गजानन माेहाेड
अमरावती : मेळघाटात सकस अन् सत्त्वयुक्त आहार देणारे व 'छोटा अनाज' म्हणून ओळखले जाणारे कोदो, कुटकी, रागी, सावा, राडा व बाजरा दशकात कमी व्हायला लागले. या पिकांची जागा सोयाबीन, कपाशी, मका आदी पिकांनी घेतली अन् परिणामस्वरूप कुपोषणाने डोके वर काढले. हे लक्षात येताच जिजीबाईंनी देशी बियाण्यांच्या महत्त्वाविषयी जागर सुरू केला आहे.
जागृती स्वयंसाहाय्यता बचत गट तयार करून त्यांनी अन्य महिलांचे सहकार्य घेत सीड बैंक तयार केली. आज त्यांची ओळख 'सीडमदर' म्हणून होऊ लागली आहे.
मेळघाटमधील धारणी तालुक्यात दिदम्दा गावातील जिजीबाई छोटेलाल मावस्कर या अल्पभूधारक शेतकरी, कुटुंबात पती, मुलगा शेतीच करतात. या भागातील शेतीमध्ये आदिवासी बांधव परपंरागत पेरणी करीत असलेल्या कडधान्याऐवजी सोयाबीन मका, कपाशीचे क्षेत्र वाढले, आहारात कडधान्यांचा समावेश कमी व्हायला लागला व त्याचा परिणाम दिसायला लागला.
गर्भवती महिलांसह चिमुकल्यांना पोषकतत्त्व कमी मिळाल्याचे लागल्याचे परिणाम त्यांच्या आरोग्यावर दिसू लागले. मेळघाटातील कोरकू आदिवासी बांधवांचे परंपरागत धान्य कुटकी, रागी, सावा, राडा व बाजरा, याद्वारे त्यांना पुरेसे पोषकतत्त्व मिळतात.
त्यामुळे सेंद्रिय कडधान्याचे महत्त्व त्यांना कारितास इंडियाच्या माध्यमातून कळले व त्यांनी या धान्याची जपवणूक करण्याचा संकल्प केला, शिवाय या धान्याची सीड बँक तयार करून त्यांनी आदिवासी शेतकऱ्यांना याची महती पटवून दिली. त्यामुळे जिजीबाई या मेळघाटप्रमाणे जिल्ह्यातील अन्य शेतकऱ्यांसाठी प्रेरक ठरल्या आहेत.
'ओरिसा'मधील शेतकऱ्यांना ऑनलाइन धडे
जिजीबाईंनी दिल्ली येथील एका परिषदेत कुटकी, रागी, सावा, राडा व बाजरा या धान्याचे महत्त्व पटवून दिले. ओरिसा येथील शेतकऱ्यांना 'मिलेट' शेतीचे दोन दिवस ऑनलाइन धडे दिले, येथील आकाशवाणीद्वारे त्यांनी उपस्थितांना मिलेटचे महत्त्व पटवून दिले.
अजित पवारांनी विधानसभेत उचलला मुद्दा
विरोधी पक्षनेता असताना अजित पवारांनी या गावाला भेट दिली होती, त्यावेळी जिजीबाईंनी 'मिलेट अनाज'चे महत्व त्यांना पटवून दिले. मेळघाटातील कुपोषणमुक्तीसाठी मिलेट्चे महत्त्व पवार यांच्या लक्षात आल्याने त्यांनी हा मुद्दा विधानसभेत मांडला होता. रेशन दुकानातून कुटकी, रागी, सावा, राडा व बाजरा आदी धान्य मिळायला पाहिजे, अशी मागणी विधानसभेत केली होती, असे जिजीबाईनी सांगितले.