सुरेंद्र शिराळकरआष्टा : येथील कृषिभूषण सुनील माने यांनी ऊस शेतीला फाटा देऊन कोहळा या पिकाची लागवड करीत तीन महिन्यांत तीन एकरात पाच लाखांचे उत्पादन घेतले. त्यांनी केळी, पपई याचबरोबर नोव्हेंबर २०२४ मध्ये कोहळा रोपांची लागवड केली.
शेतामध्ये पपईचे बेड करून नऊ वाय दीड फुटावर एकरी साडेचार ते पाच हजार रोपांची लागवड केली. सुरुवातीला चार एकरावर लागवड करून ठिबकने पाण्यासह रासायनिक खते दिली.
सुनील माने यांनी वडिलोपार्जित शेती करण्याचा निर्णय घेतला, आपल्या शिक्षणाचा शेतीसाठी चांगला उपयोग करून घेऊन शेतीचे उत्पादन व उत्पन्न वाढवण्यासाठी त्यांनी चांगले प्रयत्न केले.
पीक बदलासह विविध प्रयोग माने नेहमी करत आहेत. आता कोहळ्याच्या पिकात त्यांचा जम बसला आहे. गेल्या वर्षापासून ते आपल्या शेतीत कोहळा लागवडीचे नियोजन करतात.
कमी पाणी, कमी श्रम आणि कमी कालावधीत तयार होणारे कोहळ्याचे पीक त्यांना वरदान ठरले आहे. त्यांनी त्याचे उत्तम व्यवस्थापन करून चांगली बाजारपेठही मिळवली आहे.
सुनील माने म्हणाले, वेळोवेळी कीटकनाशक फवारणी करून एका कोहळ्याचे वजन एक किलोपासून १७ किलोपर्यंत वाढवले. एकरी सुमारे १८ ते २० टन उत्पादन मिळाले.
याला पाच रुपये किलो दर मिळाला, एकरी ६० ते ६५ हजार रुपये खर्च व दर नसल्याने अपेक्षित उत्पादन मिळाले नाही. मात्र सध्या तीन एकर क्षेत्रातील कोहळा विक्री सुरू असून मुंबई, वाशी व भिलाई येथील व्यापाऱ्यांच्याकडून दहा ते बारा रुपये किलोला दर मिळत आहे.
एकरी सुमारे १७ टनापर्यंत उत्पादन मिळत असून एकरी एक लाख ७० हजार उत्पादन मिळाले. ७० हजार खर्च वजा जाता सरासरी एक लाख उत्पादन मिळणार आहे. तीन एकरमधून पाच लाखांपेक्षा जास्त उत्पादन मिळेल, असा त्यांचा अंदाज आहे.
ऊस शेतीला फाटा देऊन केळी व पपईची लागवड केली. वेगळे काहीतरी करावे या दृष्टिकोनातून कोहळा लावला.पहिल्या चार एकरमध्ये अपेक्षित दर मिळाला नाही. परंतु पुढील तीन एकरातील कोहळ्याला चांगला दर मिळत आहे. शेतकऱ्यांनी वेगवेगळी पिके घेण्याचा प्रयत्न केल्यास शेती फायदेशीर ठरते. - सुनील माने, शेतकरी, आष्टा
अधिक वाचा: गाईच्या मल-मूत्रातून पिकवली हळद; नऊ महिन्यांत केली साडेचार लाख रुपयांची कमाई