Lokmat Agro >लै भारी > कोतळुकचे शिरीष ओक व्यवसाय सोडून करता आहेत सुपारी अन् कॉफीची यशस्वी शेती

कोतळुकचे शिरीष ओक व्यवसाय सोडून करता आहेत सुपारी अन् कॉफीची यशस्वी शेती

Shirish oak Kotaluk are leaving the business to successfully farm arecanut and coffee | कोतळुकचे शिरीष ओक व्यवसाय सोडून करता आहेत सुपारी अन् कॉफीची यशस्वी शेती

कोतळुकचे शिरीष ओक व्यवसाय सोडून करता आहेत सुपारी अन् कॉफीची यशस्वी शेती

औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात इलेक्ट्रिकचे शिक्षण घेऊन महावितरणमध्ये ठेकेदार म्हणून कार्यरत असणाऱ्या गुहागर तालुक्यातील कोतळुक येथील शिरीष दत्तात्रय ओक यांनी चक्क डोंगरावर सुपारी लागवडीचा प्रयोग यशस्वी केला आहे.

औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात इलेक्ट्रिकचे शिक्षण घेऊन महावितरणमध्ये ठेकेदार म्हणून कार्यरत असणाऱ्या गुहागर तालुक्यातील कोतळुक येथील शिरीष दत्तात्रय ओक यांनी चक्क डोंगरावर सुपारी लागवडीचा प्रयोग यशस्वी केला आहे.

शेअर :

Join us
Join usNext

मेहरून नाकाडे
औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात इलेक्ट्रिकचे शिक्षण घेऊन महावितरणमध्ये ठेकेदार म्हणून कार्यरत असणाऱ्या गुहागर तालुक्यातील कोतळुक येथील शिरीष दत्तात्रय ओक यांनी चक्क डोंगरावर सुपारी लागवडीचा प्रयोग यशस्वी केला आहे. त्याचप्रमाणे नाविन्यपूर्ण प्रयोगात कॉफीची लागवड केली आहे.

शिरीष यांना शेतीची आवड असल्याने त्यांचे इलेक्ट्रिक व्यवसायात मन रमले नाही. व्यवसायाला रामराम करून ते शेती लागवडीकडे वळले. एकूण १२ एकर क्षेत्रावर त्यांनी विविध पिकांची लागवड केली आहे. सपाट क्षेत्रावर सुपारी लागवड केली जाते. मात्र, शिरीष यांनी चक्क डोंगरावर १४०० सुपारी रोपांची लागवड केली आहे. आता १० ते १५ वर्षांची ही ही झाडे असून, उत्पादन सुरू झाले आहे. काही क्षेत्रावर आंबा, कोकम, बांबू, सागाची लागवड केली आहे.

त्याचप्रमाणे नाविन्यपूर्ण प्रयोग म्हणून कॉफी लागवड केली आहे. खत, पाणी व्यवस्थापनावर लक्ष केंद्रित केल्याने प्रत्येक झाडापासून चांगले उत्पादन मिळू लागले आहे. गुहागर तालुक्याला जिल्ह्याचे सुपारीचे आगर म्हणून ओळखले जाते. शिरीष यांनीही सुपारी लागवडीवर भर दिला आहे. नदीवर पंप बसवून थेट झाडांना पाणी वळवले आहे. सुपारीमध्ये काळीमिरी लागवडही केली असून, ते काळीमिरीचे आंतरपीक घेत आहेत. आंब्याची ५० कलमे असून, उत्पादित आंब्यांची खासगी विक्री करत आहेत. ५० कोकम लागवड असून, कोकम सरबत, कोकम आगळ, आमसुले तयार करून विक्री करत आहेत.

पडिक जमिनीवर शिरीष यांनी बांबू लागवड केली आहे. चांगल्या प्रकारचा बांबू तयार झाल्यास दरही चांगला मिळतो, त्यामुळे योग्य नियोजन करूनच लागवड केली आहे. रोपांची निवड, लागवडीचे तंत्र, खत, पाणी व्यवस्थापन यावर त्यांचा विशेष भर आहे. बांबूला जागेवरच दर मिळतो, अन्य पिकांप्रमाणे खर्चिक नसल्याने लागवडीला प्राधान्य दिले आहे.

