नाशिक जिल्ह्याच्या नांदगाव तालुक्यातील जामदरी येथील महेश कैलासराव शेवाळे यांनी शिक्षण पूर्ण केल्यावर बँकिंग क्षेत्रासाठी अनेकदा प्रयन्त करूनही अपयश आले. मात्र यात खचून न जाता त्यांनी शेतीची वाट धरली. ज्यात पारंपरिक शेतीला फाटा देत रेशीम शेतीची निवड करत आधुनिक प्रयोग केला आणि आज या रेशीम शेतीतून महेश चांगली आर्थिक प्रगती साधत आहे.
रेशीम शेती करण्याचा निश्चय केल्यावर महेश यांनी घरच्या ५ लाखांच्या स्वखर्चातून रेशीम किटकांसाठी ५० बाय ३० फुट शेड उभारले. ज्यात लोखंडी रॅक तयार केले. तर सोबतच ३१ मार्च २०२१ रोजी रेशीम शेती करिता २ एकर क्षेत्रावर पट्टा पद्धतीने ४ बाय ८ बाय १.६ अशा अंतरावर तुती लागवड केली. ज्यास प्रवाही पाटपाणी देत सोबत उच्च गुणवत्तापूर्ण तुती पाला मिळण्यासाठी एकरी एक बॅग डीएपी, २५ किलो युरिया ते देतात.
वडीलोपार्जित कांदा, मका, पिकांसह काहीअंशी कपाशी पिकाची असलेली नऊ एकर शेती आता तुती आणि रेशीम शेतीत वर्ग झाली आहे. अल्प कष्टाची अन् हमखास उत्पन्नाची रेशीम शेती इतर पिकांच्या तुलनेत अधिक फायद्याची असल्याचे महेश आवर्जून सांगतात.
वार्षिक 'असे' चालते बॅचचे नियोजन
१५० बाल्य किटकांची (चॉकी) खरेदी करून त्यांचे २० ते २३ दिवस संगोपन करत रेशीम कोष उत्पादन घेतले जाते. दरम्यान अळीच्या अवस्थेनुसार एक, दोन, तीन वेळेस तुती पाला त्यांना खाण्यास दिला जातो. ज्यात सहा ते सात फीडिंगवर या अळी मोड (शरीर अवस्था) बदलतात ज्यात शेवटच्या चौथ्या मोल्डला चंद्रिका पसरविली जाते ज्यात अळी रेशीम कोष तयार करते. त्यानंतर मजुरांच्या सहाय्याने हे रेशीम कोष वेचून जालना येथील रेशीम बाजारात विकले जातात. अशा प्रकारे शेवाळे रेशीमच्या वार्षिक ८ बॅच घेतात.
प्रति बॅच किती खर्च, किती नफा
चॉकी खरेदी (प्रवास खर्चासहीत), निर्जंतुकीकरण, शेवटच्या मोल्डला पाला पुरविण्यासाठी अधिकचे मजूर, कोष वेचणीसाठी मजूर, रेशीम कोषची जालना येथे विक्री करण्यासाठी येणारा प्रवास खर्च आदी सर्व खर्च लक्षात घेता एका बॅच करिता १६ ते १८ हजारांचा खर्च होतो. तर १५० अंडीपुंज मधून उत्पादित होणाऱ्या सरासरी १५० ते १७० किलो रेशीम कोषला ४५० ते ६०० दरांनुसार मिळणाऱ्या रक्कमेतून खर्च वजा केल्यास प्रति बॅच ४५ ते ५५ हजारांचा नफा शिल्लक राहत असल्याचे महेश सांगतात.
अल्प मजूरी, अल्प वेळ, आणि हमखास नफा
रेशीम शेतीत कमी वेळेत तसेच परिवाराच्या सर्व सदस्यांच्या सहकार्याने हमखास नफा मिळतो. तसेच रेशीम शेती ही पारंपरिक कांदा, कपाशी, मका आदी पिकांना सरस आहे. - महेश कैलासराव शेवाळे.