- गोपाल लाजुरकर
गडचिरोली : 'चंदन' हे नाव ऐकताच कुख्यात तस्कर वीरप्पन आठवतो. कर्नाटकच्या जंगलात आढळणाऱ्या ह्या चंदन झाडांचे (Sandalwood Farming ) रोप लागवडीचा प्रयोग चामोर्शी तालुक्याच्या चपराळा अभयारण्यातही करण्यात आला होता; परंतु तो फसला. जिल्ह्यात १० वर्षांपूर्वी कोणीतरी आपल्या शेतात चंदनाची लागवड करेल, हे नवलच होते; परंतु चंदनाची वनशेती (Forest Farming) करण्याचा यशस्वी प्रयोग अहेरी तालुक्याच्या महागाव (बुद्रुक) चे डॉ. तिरुपती कुर्मदास करमे यांनी करून दाखविला.
वडिलोपार्जित ५ एकर शेतात डॉ. करमे यांनी चंदनाची १ हजार ७०० रोपटी लावली. त्यापैकी १ हजार ३०० रोपटी सध्या सुस्थितीत आहेत. धान, कापूस, सोयाबीन या पारंपरिक पिकांभोवती पिंगा न घालता फळशेती, वनशेतीला पसंती दर्शविली जात आहे. अशाच पद्धतीने महागाव (बु.) येथील बीएएमएस पदवीधारक डॉ. तिरुपती करमे यांनी २०१५ मध्ये गोंदिया येथील एका कंपनीकडून १ फूट उंचीची चंदनाची रोपे प्रतिरोप २०० रुपये प्रमाणे मागविली.
दरम्यान मृग नक्षत्रात गावालगतच्या पाच एकर शेतीवर १० बाय १० या अंतरावर एकूण १ हजार ७०० रोपट्यांची लागवड केली. सध्या यापैकी काही रोपे नष्ट झाली असली, तरी १ हजार ३०० रोपटी २० ते ३० फुटांपर्यंत उंच वाढलेली आहेत. यात केवळ ६० झाडे सफेद चंदनाची आहेत, उर्वरित सर्वच झाडे लाल चंदनाची आहेत. आता त्यांच्या बागेला नऊ वर्षांचा कालावधी पूर्ण झालेला आहे.
मोसंबीचे आंतरपीक डॉ. करमे यांनी चंदनाच्या वनशेतीत मोसंबीची ८०० रोपटी लावलेली आहेत. याशिवाय ऋतुमानानुसार सर्व प्रकारची फळे उपलब्ध व्हावीत यासाठी त्यांनी काजू, आवळा, लिंबू, रामफळ, सीताफळ, आंबा, अॅपल बोर आदी प्रजातींची फळझाडेसुद्धा लावलेली आहेत.
वाटिकेवर सीसीटीव्हींची नजर करमे यांनी आपल्या चंदन रोपवाटिकेवर पाचही एकर क्षेत्र कव्हर होईल, याप्रमाणे सीसीटीव्ही कॅमेरे बसविलेले आहेत. मोबाइल, संगणकाशी हे कॅमेरे संलग्न आहेत. अशाप्रकारे ते त्यावर देखरेख ठेवतात. तसेच चंदन रोप लागवडीसोबतच डॉ. करमे यांनी दुसऱ्या एकर क्षेत्रापैकी ४ एकरात नीलगिरीच्या ४ ५ हजार रोपट्यांची लागवड केली आहे.
खते, पाणी व्यवस्थापन चंदनाच्या रोपट्यांची लागवड करतानाच करमे यांनी ठिबक सिंचन लावले. उन्हाळ्यात या झाडांना पाणी द्यावे लागते. याशिवाय फवारणी, खतेसुद्धा ते देत असतात. चंदन रोपटे लागवडीदरम्यान जवळपास ५ लाखांचा खर्च त्यांना आला. कुक्कुटपालन, सालगड्यासाठी घर बांधकामासह आतापर्यंत संपूर्ण २० लाखांचा खर्च त्यांनी केलेला आहे.
सध्या चंदनाचा भाव ६ ते ७ हजार रुपये प्रतिकिलो आहे. ८- १० वर्षांनंतर सध्याचा दर कायम राहिला तरी प्रत्येक झाडातून ५ लाखांचे उत्पादन अपेक्षित आहे. - डॉ. तिरुपती करमे