Soyabean Farmer Success Story : नाशिक जिल्ह्यातील (Nashik) बागलाण तालुक्यातील मोहळांगी येथील शेतकरी तानाजी रामदास चौरे यांनी कृषि विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञांचे मार्गदर्शन व आधुनिक सोयाबीन तंत्रज्ञानाचा वापर करून सोयाबीन शेती (Soyabean Farmer Success Story) यशस्वी केली. पारंपारिक शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन तसेच पिक सुधारित व्यवस्थापनातून त्यांनी सोयाबीन पिकाचे विक्रमी उत्पादन घेतले आहे.
तानाजी रामदास चौरे यांची बागलाण (Baglan Taluka) तालुक्यात प्रयोगशील शेतकरी म्हणून परिचित आहे. बारा जणांचे एकत्रित कुटुंबात तानाजी चौरे एकूण ४.५ एकर वडिलोपार्जित शेतीमध्ये तीन एकर क्षेत्रावर सोयाबीनचे (Soyabean Farming) उत्पादन घेतात. खरिपामध्ये सोयाबीन, मका आणि रब्बीमध्ये कांदा, गहू, हरभरा, टमाटर इत्यादी पिकांची लागवड करतात. पूर्वी ते सोयाबीनचे जुने वाण जे.एस. ३३५, ९३०५ या वाणांची लागवड करत होते.
कृषि विज्ञान केंद्र, मालेगाव Krushi Vidnyan Kendra Malegaon) यांचेकडून मागील वर्षी फुले संगम वाण घेतला. बागलाण येथून त्यांनी सोयाबीन टोकन मशीन पाच हजार रुपयाला खरेदी केले. त्यांनतर चार फुटी गादीवाफ्यावर दोन ओळी एक फुट अंतरावर लागवड केली. लागवडीसाठी त्यांना एकरी १२ ते १३ किलो बियाणे लागले. बागलाण तालुक्यात वरच्या भागात पावसाचे प्रमाण ८०० ते १००० मिमी आहे. या लागवडीमुळे जास्त पावसामुळे जास्तीचे पाणी सारीद्वारे बाहेर निघाले.
सुधारित तंत्रज्ञान आणि पिक व्यवस्थापन
सोयाबीनच्या ३० किलो बियाणे पिशवीतून दोन एकरपेक्षा जास्त लागवड झाली. लागवड अंतर जास्त असल्याने तणनाशक, किटकनाशके फवारण्यासाठी पुरेशी जागा मिळाली आणि दाट सोयाबीन असताना जे नुकसान व्हायचे ते टळले. मोकळी व हवेशीर जागा असल्याने कीड रोगांचा प्रादुर्भाव कमी झाला. तणांचा प्रादुर्भाव कमी असल्याने कमी मजुरात त्यांनी पिकात निंदनी केली. वेळेनुसार पिक व्यवस्थापन केले व पिकाचे निरीक्षणे घेतली. कीटकनाशके सोबत त्यांनी पिकवाढीच्या अवस्थेत १९-१९-१९, १३-०-४५ आणि ०-५२-३४ या विद्राव्य खतांची फवारणी केली. पावसाचे प्रमाण जास्त असल्याने पिकाला संरक्षित पाणी देण्याची गरज पडली नाही.
उत्पादनातील महत्वाच्या बाबी
- दोन वरंब्यातील अंतर ४ फुट व दोन झाडातील अंतर १० ते १५ से.मी.
- वरंब्याच्या बगलेला दोन्ही बाजूनी टोकन
- सोयाबीन पिकाचा सुधारित वाण फुले संगमचा लागवडीसाठी वापर
- हंगामपूर्व व पिकवाढी अवस्थेनुसार शेतकरी प्रशिक्षण
- बीजप्रक्रिया - थायरम, रायझोबियम, पीएसबीचा वापर.
- खत व्यवस्थापन - ३० ५०:२० किलो/हेक्टर नत्र,स्फुरद पालाशचा वापर
- नत्रयुक्त खतांचा फोकून वापर करण्यास टाळले.
- कीड व रोगांचे बांधावर सर्वेक्षण व उपाययोजना
- चालू वर्षी निर्मित फुले संगम वाण त्यांनी पुढील पेरणीसाठी साठवून ठेवला.
मालेगाव केव्हीकेकडून उत्पादन वाढीचे धडे
कृषि विज्ञान केंद्र, मालेगाव मार्फत तानाजी चौरे यांनी सोयाबीन एकात्मिक पीक व्यवस्थापनाचे तंत्रज्ञान आत्मसात केले. तसेच नवीन वाण फुले संगम याविषयी माहिती घेऊन लागवड करण्याचा निश्चय केला. केंद्राकडून त्यांना सोयाबीन वाण फुले संगम उपलब्ध करून दिले. पिक अवस्थेमध्ये शास्त्रज्ञांच्या सल्ल्याचा त्यांनी घेतला आणि त्याचा फायदा झाल्याचे सांगितले.
