Sericulture success story : पैठण तालुक्यातील दुष्काळी असलेल्या देवगाव येथील उच्चशिक्षण घेतलेल्या तरूणांनी रेशीम शेतीतून क्रांती घडवलीये. केवळ एका एकरावरील रेशीम शेतीतून या दोन बंधूंनी चांगले आर्थिक उत्पन्न कमावले असून कुटुंबाचा कायपालट केला आहे. केवळ रेशीम शेतीच्या जीवावर लाखोंचे कर्ज फेडू शकल्याचे ते आज अभिमानाने सांगतात.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील देवगाव हे दुष्काळी गाव. येथे पारंपारिक कापूस, तूर, सोयाबीन, ज्वारी, हरभरा अशी पिके घेतली जातात. पण मागील काही वर्षांपासून देवगाव रेशीम शेतकऱ्यांचे गाव म्हणून ओळखले जाऊ लागले आहे. प्रयोगशील शेतकरी दीपक जोशी यांच्या मार्गदर्शनाने येथील शेतकऱ्यांनी रेशीम शेतीमध्ये क्रांती करून देवगावचे नाव राज्याच्या नकाशावर झळकवले आहे.
श्याम आणि कृष्णा खंड हे येथीलच दोन उच्चशिक्षित तरूण. श्याम याने एम.ए. पूर्ण केले असून रामटेक विद्यापीठातून बी.एड संस्कृतचे शिक्षण घेत आहे. तर कृष्णा याचे पदवीचे शिक्षण सुरू आहे.
विशेष म्हणजे श्यामने आळंदी येथून वारकरी सांप्रदायाचे शिक्षण पूर्ण केले आणि त्यानंतर पूर्णवेळ शेती करण्याचा निर्णय घेतला. दुष्काळी भागात केवळ एक ते सव्वाएकर क्षेत्रात काय पीक घ्यावे? हा मोठा यक्षप्रश्न त्यांच्यासमोर होता. पण रेशीम शेती हा उत्तम पर्याय म्हणून त्यांच्यापुढे उभा राहिला.
मागील वर्षीपासून त्यांनी रेशीम शेतीला सुरूवात केली. १५ जुलै २०२३ रोजी तुतीची लागवड केली आणि रेशीम कोषातून चांगले उत्पन्न घ्यायला सुरूवात केली. पण काळाने घात केला आणि आठ महिन्यापूर्वी या दोघाही भावांचे पितृछत्र हरपले.
वडीलांच्या निधनानंतर या दोघांवर घरची सगळी जबाबदारी पडली. त्यामुळे दोघांनीही नेटाने कामाला सुरूवात केली. पहिल्या वेळेस गावातील सरपंच योगेश कोठुळे यांच्या शेडमध्ये १०० अंडीपुंजीची पहिली बॅच काढली. पहिल्या बॅचमधून त्यांना ४० हजाराचे उत्पन्न झाले. त्याच पैशातून त्यांनी शेडची उभारणी केली आणि स्वतःच्या शेडमध्ये बॅच घ्यायला सुरूवात केली.
एका बॅचसाठी आणि तुतीच्या वाढीसाठी असा एकूण ६५ ते ७० दिवसांचा कालावधी लागतो. श्याम आणि कृष्णा यांनी आत्तापर्यंत रेशीमच्या पाच बॅच पूर्ण केल्या असून सहाव्या बॅचची तयारी सुरू आहे. प्रत्येक बॅचमधून त्यांना सरासरी ६० हजारांचे उत्पन्न मिळाले आहे. दुष्काळी भागातील पीक पद्धतीला फाटा देऊन त्यांना रेशीमच्या माध्यमातून उत्पन्नाचा एक शाश्वत स्त्रोत निर्माण केला आहे.
रोजगार निर्मिती
रेशीम शेतीच्या माध्यमातून कृष्णा आणि श्याम या दोघांनाही रोजगाराची निर्मिती झाली आहे. त्यांची आई सुरूवातीला शेतात काम करायची पण तुतीची लागवड केल्यामुळे ती गावातच मजुरीसाठी जाते. आईच्या रोजंदारीचाही घरी हातभार लागतो. रेशीममुळे गावात चांगल्या रोजगाराची निर्मिती झाली आहे.
रोजगार हमी योजनेचा लाभ
तुती लागवडीसाठी या दोन भावांनी रोजगार हमी योजनेचा लाभ घेतला आहे. या योजनेतून शेड बांधणी, तुती लागवड आणि रेशीम कोषाच्या निर्मितीसाठी पुढील तीन वर्षे रोजगार मिळतो. तर रेशीम विक्रीतून मिळालेला नफा हा शेतकऱ्यांसाठी बोनस ठरतो. यामुळे खऱ्या अर्थाने रेशीम शेती आणि रोजगार हमी योजनेतून फायदा झाला आहे.
योग्य मार्गदर्शन
रेशीम शेतीसाठी त्यांना जिल्हा रेशीम अधिकारी डेंगळे सर, तालुका समन्वयक अभिमान हाके याबरोबरच गावातीलच प्रयोगशील रेशीम उत्पादक शेतकरी शहादेव ढाकणे आणि सदाशिव गिते यांचे मार्गदर्शन लाभले. त्याबरोबरच गावचे सरपंच योगेश कोठुळे आणि रोजगार सेवक मदन बोंद्रे यांच्याकडून रोजगार हमी योजनेचा लाभ घेण्यासाठी मार्गदर्शन लाभले.