आनंद इंगोले
रेशीम कार्यालयाच्या सहकार्याने त्यांच्या मार्गदर्शनात रेशीम उद्योग सुरू करून शेतकरीशेतीउत्पन्न वाढवीत आहे. ज्यात वर्धा जिल्ह्यातील कुरझडी येथील अल्पभूधारक शेतकरी प्रमोद रघाटाटे यांनी देखील पारंपरिक शेतीला फाटा देऊन रेशीम उद्योगाची कास धरली आहे. या रेशीम उद्योगातून पहिल्या वर्षातच १ लाख ८४ हजार रुपयांचे उत्पन्न झाल्याचे ही रघाटाटे सांगतात.
प्रमोद वसंतराव रघाटाटे हे कपाशी, सोयाबीन, चना, तसेच थोडाफार भाजीपाला आदी पिकांची शेती करत होते. मात्र त्यात मिळणारा भाव व येणारा खर्च यांचा ताळमेळ बसत नव्हता. अशातच गावातीलच रेशीम शेती करणारे शेतकरी वृषभ रेवतकर यांच्या कडून रघाटाटे यांना रेशीम शेती उद्योग कसा व त्यातून हमखास मिळणाऱ्या उत्पन्नाच्या हमीबाबत माहिती मिळाली.
त्यानंतर रघाटाटे यांनी सन २०२३-२४ या वर्षाकरिता फेब्रुवारी-२०२३ मध्ये एका एकरात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत तुती लागवड केली. तसेच मे-२०२३ मध्ये स्वखर्चानेच पक्के कीटक संगोपनगृह बांधले आणि त्यात जुलैमध्ये १०० अंडीपुंजाची पहिली बॅच घेतली.
या पहिल्या बॅचमध्ये ३२ हजार रुपयांचे उत्पन्न रघाटाटे यांना मिळाले. त्यानंतर दुसऱ्या बॅचला २२ हजार, तसेच तिसऱ्या बॅचला ६८ हजार व चौथ्या बॅचला भर उन्हाळ्यामध्ये शेडला बारदाने लावून वरून ड्रीपची नळी टाकून तापमान आर्द्रता मेंटेंन करून ६२ हजारांचे उत्पन्न रघाटाटे यांनी घेतले, असे वर्षभरात १ लाख ८४ हजार रुपयांचे उत्पन्न प्रमोद रघाटाटे यांना रेशीम शेतीतून मिळाले आहे.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून पहिल्याच वर्षी शेड बांधकामाचे, तुती लागवडीची मजुरी, कीटक संगोपनाचे साहित्य या सर्व बाबींवर त्यांना आजपावेतो २ लक्ष ५ हजार ३९२ रुपये पहिल्याच वर्षी अनुदान मिळाले आहे. रेशीम कार्यालयाचे अधिकारीसुद्धा मार्गदर्शन करीत असल्यामुळे चांगले उत्पन्न मिळाले. - प्रमोद रघाटाटे, शेतकरी.
वीस दिवसांत पैसा हाती येतो
रेशीम शेतीमध्ये तुतीच्या पाल्यावरच सर्व काही अवलंबून असल्याने पाला चांगला कसदार असणे आवश्यक आहे. ज्यासाठी वेळोवेळी शेणखताचा वापर रघाटाटे करतात. तुती बागेची मशागत, झाडांची छाटणी वेळेत होत असल्याने बॅच कोशावस्थेत गेल्यावर लवकर पाला तयार होऊन पुढील बॅच लवकर घेता येणे शक्य होते. पाल्याची प्रत चांगली असल्यामुळे कीटक संगोपनात विशेष काळजी घ्यावी लागत नाही. कीटक संगोपनासाठी १० दिवसांची तयार अळी ज्याला चॉकी म्हणतात. ती घेत असल्याने संगोपनाचा कालावधी ३० दिवसांवरून फक्त २० दिवसांवर आल्यामुळे २० दिवसांत कोष विक्री करून पैसा हाती येत असल्याचे रघाटाटे सांगतात.