Join us

पीएच.डी झालेले शैलेश एकात्मिक शेतीतून बनले कृषि उद्योजक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2023 11:19 AM

पीएच.डी. करून संशोधन केल्याने ओणी येथील युवक शैलेश सुभाष शिंदे-देसाई यांनी अल्पावधीतच कृषी उद्योजकाचे स्वप्न साकारले आहे. वडिलोपार्जित जमिनीत शेती, शेतमाल प्रक्रिया तसेच संलग्न कुक्कुटपालन, शेळ्या पालन, दुग्धोत्पादन व्यवसाय वृद्धिंगत केला आहे.

'कृषी उद्यमशीलता' विषयात पीएच.डी. करून संशोधन केल्याने ओणी येथील युवक शैलेश सुभाष शिंदे-देसाई यांनी अल्पावधीतच कृषी उद्योजकाचे स्वप्न साकारले आहे. वडिलोपार्जित जमिनीत शेती, शेतमाल प्रक्रिया तसेच संलग्न कुक्कुटपालन, शेळ्या पालन, दुग्धोत्पादन व्यवसाय वृद्धिंगत केला आहे.

पीएच.डी. पूर्ण केल्यानंतर शैलेश यांनी शेती व संलग्न व्यवसायावर लक्ष केंद्रित केले आहे. तीनशे हापूस आंबा, ७०० काजू लागवड केली आहे. शिवाय १५०० बांबूंची लागवड करण्यात आली आहे. दहा हजार रोपांची नर्सरीही तयार केली आहे. निव्वळ शेती नाही तर शेतमालावरील प्रक्रिया उद्योग सुरू केला आहे. काजू बागेतील उत्पादित काजू बीवर प्रक्रिया करून विविध प्रकारच्या स्वादातील काजू तयार करून विक्री करत आहेत. याशिवाय काजू बर्फी, काजू मोदक तयार करून विक्री करतात. शैलेश यांच्याकडे शेती व्यवसाय पाहण्यासाठी, मार्गदर्शनासाठी येणाऱ्यांची संख्या अधिक आहे. त्यांच्या निवासाची सुविधा उपलब्ध करत असताना, 'ॲग्रो टुरिझमची' संकल्पना सुचली. शैलेश यांनी तातडीने ती अंमलातही आणली आहे. ५० लोकांसाठी एमटीडीसी मान्यता प्राप्त न्याहरी निवास' योजना उपलब्ध केली आहे.

शेती संलग्न गावठी कुक्कुटपालन, गीरगाय पालन, शेळी पालन व्यवसाय सुरू केला आहे. शैलेश यांनी २५ युवकांना एकत्रित आणत शेतकरी संघ स्थापन केला आहे. शैलेश यांच्याकडे १५ लोकांना कायमस्वरूपी रोजगार मिळाला आहे.

शेळी पालनशैलेश यांनी शेळी पालन व्यवसाय सुरु केला असून, त्यांच्याकडे शंभर शेळ्या, बोकड आहेत. योग्य संगोपनामुळे तयार बोकडांची ते विक्री करत आहेत. शिवाय लेंडीपासून खतनिर्मिती करण्यात येत आहे. गाईंचे शेण, कोंबड्यांची विष्ठा व लेंडी एकत्र करून मशीनद्वारे खत तयार करून विक्री करतात. १२ ते १३ टन खत तयार करून विक्री करत असून, खतासाठी बागायतदारांकडून मागणीही चांगली होत आहे

नर्सरीतून रोप विक्रीदहा हजार रोपांची क्षमता असलेली रोपवाटिका शैलेश यांनी तयार केली आहे. आंबा, काजूसह सुपारी, नारळ, आवळा, शिवाय शोभिवंत फुले, फळांची कलमे/रोपे तयार करून विक्री करत आहेत. रोपांचा दर्जा उत्कृष्ट असल्याने विक्री चांगली होते. कोरोना काळात गावातील २५ युवकांना एकत्रित आणत शेतकरी संघ स्थापन केला आहे. हे युवकही शेती संलग्न व्यवसाय तर करीत आहेत, शिवाय गीरगाय संगोपन, दुग्ध व्यवसाय करत आहेत. शैलेश यांनी शेतालगत सुरु केलेल्या ॲग्रो टुरिझम व्यवसायालाही चांगला प्रतिसाद लाभत आहे. मुंबई-गोवा महामार्गामुळे पर्यटक, शेतकरी आवर्जून थांबून कृषी व्यवसायाची माहिती घेतात. त्यांना निवास, भोजनाची सुविधा असल्यामुळे शैलेश यांच्या कृषी व्यवसायाला जोड मिळाली आहे.

तुपाला परदेशात मागणीशैलेश यांच्याकडे २५ गीरगाई आहेत. दूध विक्री न करता, दरमहा २५ किलो तूप तयार करून विक्री करतात. गायीच्या तुपाला मागणी चांगली असून मुंबई, पुण्यासह परदेशातूनही मागणी होत आहे. शैलेश यांच्याकडे ५०० गावठी कोंबड्या आहेत. कुक्कुटपालन व्यवसायात पक्षी व अंडी विक्री करत आहेत. बॉयलरपेक्षा गावठी कोंबड्यांना अधिक मागणी असून दरही चांगला मिळतो, असे शैलेश यांनी सांगितले. बारमाही हा व्यवसाय सुरु असतो.

 

 

टॅग्स :शेतीशेतकरीफळेरत्नागिरीकाढणी पश्चात तंत्रज्ञानपर्यटनशेळीपालनगाय