मनोहर बोडखे
उन्हाळा आला कि शरीराला गरज असते ती थंड पेयाची. खरं तर नीरा ही आरोग्याच्या दृष्टीने देखील अत्यंत गुणकारी आहे. पहाटेच्या प्रहरी नीरा प्यायल्याने पोटातील अनेक विकार कमी होतात. किडनी स्टोनसाठी तर नीरा अत्यंत गुणकारी मानली जाते. नारळ पाण्यापेक्षा ही १० पट अधिकचे न्यूट्रिशन नीरा मधून मिळतात.
दौंड तालुक्यातील पाटस परिसरात प्रगतशील शेतकरी अरुणराव मारुतराव भागवत यांनी शेतीला पूरक व्यवसाय म्हणून निरेची शेती केली असून चार एकरात १२५० शिंदीची झाडे लावली आहे. या शिंदीच्या झाडातून दररोज सहाशे लिटरच्या जवळपास नीरा मिळते. दरम्यान आरोग्यवर्धक थंडपेय म्हणून नीरेचा उपयोग केला जातो.
साधारणता वर्षाकाठी नीरे पासून चार लाख रुपयांच्या जवळपास उत्पादन मिळते. या शेतीची माहिती देताना अरुणराव भागवत म्हणाले की शेतीमालाला हमीभाव नाही त्यामुळे शेतकऱ्यांपुढे आर्थिक संकट आहे.
परिणामी शेतीला जोडधंदा म्हणून मी शेतीतील नवीन प्रयोग करण्याच्या शोधात असताना शिंदीच्या झाडा अंतर्गत आरोग्यवर्धक थंडपेयची नीरा काढण्याचा निर्णय घेतला.
या निर्णयाला कुटुंबाचे पाठबळ मिळाले. दरम्यान चार एकरात दहा फुटाच्या अंतरावर १२५० शिंदीच्या झाडांची रोपे लावली. साधारणतः सात वर्षांनी शिंदीची झाडे वाढली आणि या झाडातून निरा गाळापाचे कामकाज सुरू झाले.
डिसेंबर ते मे या उन्हाळ्याच्या वातावरणात शिंदीच्या झाडांपासून नीरा मिळते. दररोज सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास प्रत्येक झाडाला मातीचे मडके लावले जाते आणि पहाटे चार वाजता मडके झाडावरून खाली आणले जाते परिणामी प्रत्येक झाडापासून दररोज अडीच लिटर नीरा मिळते.
आरोग्यवर्धक आणि थंड पेय म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात नीरेला मागणी असते त्यानुसार आमच्या शेतीत दररोज काढण्यात आलेली नीरा पुण्याच्या बाजारपेठेत विक्रीसाठी पाठवली जाते.
आरोग्यवर्धक थंड पेय
• नीरा हा गोड द्रवस्वरूपातील रस यात १२ ते १४ टक्के गोडी असते. नारळाच्या पाण्याप्रमाणे नीरेची चव असते.
• शिंदीच्या झाडापासून नीरा काढण्यासाठी झाडांना छेदन प्रक्रिया केल्यानंतरच नीरा झिरपण्यास सुरवात होते.
• झाडाला छेदन करून त्याला मडके लावून नीरा काढणे योग्य ठरते. छेदन प्रक्रिया, रोजच्या रोज वेळेत मडकी लटकावणे आणि काढणे.
अधिक वाचा: काशिद दांपत्यांनी ४० एकर क्षेत्र भाड्याने घेवून उभारला बांबूचा हा आगळावेगळा प्रकल्प