Join us

Silk Cocoon Production : जिद्द आणि चिकाटीतून दोन सख्ख्या जावांची यशस्वी रेशीम गाठ

By प्रतीक्षा परिचारक | Published: October 04, 2024 10:13 AM

शारदीय नवरात्र उत्सवाच्या दुसऱ्या माळेला लक्ष्मीच्या रूपातील शारदा आणि पार्वती यांच्या कर्तुत्वान कार्याचा प्रेरणादायी प्रवास आज आपण वाचूया. (Silk Cocoon Production)

Silk Cocoon Production : जिद्द, चिकाटी आणि प्रबळ इच्छाशक्तीच्या बळावर दोन सख्ख्या जावांनी लक्ष्मी रूपात असलेल्या आपल्या नावाला सार्थकी लावत महाराष्ट्रातील अनेक महिलांसाठी प्रेरणादायी मोहीम राबवत आहेत.

औद्योगिक नगरी मानल्या जाणाऱ्या छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील देवगाव येथील प्रगतिशील महिला शेतकरी शारदा मदन गिते आणि पार्वती सदाशिव गिते  या दोन जावांची कार्यपद्धती सध्या कौतुकास्पद ठरत आहे.

अत्याधुनिक शेतीचा नवा ध्यास समोर ठेवून या दोघींनी रेशीम मध्ये नवक्रांती घडून आणली आहे. त्यांचे रेशीम कोष निर्मितीचे कार्य कौतुकास्पद आहे. अंडीपुंज निर्मितीसाठी लागणाऱ्या कोशाच्या उत्पादनात त्या दोघी नवनवीन प्रयोग करत आहेत.

शारदीय नवरात्र उत्सवाच्या दुसऱ्या माळेला लक्ष्मीच्या रूपातील शारदा आणि पार्वती यांच्या कर्तुत्वान कार्याचा प्रेरणादायी प्रवास आज आपण वाचूया...

ग्रामीण भागातील महिलांसाठी रोजगारनिर्मिती हे ध्येय ठेवून या दोघी जणी आपले कार्य करत आहेत. पारंपारिक शेती पद्धतीमध्ये अत्याधुनिक नव्या क्रांतीची जोड लावून या दोघींनी यशाचा मोठा पल्ला गाठला आहे. नव्या उद्योगाने आर्थिक स्वरूपात या दोघींची कामगिरी सर्वांना प्रेरणा देणारी निश्चितपणे ठरते.

पूर्वी पारंपरिक पद्धतीने शेती करत होतो. परंतु त्यातून अपेक्षित नफा मिळत नसल्याने सन २०१८ सालीपासून रेशीम शेतीसाठी वाटचाल सुरू केली. त्यावेळी शासनाकडून तीन भावांना प्रत्येकी ५५ हजार रुपये असे एकूण १,६५,००० रुपये अनुदान मिळाले.

त्यानंतर अंडीपुंज निर्मितीसाठी शेड उभारणीसाठी ९०,००० रुपये मिळाले. त्यात आम्ही २५×७० असे शेड उभारले.  ३ एकर क्षेत्रात तुतीची लागवड केली. आणि हा रेशीम शेतीचा प्रवास सुरू झाला. यंदा त्यात वाढ करत सुमारे ५ एकर क्षेत्रात तुतीची लागवड केली असल्याचे शारदा गिते यांनी सांगितले.

अंडीपुंज निर्मितीसाठी लागणाऱ्या कोशाच्या उत्पादनाकडे संधी म्हणून जर बघितले तर रेशीम कोष उत्पादक शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारते. महिलांनी मिळून करावयाच्या रेशीम उद्योगात (Silk Industry) रेशीम कोष उत्पादक शेतकऱ्यांच्या घरातील महिलांची भूमिका महत्त्वाची असते. हे गीते कुटुंबातील या दोघी जावांनी करून दाखवले आहे.

