Join us

Sericulture Success Story : रेशीम शेतीने दिले नवे जीवन; मराठवाड्याचा शेतकरी म्हणतोय रेशीम दैवी वरदान

By रविंद्र जाधव | Updated: December 11, 2024 11:57 IST

Sericulture Success Story : शेतकऱ्यांना विविध अंगी फायदेशीर ठरणारी रेशीम शेती दैवी वरदानच आहे, असं सांगत आहेत वाल्हा (ता. बदनापूर) येथील विजय शेळके.

पारंपरिक शेतीत कितीही कष्ट केले तरी निसर्गाच्या साथीने चांगला शेतमाल येतो त्यावर्षी बाजारात त्या शेतमालाला दर मिळत नाही. याउलट ज्या वर्षी शेतमाला दर असतो, तेव्हा मात्र शेतावर अवकाळी दुष्काळी संकट येतात आणि हाती अगदी कवडीमोल पीक येते. अशावेळी शेतकऱ्यांना विविध अंगी फायदेशीर ठरणारी रेशीम शेती दैवी वरदानच आहे, असं सांगत आहेत वाल्हा (ता. बदनापूर) येथील विजय शेळके.

जालना जिल्ह्यातील अवघ्या बाराशे लोकसंख्येचे गाव असलेल्या मराठवाड्याच्या दुष्काळी पट्ट्यातील वाल्हा (ता. बदनापूर) येथील विजय साहेबराव शेळके यांना वडिलोपार्जित साडेतीन एकर क्षेत्र आहे. ज्यात कपाशी, मका, ज्वारी, गहू, बाजरी अशी पारंपरिक पिके घेतली जातात. मात्र घरातील सर्व सदस्य वर्षभर राबून देखील किमान मेहनतीची मजुरीही हाती लागत नसल्याने विजय पारंपरिक शेतीला त्रस्त झाले होते.

दरम्यान २०१७ साली जालना जिल्ह्यात रेशीम शेती अभियान सुरू झाले ज्यात मनरेगा अंतर्गत विजय यांनी व्हि१ तुतीची एक एकर क्षेत्रावर लागवड केली. सोबत रेशीम किटकांच्या संगोपणासाठी २२ बाय ५० फूट अंतराचे एक शेड उभारले आणि सुरू केली रेशीम शेती.

असे आहे वार्षिक नियोजन 

विजय यांनी आपल्या शेतात एक एकर क्षेत्रावर ५ फुट बाय ३ फुट बाय २ फुट या अंतरावर पट्टा पद्धतीने तुती लागवड केली आहे. ज्याद्वारे १०० अंडीपुंजच्या वार्षिक चार बॅच घेतल्या जातात. सरासरी ११० ते १२० किलो रेशीम कोष या बॅच मधून मिळतो. या कोषाची पुढे जालना बाजारपेठात विक्री होते.

कुटुंबाची साथ ठरतेय फायद्याची

तुती कापणी, कीटकांना पाला पुरविणे, वेळोवेळी आद्रता समतोल ठेवण्यासाठी विजय यांना पत्नी रुखमिनी, मुलगा पवन, मुलगी भाग्यश्री यांची मोलाची साथ लाभते. 

घर, गाडी ते मुलांचे शिक्षण .. 

२०१७ पासून रेशीम शेती करत असतांना रेशीम मधून चांगले वार्षिक उत्पन्न मिळाले. प्रवाही शेतीत असलेल्या अडचणी रेशीम मध्ये नसल्याने एकसंथ उत्पन्न मिळाल्याने ज्या बळावर आज घर, दुचाकी गाडी ते मुलांचे शिक्षण असे सर्व काही साध्य झाले आहे. - विजय साहेबराव शेळके, वाल्हा ता. बदनापुर जि. जालना. 

हेही वाचा :  Sericulture Success Story : मराठवाड्यातील गावे होताहेत रेशीमग्राम; रेशमाच्या धाग्यांनी शेकडो शेतकरी अर्थसंपन्न

टॅग्स :रेशीमशेतीशेतकरीशेतीजालनाबाजार