सहदेव खोत
पुनवत : सागाव (ता. शिराळा) येथील प्रगतशील शेतकरी चंद्रकांत बाबासो पाटील यांनी ढोलेवाडी रस्त्यालगत असणाऱ्या दहा गुंठे शेतीत पॉलिहाऊस उभा केले आहे.
याठिकाणी त्यांनी सीडलेस काकडीचे पीक घेतले आहे. दहा गुंठ्यामध्ये अडीच टन काकडीचे उत्पन्न मिळेल, असा अंदाज चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे.
सध्या त्यांना दररोज १०० किलोवर काकडीचा तोडा होत असून दरही प्रतिकिलो ६० ते ७० रुपये मिळत आहे.
शेतकरी चंद्रकांत पाटील यांनी ढोलेवाडी येथील शेतात एक वर्षांपूर्वी पॉलिहाऊस उभारले आहे. त्यामध्ये गतवर्षी जरबेरा फुलांची शेती केली होती.
त्यानंतर या पॉलिहाऊसमध्ये फेब्रुवारी महिन्यात पाटील यांनी सागर पाटील, कृषी सल्लागार संतोष कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सीडलेस काकडीचे केयुके ९ एस हे बियाणे आणून त्यापासून दोन हजार रोपे तयार केली.
पंधरा दिवसानंतर या रोपांची लागण पॉलिहाऊसमध्ये पाडलेल्या सरीमध्ये करण्यात आली. त्यानंतर तार व जाळी बांधून पीक संगोपन केले. महिन्याचा कालावधी उलटल्यानंतर काकडीचे उत्पन्न सुरू झाले आहे.
सध्या या काकडी पिकापासून पाटील यांना दररोज १०० किलोच्या आसपास उत्पन्न मिळत आहे. ही काकडी ते मुंबई बाजारपेठेत पाठवत आहेत. या काकडीला त्यांना किलोमागे ६० ते ७० रुपयेचा दर मिळत आहे.
सीडलेस काकडीची वैशिष्ट्ये
- गडद हिरवा रंग.
- चवीला सरस रुंद पान.
- बियांचे प्रमाण नगण्य.
- आठ दिवसापर्यंत टिकाऊ.
- अनेक रुग्णांसाठी फायदेशीर.
- हॉटेल व्यवसाय, सलाड, ज्यूस व इतर पदार्थांसाठी उपयुक्त.
या हंगामात अडीच टन काकडीचे उत्पन्न मिळण्याचा अंदाज आहे. उत्पादन खर्च वजा जाता दहा गुंठे शेतीत या काकडीपासून दोन महिन्यात लाखांवर नफा मिळणार आहे. या काकडीचे पीक व्यापारी तत्वावर घेतले आहे. या काकडीत नगण्य बिया असतात म्हणून याला सीडलेस काकडी म्हणतात. योग्य संगोपणामुळे सीडलेस काकडीचा जिल्ह्यातील हा वेगळा प्रयोग यशस्वी झाला आहे. - चंद्रकांत पाटील, प्रगतशील शेतकरी सागाव, ता. शिराळा
अधिक वाचा: जम्मू काश्मीरचं सफरचंद पिकतंय कोल्हापूरच्या मातीत; यळगूडचे शेतकरी अनिल यांचा प्रयोग यशस्वी