केव्हीकेचे भक्कम पाठबळ

यशाचा पल्ला गाठत असताना मागे मार्गदर्शन करणारे कार्यपद्धती आवश्यक असते. हीच भूमिका केव्हीकेने खंबीरपणे बजावली आहे. यामुळेच या दोघींना शेती या विश्वात आपला वेगळा ठसा उमटवण्याची संधी मिळाली. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी, कृषि विज्ञान केंद्र, पैठण रोड, छत्रपती संभाजीनगर -१ यांनी दत्तक घेतलेले गाव असल्याने आम्हाला त्यांची नेहमी मार्गदर्शन मिळत असते. शासनाच्या योजनेची माहिती केव्हीके समन्वयक किशोर झाडे देत असतात.

अंडीपुंज निर्मितीसाठी लागणाऱ्या कोशाच्या उत्पादनामुळे (Cocoon Production) केवळ २५० अंडीपुंजच्या प्रत्येकी दोन बॅच मधून ३ लाख ७ हजार २४ रुपयाचे उत्पन्न रेशीम कोष उत्पादन देत आहे.

हायब्रीड सीड कोष

गिते ताईंनी पारंपरिक पद्धतीने शेती  न करता त्याला आधुनिकतेची जोड देत त्यांनी ‘पॅरेंटल बाय-व्होल्टाईन रेशीम हायब्रीड सीड कोष’ (एफसी १ ॲण्ड एफसी २) उत्पादन सलग दोन वेळा अतिशय उत्तम प्रकारे घेतले आहे. त्यातून त्यांना अपेक्षेपेक्षा अधिक उत्पन्न मिळत आहे.

एकत्र कुटुंब हीच खरी ताकद

शारदा गीते यांचे पती मदन गिते  तसेच पार्वती गीते यांचे पती सदाशिव गीते यांचीही भूमिका या कोष उत्पादनात महत्त्वाची ठरत आहे. आजच्या काळात सुध्दा गिते कुटुंबीय एकत्र नांदतात. हीच त्यांची संपत्ती असल्याचे पर्वती गीते यांनी सांगितले.

गीते कुटुंबाने पहिल्या बॅचला २५० अंडीपुंजला १६८ किलो कोष उत्पादन घेतले. या कोषाच्या विक्रीतून १ लाख ५९ हजार ७८१ रुपयांचे उत्पन्न मिळाले. त्यावेळी त्यांच्या कोषाला ३५ हजार रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला.

तर दुसऱ्या बॅचला २५० अंडीपुंजला १३४ किलो कोष उत्पादन मिळाले. या कोषाच्या ३ फेब्रुवारी २०२३ ला केलेल्या विक्रीतून १ लाख ४७ हजार २४३ रुपयांचे उत्पन्न त्यांना मिळाले.

गीते कुटुंबीय रेशीम कोष उत्पादन घेताना. पहिल्या वर्षी त्यांनी केवळ एका बॅचमध्ये ९५ हजारांचे, दुसऱ्या वर्षी सहा बॅचमधून पाच लाखांचे, तिसऱ्या वर्षी सात बॅचमधून सात लाखांचे तर चौथ्या वर्षी सहा बॅचमधून जवळपास ७ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. यंदा तर त्यांना वर्षाअखेरीस १२,००,००० रुपये उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे.

मेहनतीवर स्वावलंबी होता येते

रेशीम शेतीमध्ये लागवड खर्च कमी असून केवळ मेहनतीच्या जोरावर आपण आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होऊ शकतो. याचे उत्तम उदाहरण म्हणजे गीते कुटुंब आहे. त्यांनी आपल्या गावात अनेक शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून आता पर्यंत ७० शेतकऱ्यांना रेशीम शेती करण्यास प्रोत्साहन दिले आहे.

टॅग्स :शेती क्षेत्रजागर "ती"चारेशीमशेतीपैठणशेतकरीशेती