने खत व बियाणे एकत्र पेरणी केली.
खताचा वापर
पेरणीकरता प्रति एकरी खालीलप्रमाणे खते दिली शेणखत ५ बैलगाड्या, निंबोळी पेंड १०० किलो, १०:२६:२६ खत १५० किलो, सिलिकॉन ५ किलो, फेरस सल्फेट ८ किलो, झिंक सल्फेट ८ किलो, मॅग्नेशियम सल्फेट ५ किलो, हयुमिक अँसिड ग्रॅन्युअल १० किलो, फर्टेरा ४ किलो (वरील सर्व खते पेरणीवेळी दिली.) तीस दिवसांनी एकरी ५० किलो युरीया देवून पाणी दिले.
तण नियंत्रण
पेरणी नंतर लगेच अॅट्राझिन या तणनाशकाची जमिनीवर फवारणी केली. एक कोळपणी व एक खुरपणी केली.
किड व रोग नियंत्रणाच्या उपाययोजना
पेरणी नंतर पंधरा दिवसानी पंधरा लिटर पाण्यात ३० मिली क्लोरीपायरीफॉस मिसळून फवारणी केली. पेरणीनंतर तीस दिवसानी ईमामेक्टीन ८ ग्रॅम अधिक डायथेन एम ४५ तीस ग्रॅम १५ लीटर पाण्यात मिसळून फवारणी केली.
उत्पादन वाढीसाठी केलेल्या विशेष उपाय योजना/वापरलेले नाविन्यपुर्ण तंत्रज्ञान
१) विरळणी : पेरणीनंतर एकविस दिवसांनी खुरपनी वेळी विरळणी करून घेतली दाट झालेली रोपे उपटून दोन रोपात वीस सेंटीमीटर अंतर ठेवले.
२) जिवामृत वापर : पाण्याच्या पाळी बरोबर तीस दिवसांनी एकदा व पंचेचाळीस दिवसांनी एकदा असे दोन वेळा जिवामृत प्रत्येक वेळी २०० लि. जिवामृत पाण्याच्या पाळीबरोबर पिकाला दिली.
३) विद्राव्य खतांची फवारणी :
- पेरणीनंतर एकवीस दिवसांनी १९:१९:१९ हे १५ लि. पाण्यात १०० ग्रॅम या प्रमाणात फवारणी घेतली.
- पेरणीनंतर तीस दिवसांनी कॅल्शियम नायट्रेट १५ लि. पाण्यात शंभर ग्रॅम या प्रमाणात फवारणी घेतली.
- पेरणीनंतर चाळीस दिवसांनी ०:५२:३४ हे १५ लि. पाण्यात शंभर ग्रॅम एकरी अधिक सुक्ष्म अन्नद्रव्य १५ ग्रॅम एकरी २५० ग्रॅम या प्रमाणात फवारणी केली.
- पेरणीनंतर साठ दिवसांनी १३:०:४५ हे १५ लि. पाण्यात शंभर ग्रॅम अधिक सिलीकॉन पंधरा ग्रॅम या प्रमाणात फवारणी घेतली.
उत्पादन
पीक स्पर्धा कापणी प्लॉटमधील एकूण उत्पादन (कापणीवेळी) १०१ किलो १० ग्रॅम आले. एका एकर मधील उत्पादन ४०.४ क्विंटल उत्पादन निघाले.

डॉ. महेश बाबर, श्री.संग्राम पाटील आणि श्री. साहेबराव चिकणे
कृषि विज्ञान केंद्र, बोरगांव, ता. जि. सातारा

Web Title: Sahebrao from Jawali satara is taking 101 quintal production of jowar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.