उत्पादन खर्च आणि बचत
तानाजी चौरे यांनी पिक व्यवस्थापन काटेकोरपणे केले. जमिनीची मशागत, पेरणी, बीज प्रक्रिया,अन्नद्रव्य व्यवस्थापन, तण नियंत्रण, कीड रोग व्यवस्थापन इ. महत्वाच्या बाबी त्यांनी वेळेवर केल्या. बियाणे बचत, रासायनिक खतामध्ये कपात, वेळेवर पिक व्यवस्थापन यातून उत्पादन खर्चात बचत झाली. उत्पादन खर्च आणि निव्वळ नफा खालीलप्रमाणे आला.
अ.क्र. | बाब | खर्च रुपये/एकर | खर्च रुपये/हेक्टर |
१ | मशागत | ३००० | ७५०० |
२ | बियाणे व बीजप्रक्रिया | १७५० | ४३७५ |
३ | बियाणे टोकणी | ६०० | १५०० |
४ | रासायनिक खते | १५०० | ३७५० |
५ | निंदणी | १८०० | ४५०० |
६ | फवारणी | १२०० | ३००० |
७ | कीटकनाशके व विद्राव्य खते | २५०० | ६२५० |
८ | कापणी | १६०० | ४००० |
९ | मळणी | ५२६० | १३१५० |
१० | इतर खर्च | ५०० | १२५० |
११ | एकूण खर्च | १९७१० | ४९२५० |
१२ | उत्पादन | २१.०४ | ५२.६ |
१३ | मिळालेला भाव (रुपये) | ४९०० | ४९०० |
१४ | एकूण उत्पन्न (रुपये) | १०४८६० | २६२१५० |
१५ | निव्वळ नफा (रुपये) | ८५१५० | २१२८७५ |
राज्यस्तरीय पिक स्पर्धेत मारली बाजी
पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी प्रयोगशील शेतकर्यांना मिळालेल्या पिक उत्पादकेबाबत प्रोत्साहन देऊन गौरव करण्यासाठी पिक स्पर्धा राज्य सरकार मार्फत राबविली जाते. उत्पादकता हि बाब आधारभूत घेऊन राज्य, जिल्हा व तालुकास्तरावर पारितोषिके दिली जातात. तानाजी चौरे यांनी मागील वर्षाच्या खरिप हंगामातील पिक स्पर्धेत नाशिक जिल्ह्यातून आदिवासी गटात सोयाबीन पिकाचे विक्रमी उत्पादन घेऊन प्रथम पुरस्कार पटकाविला. सन्मानपत्र आणि रोख ५० हजार रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
पूर्वीपासून सोयाबीन शेती पारंपारिक पद्धतीने करत होतो, पण ५ ते ६ क्विंटलपेक्षा जास्त उतारा मिळत नव्हता. कृषि विज्ञान केंद्राच्या संपर्कात आल्यावर फुले संगम वाणाबद्दल माहिती मिळाली. नेहमीच्या पेरणी एवजी टोकन पद्धतीने सोयाबीन केले. यासाठी शास्त्रज्ञांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले. गावठी वाणापेक्षा हा वाण आमच्या जमिनीत योग्य असल्याचे जाणवले. आता आजूबाजूच्या संपूर्ण गावामध्ये फुले संगम शिवाय दुसरा वाण कोणीच घेत नाही. या वाणामुळे शेतकरी सुखावला आहे.
- तानाजी रामदास चौरे, मोहळांगी ता. बागलाण
कृषि विज्ञान केंद्र मालेगावकडून शेतकऱ्यांना सोयाबीन पिक व्यवस्थापनाबाबत वेळोवेळी मार्गदर्शन करण्यात येते. सोयाबीनच्या या वाणाचे क्षेत्र १० हजार हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्रावर वाढविण्यात आले आहे. हा वाण जास्त पावसाच्या भागात चांगले उत्पादन देणारा आहे. पिकात पाणी साचून राहणार नाही, यासाठी सरी वरंबा किंवा गादीवाफ्यावर टोकन पद्धतीने लागवड केल्यास उत्पादन वाढ झाल्याचे आढळून आले आहे. शेतकरी बांधवानी त्यांच्या मेहनतीला तंत्रज्ञानाची जोड दिली तर आर्थिक स्थेर्य आणि जीवनमान उंचावण्यास मदत होईल.
- रुपेश सुभाषराव खेडकर, विषय विशेषज्ञ -कृषिविद्या, कृषि विज्ञान केंद्र, मालेगाव