Join us

उसाला फाटा देऊन; सीताफळाची लागवड, पल्प तयार करून केली उत्पन्नाची कमाल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2024 3:32 PM

वाळवा तालुका म्हटले की आपल्या ऊस आठवतो. पण, येथील शेतकरी ऊस शेतीला फाटा देऊन आता फळबागा, भाजीपाला पिकाकडे वळला आहे. आष्ट्यातील प्रगतशील शेतकरी विराज पवार यांनी पारंपरिक शेतीत बदल करुन सीताफळ लागवड करुन विक्रमी एकरी आठ टनापर्यंत उत्पादन घेतले आहे.

सुरेद्र शिराळकरआष्टा : वाळवा तालुका म्हटले की आपल्या ऊस आठवतो. पण, येथील शेतकरीऊस शेतीला फाटा देऊन आता फळबागा, भाजीपाला पिकाकडे वळला आहे. आष्ट्यातील प्रगतशील शेतकरी विराज पवार यांनी पारंपरिक शेतीत बदल करुन सीताफळ लागवड करुन विक्रमी एकरी आठ टनापर्यंत उत्पादन घेतले आहे.

विराज पवार या वाणिज्य पदवीधर युवकाने उसाचे एकरी १२१ टन तर केळीचे ४० ते ४५ टन उत्पादन घेतले आहे. आष्टा ते बावची मार्गावरील माळरानावर जून २०२० मध्ये विराज पवार यांनी एनएमके वन गोल्डन ही बोरमाळे (ता. बार्शी) येथून सीताफळाची रोपे आणली. रोपे ८ बाय १४ फूट अंतरावर शेणखत टाकून तीन एकर क्षेत्रावर बाराशे झाडे लावली. या झाडांना ठिबक केले.

सुरुवातीला सीताफळात भुईमुगाचे आंतरपीक घेतले. नियमितपणे ठिबकने पाणी खते तसेच विविध किडी व रोगासाठी वर्षभर औषध फवारणी केली. किडीसाठी सापळे लावले. जून २०२३ मध्ये तीन वर्षानंतर सीताफळास पीक सुरु झाले. या सीताफळांच्या झाडाला ३०० ग्रॅम पासून ९०० ग्रॅम पर्यंत एक सीताफळ मिळाले. कलकत्ता व बांगलादेश येथे सुमारे दोन टनाच्या दरम्यान १०० रुपये किलोने सीताफळे निर्यात केली.

अधिक वाचा: दुष्काळी माणमधील आंधळीचे शेतकरी अशोक शेंडे यांची केळी परदेशात निर्यात

आष्ट्यासह परिसरातील बाजारपेठेत ३ ते ४ टन सीताफळे ८० रुपये किलो दराने स्वतः विक्री केली. दोन ते अडीच टन सीताफळाचे स्वतः व कामगारांच्या मदतीने ७०० ते ८०० किलो पल्प तयार केले. हा पल्प २२० ते २५० रुपये किलो दराने परिसरातील डेअरीला विक्री करण्यात येत आहे. यासाठी कोल्ड रूम ही तयार करण्यात येणार आहे. विराज यांनी वडील बाबूराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सीताफळ लागवड करीत शेतकऱ्यांसमोर आदर्श निर्माण केला आहे.

ऊस, केळी पिकांसोबत वेगळा प्रयोग म्हणून सुमारे तीन एकर सीताफळ लागवड करून त्याला जाळीचे कंपाऊंड केले. तीन वर्षाच्या प्रतीक्षेनंतर यावर्षी एकरी सात ते आठ टन उत्पादन मिळाले. यातील काही सीताफळे निर्यात केली. उर्वरित सीताफळांपासून पल्प तयार करून जवळच्या दूध डेअरीत विक्री करीत आहोत. - विराज पवार, सीताफळ उत्पादक, आष्टा

टॅग्स :शेतकरीफलोत्पादनऊसपीकबाजारफळेठिबक सिंचनकेळी