Join us

Sericulture Success Story : मराठवाड्यातील गावे होताहेत रेशीमग्राम; रेशमाच्या धाग्यांनी शेकडो शेतकरी अर्थसंपन्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2024 21:46 IST

Reshim Sheti Success Story : नवरा अन् बायको. एकूण तू आणि ती, अर्थातच 'तुती' लागवड दोघांच्या हाताला एखाद्या उद्योगाप्रमाणे 'रोजगार' अन् हमखास 'नगदी उत्पन्न मिळवून देणारी शेती. यातून हाती पडलेल्या रेशीम कोषांनी शेकडो कुटुंबांच्या अर्थकारणाला सांधत, चांगलेच बळ दिले आहे.

बालाजी आडसूळ

नवरा अन् बायको. एकूण तू आणि ती, अर्थातच 'तुती' लागवड दोघांच्या हाताला एखाद्या उद्योगाप्रमाणे 'रोजगार' अन् हमखास 'नगदी उत्पन्न मिळवून देणारी शेती. यातून हाती पडलेल्या रेशीम कोषांनी शेकडो कुटुंबांच्या अर्थकारणाला सांधत, चांगलेच बळ दिले आहे. पुढेही यास 'आकांक्षित' जिल्ह्यात रेशीम शेतीला प्रशासनाने अधिक बळ देण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

दुष्काळी, शेतकरी आत्महत्याग्रस्त अशा दप्तरी शिक्का पडलेल्या अन् केंद्रीय निती आयोगाच्या लेखी 'आकांक्षित' असलेल्या धाराशिव जिल्ह्यात व यातही कळंब, भूम व वाशी तालुक्यांत रेशीम शेतीने अर्थकारण खुलवलेल्या अनेक यशकथा दृष्टिपथात येतात.

मनरेगाची जोड मिळाल्यापासून तर या शेतीला अधिक शाश्वत स्वरूप आले आहे. त्यातही सध्या बाजारात चांगला उठाव असल्याने रेशीम उत्पादक शेतकऱ्यांना खरोखरच 'अच्छे दिन' आले आहेत. असे असले तरी अधिक क्षेत्रवृद्धी होण्यासाठी प्रशासनाचे आणखी बळ मिळायला हवं.

मनरेगाची जोड ठरली अजोड...

महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेची जोड भेटल्याने रेशीम शेतीला अधिकच बळ मिळाले आहे. एकराला तीन वर्षात आता ४ लाख १८ हजारांचे अनुदान देय आहे. एकूणच वर्षाकाठी सव्वा-दीड लाखाचा शासकीय आधार भेटतो. यात पुन्हा पहिल्या वर्षी दोन, दुसऱ्या वर्षी चार ते सहा, तिसऱ्या वर्षी पाच ते सात पिके घेऊन अर्थकारण अधिक सावरत असल्याचे पालक तांत्रिक अधिकारी संदीप पवार म्हणाले.

रेशीम शेतीची वैशिष्ट्ये

■ अल्प गुंतवणुकीत उत्कृष्ट कृषी जोडधंदा■ कमी पैशात नगदी उत्पन्न देणारी शेती■ एकदा लागवड, पंधरा-वीस वर्षे उत्पादन■ कीटकनाशक किंवा तत्सम खर्चाची बचत■ घरच्याघरी, घरातील कर्त्यांना रोजगार संधी■ मासिक वेतनाप्रमाणे दरमहा कमाईचा स्त्रोत■ कमी कालावधीत कष्टाचे मोल

तिथं पिकतं, तिथं विकत का नाही...

यापूर्वी कर्नाटकातील बाजारपेठ शेतकऱ्यांना गाठावी लागत होती. आता राज्यात जालना व बीड बाजारपेठेत अनेकांचे पाय ओढले जात आहेत. याशिवाय पूर्णा, बारामती, जयसिंगपूर येथे बाजारपेठ आहे. मात्र, ज्या जिल्ह्यात व तालुक्यात मोठ्या प्रमाणात रेशीम उत्पादन होते अशा धाराशिवच्या कळंब येथे तिथेच बाजारपेठ नाही, हे दुर्दैव आहे, असे बापू नहाणे यांनी सांगितले.

तालुकानिहाय क्षेत्र

तालुका रेशीम क्षेत्र (मनरेगा/एकर)
कळंब४९३
भूम३०६
वाशी२७२
धाराशिव८४
तुळजापूर३९
परंडा२४
उमरगा
लोहारा८ 

देश, राज्य, जिल्हा अन् तालुक्यात...

जगात रेशीम उत्पादनात चीननंतर दुसरा क्रमांक भारताचा. मलबरी, टसर, ओक, मुगा अशा सर्वच प्रकारच्या रेशीमचे उत्पादन करणारा भारत एकमेव देश, देशात कर्नाटक, आंध्र, आसाम, तामिळनाडू, बंगाल, झारखंड अशा टॉप टेन राज्यात महाराष्ट्र सातव्या स्थानी. राज्यात मराठवाडा विभाग अन् विभागात तसेच राज्यात पहिला व दुसरा क्रमांक बीड अन् धाराशिव जिल्ह्याचा. धाराशिव जिल्ह्यात कळंब अग्रस्थानी.

शेकडो कुटुंबाचा प्रपंच साधला जातोय

जिल्हा रेशीम कार्यालय विस्तारासाठी महारेशीम अभियान राबवत आहे. यानुसार जिल्ह्यात क्षेत्राची वृद्धी होतेय. सध्या एकूण १२५ गावे रेशीम ग्राम आहेत. कळंब तालुक्यात निपाणी, जवळा, देवधानोरा, इटकूर येथील अनेक शेतकयांनी झोकून दिले आहे. जवळपास एक हजार कुटुंबांना रेशीम शेतीने एखाद्या नोकरदाराप्रमाणे हमखास उत्पन्नाची जोड दिली आहे. पुढील महिन्यात आणखी विशेष कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याचे जिल्हा रेशीम अधिकारी आरती वाकुरे यांनी सांगितले.

ईन मिन तीन : इथंही आकांक्षित...

तुती लागवड अन् रे रेशीम शेतीला वाव तर आकांक्षित अशा धाराशिव जिल्ह्यात अनेक कुटुंबीयांचे आर्थिक बळ सक्षम होईल. मात्र, याचा विस्तार करण्याची जबाबदारी असलेल्या रेशीम कार्यालयात सध्या मनुष्यबळाचा 'दुष्काळ' आहे. एक अधिकारी व दोन क्षेत्रीय अधिकारी, तितकेच मनरेगाचे पालक तांत्रिक अधिकारी असा तोकडा स्टाफ आहे. यामुळे मस्टर, एमबी, इस्टिमेट, फिल्ड व्हिजिट, प्रचार व प्रसार या संदर्भात उपलब्ध मनुष्यबळ अपुरे ठरत असल्याने शासनाने येथे पूरक मनुष्यबळ पुरवावे, अशी मागणी आदर्श शेतकरी बापू नहाणे यांनी केली.

हेही वाचा : Farmer Success Story : सरकारी योजनेचा मिळाला आधार; गणेशरावांनी केली आर्थिक विषमतेवर मात

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीशेतीरेशीमशेतीधाराशिवमराठवाडा