सुपारी वाळविण्यासाठी प्लास्टिक टनेल
ओली सुपारी वाळण्यासाठी किमान ४० दिवस लागतात. यावर पर्याय म्हणून शिरीष यांनी प्लास्टिकचे टनेल तयार केले आहे. या टनेलमध्ये सुपारी २० दिवसात वाळते. सुपारी वाळविण्याचा वेळ व पैसा वाचला आहे. सुपारीला चांगली मागणी आहे. परराज्यातील व्यापारी गुहागर तालुक्यात स्वतः येऊन सुपारी खरेदी करतात. त्यामुळे त्यांनी सुपारी लागवड मोठ्या प्रमाणावर केली आहे. डोंगरावरील सुपारी लागवड यशस्वी ठरली असून, उत्पादन सुरू झाले आहे.

काळीमिरीचे आंतरपीक
सुपारीच्या झाडामध्ये काळीमिरी रोपांची लागवड केली आहे. रोपे चांगली वाढली असून, काळीमिरी चांगली लगडली आहे. काळीमिरीला चांगला दर मिळत असून, मागणीही वाढती आहे. ओल्या व वाळलेल्या काळीमिरीला बाजारात मागणी आहे. वाशी मार्केटमध्ये ओली मिरी पाठवली तर विक्री होते. तर ओली मिरी काढून गरम पाण्यात उकळली व नंतर उन्हात वाळविल्यास उत्कृष्ट पद्धतीची काळी मिरी तयार होते. सुपारीची रोपे सरळ वाढत असल्याने काळीमिरीच्या वेलींचीही वाढ योग्य पद्धतीने होते. शिवाय मिरी काढणे सुलभ होते.

शेतीवरच लक्ष
सुरूवातीपासूनच शेतीची आवड असल्याने शिक्षण पूर्ण करून काही दिवस व्यवसाय केला. परंतु, शेतीची ओढ असल्याने अखेर व्यवसाय बंद करून पूर्ण वेळ शेतीकडे लक्ष केंद्रित केले. पीक कोणतेही असो लागवडपूर्व मशागत, रोपांची निवड, लागवड, खत व पाणी व्यवस्थापन योग्य असेल तर उत्पादनही चांगले मिळते. त्यामुळे शिरीष यांनी सुपारी लागवडीचे तंत्र अवगत केल्यानंतरच लागवड केली आहे. विद्यापीठ प्रमाणित वाणाची निवड केली आहे.

यांत्रिक अवजारांचा वापर
शेतीच्या कामासाठी मजुरांची समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे यांत्रिक अवजारांचा वापर फायदेशीर ठरतो. बागायतीमध्ये उगवणारे गवत काढण्यासाठी ग्रासकटर फायदेशीर ठरत आहे. काही वेळात, कमी खर्चात गवत काढणीचे काम पूर्ण होते. त्याचप्रमाणे आंब्यावरील कीटकनाशक फवारणीसाठी स्प्रे पंपाचा वापर करत आहेत. यांत्रिक अवजारांमुळे काम सुलभ व सोपे झाल्याचे ओक यांनी सांगितले.

योग्य नियोजन व मार्गदर्शन
व्यावसायिक दृष्टीकोन ठेवून शेती केली तर नक्कीच चांगले अर्थार्जन प्राप्त होते. हवामानातील बदलांमुळे आंबा, काजू पिकाचे उत्पादन घटत आहे. शिवाय आंबा पीक तर खर्चिक बनले आहे. त्यामुळे आंबा लागवडीऐवजी सुपारी, साग, बांबू, काळीमिरी, कॉफी लागवड करून योग्य नियोजन करून केले आहे. पिकांसाठी सूक्ष्म अन्नद्रव्य उपयुक्त ठरते. याबाबत ओक यांना कृषितज्ज्ञ संदीप डोंगरे यांचे मार्गदर्शन मिळत आहे. त्यांच्याकडील प्रत्येक शेतमालाचा दर्जा तर उत्तम आहेच, शिवाय उत्पादनही चांगले मिळत आहे.

Web Title: Shirish oak Kotaluk are leaving the business to successfully farm arecanut and coffee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.