विष्णू वाकडे/ जालना :
जालना तालुक्यातील द्राक्षाचे आगार समजल्या जाणाऱ्या कडवंची येथील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना मागील काही वर्षांपासून कधी अतिवृष्टी, कोरडा दुष्काळ, अशा अडचणींचा सामना करावा लागत आहे.
या परिस्थितीवर मात करण्यासाठी प्रगतशील शेतकरी कृष्णा क्षीरसागर यांनी सीताफळ लागवडीचा यशस्वी प्रयोग केला आहे. त्यांची ही सीताफळे द्राक्षाच्या फळबागेला टक्कर देत आहेत.
कृष्णा क्षीरसागर यांनी यापूर्वी द्राक्ष उत्पादन आणि त्यापासून मनुका तयार करणे, मोसंबी फळबाग शेती केली. त्यानंतर त्यांनी अडीच एकरमध्ये ९०० सीताफळांची झाडे लावली.
परंतु शेतीमध्ये त्यांनी आतापर्यंत केलेल्या फळबागेपेक्षा सीताफळाची बाग ही द्राक्ष आणि मोसंबीच्या बागेलाही वरचढ आणि फायदेशीर ठरत आहे.
त्यांनी लावलेल्या ९०० सीताफळांच्या झाडांपासून यंदा त्यांना जवळपास २२ ते २५ टन उत्पादन होण्याची अपेक्षा असून, त्यातून पन्नास रुपये प्रतिकिलो दराने साधारणतः दहा ते बारा लाख रुपयांचे उत्पन्न अपेक्षित आहे. या सीताफळांच्या बागेसाठी त्यांना फक्त दोन लाख रुपये खर्च आला आहे.
कधी मोसंबी तर कधी द्राक्षाची शेती असे शेतीमध्ये विविध प्रयोग करणारे क्षीरसागर यांनी २०१८ मध्ये सीताफळांची लागवड केली. तिसऱ्या वर्षी झाडांना फळधारणा झाली. २०२२ मध्ये पहिल्या तोडणीत २ लाखाचे उत्पन्न, दुसऱ्या वर्षी ५ लाख रुपयाचे उत्पन्न मिळाले तर, २०२३ मध्ये त्यांना ५ लाखावरून साडेनऊ लाख रुपयाचे उत्पन्न मिळाले आहे. या वर्षी १२ लाख रुपये उत्पन्नची अपेक्षा आहे.
कमीत कमी पाणी, अल्प मनुष्यबळ लागते
कडवंची परिसरामध्ये यावर्षी समाधानकारक पाऊस पडला नाही. त्यामुळे द्राक्षाच्या बागा जोपासने म्हणावे तितके सोपे राहणार नाही. ऑक्टोबरमध्ये छाटणी केली आणि योग्य वेळी पाऊस झाला तर, ओढ्या-नाल्यांना पाणी येईल, शेततळे भरून घेता येतील आणि त्या पाण्याच्या आधारावर बागा जपता येतील; मात्र सततच्या हवामान बदलाचा सीताफळ लागवडीवर कुठलाही परिणाम होत नाही. पाणी आणि मनुष्यबळ जास्त लागत नाही. त्यामुळे सीताफळाची बाग ही शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरू शकते. हा माझा आतापर्यंतचा अनुभव आहे. -कृष्णा क्षीरसागर, शेतकरी, कडवंची