गजानन गंगावणे
रेशीम विभाग, कृषी विभागाचे मार्गदर्शन आणि परिश्रम घेण्याची तयारी या बळावर वाशिम तालुक्यातील टो येथील अल्पभूधारक शेतकरी माधव भिवाजी बोरकर यांनी दोन एकरात रेशीम शेतीचा प्रयोग यशस्वी करीत ४.५० लाखांचा निव्वळ नफा मिळविला आहे.
माधव बोरकर यांच्याकडे केवळ दोन एकर शेती आहे. त्यांनी आपला भाऊ शिवाजी बोरकर यांच्याकडून प्रेरणा घेत कमी गुंतवणुकीत अधिक मिळकत हे तत्त्व अंगीकारून रेशीम उद्योग सुरू केला. याकामी त्यांना वाशिम जिल्हा रेशीम विकास अधिकारी सुनील फडके यांचे मार्गदर्शन लाभले.
ज्यातून माधव यांनी आपल्या दोन एकर शेतीत तुती लागवड केली. तसेच रेशीम कीटक संगोपणसाठी याच जमिनीवर २० बाय ५० फुटांचे शेड तयार करून रेशीम उद्योग सुरू केला. दोन महिन्याला एक बॅच याप्रमाणे ते आता वर्षभरात ५ रेशीम कोष बॅच घेतात. ज्यातून त्यांना चांगला आर्थिक नफा मिळत असून यामुळे त्यांच्या या रेशीम उद्योगाला इतर शेतकरी देखील भेट देत आहे.
२०० अंडीपूजची एका बॅच
एका २०० अंडीपूजच्या बॅच मधून १७० किलो कोष (रेशीम) मिळते. एक एकराच्या तुतीच्या पाल्यावर २०० अंडीपूज जोपासली जातात. २८ ते ३० दिवसात १७० किलो रेशीम उत्पादन होत असून, भाव ६० हजार रुपये क्विंटल प्रमाणे मिळतो. वातावरणातील बदल व रेशीम दरातील चढउतार लक्षात घेता वर्षाकाठी खर्च वजा जाता रेशीम शेतीतून तीन लाखांचा निव्वळ नफा मिळतो. यावरच समाधान न मानता शेतात शेड तयार करून चॉकी सेंटर व बालकीटक संगोपन केंद्र उभारले. यामधून वर्षभरात खर्च वजा जाता दीड लाख रुपये निव्वळ नफा मिळतो, असे माधव बोरकर सांगतात.
रेशीम शेतीने आर्थिक प्रगतीची नवी दिशा मिळते. शेतकऱ्यांनी केवळ पारंपरिक शेती व्यवसायावर अवलंबून न राहता पूरक जोडधंदा करावा. - माधव बोरकर प्रयोगशील शेतकरी, टो.