शेतीत राम नाही म्हणून अनेकांनी गावची नाळ तोडून शहरांचा रस्ता धरला. घरात दोन भाऊ असतील तर एक शेतीत अन् दुसरा शहरात असा प्रघात गेली अनेक वर्षे सातारा जिल्ह्यात सुरू आहे. पण शेतात घाम गाळणाऱ्या एका दिलदार लहान भावाने मुंबईत आयुष्यभर राबून शेतीसाठी मदत करणाऱ्या भावाला चारचाकी गाडी घेऊन देण्याचे स्वप्न पाहिले होते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आले पिकाच्या आंदोलनामुळे ते शक्य झाले. संघटनेच्या कार्यकर्त्यांना सोबत घेत त्यांनी हा आनंदाचा क्षण अनुभवला.
मुंबईत राहून गावाकडे शेतीत राबणाऱ्या भावाला मदत करणाऱ्यांपैकी खटाव तालुक्यातील भोसरे गावातील जाधव कुटुंब या कुटुंबात दिनकर जाधव आणि भीमराव जाधव हे दोघे सख्खे भाऊ. दिनकर जाधव मुंबईत नोकरीसाठी गेले आणि भीमराव शेतीत राहिले. शेतीत काहीच गुजराण होईना म्हणून मग त्यांनी वाहन चालविण्याची नोकरी केली; पण गाडी चालविताना इतर भागांतील सोन्यासारखी शेती बघून भीमरावांचा जीव तळमळायचा.
काय होईल ते आपल्या शेतीत करू म्हणून निश्चय करून त्यांनी गावाकडची शेती करायचा निर्णय घेतला; पण शेतीसाठी भांडवलाची कमतरता. यासाठी मोठे बंधू दिनकर जाधव यांनी भीमरावला कायम मदत केली. आपल्या भावावर आणि त्याच्या कष्टावर त्यांचा विश्वास होता. त्यामुळे त्यांनी भीमरावला लागेल ती मदत केली.
मोठ्या भावाची मदत कोणत्या ना कोणत्या स्वरूपात परतफेड करू, असे स्वप्न भीमरावने बघितले होते; पण अनेक वर्षे राबून त्याचे हे स्वप्न पूर्ण होत नव्हते. कधी दुष्काळ, तर कधी पिकाला दरच मिळत नसल्याने शेतीतून कुटुंब जगविण्यापेक्षा फार उत्पन मिळत नव्हते. यावर्षी भीमरावांनी केलेल्या अडीच एकर क्षेत्रात आले पीक डोलत होते; पण व्यापाऱ्यांनी नव्या जुन्या आल्याचे दर वेगळे पाडल्यामुळे यावर्षीही आल्यातून फार पैसे मिळतील असे वाटले नाही. त्यामुळे भीमराव जाधव नाराज झाले होते.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकत्यांनी व्यापाऱ्यांची ही मुजोरी मोडून काढली आणि एकाच दराने दोन्ही आले खरेदी करता आले. बेभरवशाची शेती असली तरी भावावर विश्वास ठेवून आयुष्यभर शेतीसाठी मदत करणाऱ्या मोठ्या भावासाठी चारचाकी गाडी घेऊन देण्याचे भीमरावांचे स्वप्न पूर्ण होण्याची परिस्थिती दिसू लागली आणि त्यांनी निश्चयाने ही स्वप्नपूर्ती केली देखील. पण, ज्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेमुळे आले पिकाला दर मिळाला. त्या सर्व कार्यकर्त्यांसोबतच गाडीच्या चाव्या मोठ्या भावाला देण्याचा हट्ट भिमरावांनी धरला आणि सर्वांच्या सोबतच गाडीच्या चाव्या मोठा भाऊ नको म्हणत असतानाही त्यांच्या हातात दिल्या. जाधव कुटुंबीयांसह सर्व शेतकरी या प्रसंगाने हेलावून गेले.
आले ginger पिकाला मिळाला चांगला दर- एका गाडीला ६५ हजार रुपये दर- १ गाडी म्हणजे ५०० किलो आले- खोडवा वेगळा काढून व्यापारी देणार होते ४० हजारांचा दर- एका गाडीला होणार होते २५ हजारांचे नुकसान- १०० गाड्या आले विकणाऱ्यांना २५ लाखांचा नफा.
दिपक शिंदेसंपादक, लोकमत सातारा