Join us

साताऱ्यातील अलवडीने लोकसहभागातून अशी केली दुष्काळावर मात; श्रमदान अन् CSR फंडाची मदत

By दत्ता लवांडे | Published: February 19, 2024 5:32 PM

लोकसहभागातून सोडवला पाण्याचा प्रश्न

सातारा : सातारा जिल्ह्यातील अनेक गावे दुष्काळी आहेत. त्यातच तालुक्यातील अलवडी या गावात चांगला पर्जन्यमान असूनही गाव डोंगरउतारावर असल्याने पाणीटंचाई ही नित्याचीच. शेतीसाठी शाश्वत पाणी नसल्याने शेतकऱ्यांना केवळ खरीप हंगामातील पिके घेता येत होती. पण रब्बीच्या पिकासाठी गावात पाणीच नसायचे. गावाची पाणीटंचाई दूर करण्यासाठी गावकरी प्रयत्न करायचे, पण यावर कायमची मात करण्याचं येथील गावकऱ्यांनी ठरवलं आणि गावापासून जवळपास दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या डोंगरामधील नैसर्गिक स्त्रोतातून पाणी शिवारात आणलं. लोकसहभागातून आणि सीएसआर फंडातून एखादं काम कसं पूर्णत्वास न्यायचं अन् विकासाच्या वाटा कशा शोधायच्या हे येथील ग्रामस्थांकडून शिकण्यासारखं आहे.

 लोकसहभागातून कोणतंही काम अशक्य नसल्याचं येथील ग्रामस्थांनी दाखवून दिलं आहे. येथील पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी सामाजिक दायित्व निधीतून (सीएसआर फंड) परांजपे ऑटोकास्ट कंपनीने सिमेंट बंधारा आणि पाइपलाइनसाठी निधी उपलब्ध करून दिला. त्याचबरोबर या कंपनीच्या जवळपास ६० कर्मचाऱ्यांनीसुद्धा या कामासाठी श्रमदान केले आहे.

दरम्यान, साताऱ्यातील अनेक गावांप्रमाणेच कास परिसरातही मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. येथे जरी जास्त पाऊस पडत असला तरी डोंगरउतारामुळे पावसाचे पाणी थेट नदीला जाऊन मिळते. पाणी जमिनीत मुरण्याचे प्रमाण कमी असल्यामुळे पावसाळ्यात पडणाऱ्या पावसाचा जास्त फायदा या परिसराला होताना दिसत नाही. त्यामुळे उंचावर असलेल्या वाड्या,वस्त्यांना उन्हाळ्यात येथील नागरिकांनी पाणीटंचाईला तोंड द्यावे लागते. तर लोकसहभागातून अलवडी या गावात पाईपलाईनने पाणी पोहचवणे आणि सिमेंट बंधारे बांधण्याचे काम पूर्णत्वास गेले आहे.

हे पाणी दोन किलोमीटर अंतरावरून गावात आणण्यात आले असून यासाठी आवश्यक पाईपलाईनचे सर्व साहित्य तसेच सिमेंट बंधारा बांधण्यासाठी लागणारे सर्व साहित्य परांजपे कंपनीमार्फत आलवडी ग्रामपंचायातीस पुरवण्यात आले आहे. तर आता हे पाणी शेतीसाठी वर्षभर उपलब्ध झाल्याने गावातील शेतीला लागणाऱ्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे. आता रब्बीच्या पिकांसाठी आणि उन्हाळी पिकांसाठी शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध होऊन उत्पन्नात वाढ होण्यास मदत होणार आहे. 

इतर दुष्काळी गावांनी घ्यावा बोधमहाराष्ट्रातील अनेक गावे दुष्काळी असून तिथे शाश्वत पाणी आणि सिंचन योजनेची अत्यंत आवश्यकता आहे. तर तेथली ग्रामस्थांनी किंवा ग्रामपंचायतीने लोकसहभाग आणि खासगी कंपन्यांच्या सामाजिक दायित्वातून अशी कामे उभी केली पाहिजेत. ज्यामुळे पायाभूत सुविधा निर्माण होऊन ग्रामविकासाच्या कामाला चालना मिळते.

विविध गावांमध्ये जलसंवर्धनाचे कामखासगी कंपन्यांच्या सीएसआर फंडातून अनेक गावांनी फायदा करून घेतला आहे. त्यामध्ये परांजपे ऑटोकास्ट कंपनीच्या माध्यमातून झगलवाडी, पवारवाडी, अनभुलवाडी, तळिये, विखळे, गारवडी, जयपूर, पळशी आदी गावांमध्ये जलसंधारणाची कामे झाली आहेत. त्यांच्या या प्रयत्नामुळे आणि गावकऱ्यांच्या लोकसहभागामुळे गावातील पाणी टंचाईची समस्या दूर होण्यास मदत झाली. त्याचबरोबर सातारा व शिरवळ परिसरात शिक्षण व ग्रामविकासाच्या प्रश्नांवर काम सुरू आहे. 

आमच्या गावाचा पाण्याचा प्रश्न लोकसहभागातून आणि परांजपे परांजपे ऑटोकास्ट प्रा. लि. कंपनीच्या आर्थिक सहकार्यामुळे आता मार्गी लागला आहे. कंपनीच्या जवळपास ६० पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांनी यावेळी श्रमदान केले. त्यांनी अर्ध्या किलोमीटर अंतरापर्यंतचे ४ इंची पाईप डोंगरामध्ये नेऊन अंथरले आहेत.- धोंडीबा कळंबे (सरपंच, अलवडी, सातारा)

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीपाणी