बेरिंग, पेंडळ यांच्या सह तयार केलेले एक यंत्र घेऊन गावागावात शेतकर्यांच्या वाड्या वस्त्यांवर जात अल्प किंमतीत पशुधनाला लागणारे कासरे अर्थात चरठ बनवून देत जातेगाव टेंभी तालुका वैजापुर जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथील अण्णाभाऊ बत्तीसे यांनी स्वयंरोजगार निर्माण केला आहे.
रोजगार नसल्याने गावाच्या पारांवार गप्पा मारत बसलेल्या तर काही अंशी व्यसनाच्या वाटेवर गेलेल्या तरुणाईला अण्णाभाऊ म्हणजे एक चपराकच आहे. वयाच्या पन्नाशी ओलांडली असतांना देखील गावागावांत दिवसभर वाड्या वस्त्यांवर जात, वापरात नसलेल्या जुन्या साड्या, लुगडे यांच्या पासून अवघ्या काही क्षणात कासरे बनवून देत बत्तीसे यांनी आपल्या उदारनिर्वाहच्या प्रश्नावर मात केली आहे.
बत्तीसे यांच्या कुटुंबाचा वडीलोपार्जित चरठ बनविण्याचा व्यवसाय. पूर्वी केकतड, ताग, सुत आदींपासून ते चरठ बनवत. मात्र काळानुसार कच्चा माल मिळत नसल्याने आता ते शेतवस्तीवर जाऊन त्या कुटुंबाच्या वापरात नसलेली जुनी साडी, लुगडे, यांच्या पासून अवघ्या काही क्षणात कासरे बनवून देतात.
शेतकरी बांधवांना गुरंढोरं बांधण्यासाठी, शेतशिवाराच्या इतर कामासाठी सतत चरठाची गरज असते. अशावेळी बत्तीसे हे घरोपोहच येऊन अल्प दरात कासरे करून देत असल्याने शेतकरी घरातील साडी, लुगडे यापासून आवर्जून कासरे बनवून घेतात.
काळानुसार बदल करावा लागतो..
पूर्वी ताग, केकतड मोठ्या प्रमाणात असायची. मात्र आता मिळत नाही त्यामुळे काळानुसार बदल करावा लागला. साडी, लुगडे यापासून देखील मजबूत कासरे तयार होत असल्याने शेतकरी आवर्जून तयार करून घेतात.
लहानपण गेले यात..
पूर्वी वडील कासरे तयार करायचे तेव्हा बघून बघून शिकलो. शाळा नव्हती तेव्हा त्यामुळे कमी वयात काम करायला लागल्याने आता घरी बसून रहावं वाटतं नाही. गावोगावी फिरून दिवसभराचा नोकरदार सारखा रोज मिळतो यातून त्यामुळे आज ही आवडीने कासरे बनवून देतो. - अण्णाभाऊ बत्तीसे.
हेही वाचा - मराठवाड्याच्या पैठण तालुक्यातील विजयराव; आषाढात कमवत आहे 'या' शेतीतून महिना लाख रुपये