Join us

सरलाताईंनी निवडली वेगळी वाट; साडेतीन लाखात ड्रॅगन फ्रूटची लागवड, १५ लाखांचे उत्पन्न

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2023 10:15 AM

ड्रॅगन फ्रूटची लागवड केली अन् नशीब फळफळले

वर्षानुवर्षे कांदा आणि टोमॅटो लागवडीतून कर्जाच्या खाईत जात होतो. मार्ग सुचत नव्हते. मात्र, काही तरी वेगळे करायचे मनात होते. अन् एक दिवस अचानक दूरचित्रवाणी वाहिनीवर ड्रॅगन फ्रूटच्या शेतीबाबत माहिती मिळाली व ड्रॅगन फ्रूटची लागवड केली अन् नशीब फळफळले. ही गोड कहाणी आहे तालुक्यातील रायते येथील सरलाताई चव्हाण यांची.

चार वर्षांपूर्वी दूरचित्रवाहिनीवर ड्रॅगन फ्रूटविषयी माहिती दिली जात होती. सरलाताईंनी पतीसोबत माहिती ऐकली अन् त्याचवेळी ड्रॅगन फ्रूटची शेती करण्याचा निर्णय घेतला. चव्हाण कुटुंब गेली २५-३० वर्षांपासून कांदा, टोमॅटो, मका, सोयाबीन ही पारंपरिक पिके घेते. मात्र, पदरात काहीच पडत नव्हते. मात्र, 'ड्रॅगन फ्रूट' हा जादुई दिवा सापडला आणि सरलाताईंचे नशीबच पालटले. चव्हाण दाम्पत्याने प्रथम दोन एकरांवर कर्ज काढून ड्रॅगन फ्रूटची शेती केली. आता चार एकर क्षेत्रात लागवड केली आहे. यातून चव्हाण कुटुंब कर्जमुक्त झाले आहे. या वर्षीपासून रोपवाटिका तयार केली आहे. इतर राज्यांच्या तुलनेत अर्ध्या किमतीत रोपे उपलब्ध करून देत आहेत. त्यातूनही लाखो रुपये उत्पन्न मिळत आहे.

ड्रॅगन फ्रुटला हेल्दी फळ म्हणून मागणी आहे. सुरुवातीला खर्च येतो. मात्र, नंतर अत्यल्प खर्चात मोठे उत्पन्न मिळते. मार्गदर्शन मोफत करतो. रोज किमान २५ ते ३० जण माहिती घेण्यासाठी येतातच.- सरला चव्हाण,शेतकरी, रायते (ता. येवला)

टॅग्स :शेतकरीशेती क्षेत्रलागवड, मशागत