महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाद्वारे राज्यामध्ये पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी, विविध भागांमध्ये शेतकऱ्यांकडून नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करून उत्पादकतेमध्ये वाढ केली जात आहे. याचे एक उदाहरण म्हणजे देशमुख आहेत. अचुक नियोजन करुन मेहकर येथील अंत्री देशमुखचे गजानन देशमुख यांनी २०२३-२४ या खरीप हंगामाच्या पीक स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला आहे.
अलीकडच्या काळात पीक उत्पादनात कमालीची घट झाल्याने शेतकऱ्याचे अर्थचक्र बिघडले आहे. त्यामुळे वेगवेगळे प्रयोग करून उत्पादन वाढविण्यावर भर दिला जात आहे. मेहकर तालुक्यात अंत्री देशमुख येथील गजानन किसनराव देशमुख यांनी गेल्या हंगामात हेक्टरभर क्षेत्रात तब्बल ३८ क्विंटल ४४ किलो सोयाबीनचे उत्पादन घेतले. त्यांनी घेतलेल्या विक्रमी उत्पादनाबद्दल पीक स्पर्धेत त्यांचा प्रथम क्रमांक आला आहे.
अशा प्रयोगशील, उपक्रमशील शेतकऱ्यांनी उत्पादन वाढविण्यासाठी स्पर्धा आयोजित केली जात आहे. बुलढाणा जिल्हा कृषी विभागाने २०२३-२४ या खरीप हंगामाचे पीक स्पर्धा विजेते जाहीर केले आहेत.
गजानन देशमुख यांनी सोयाबीन उत्पादनात बुलढाणा जिल्ह्यातून, सर्वसाधारण गटामधून हेक्टरी ३८.४४ इतके विक्रमी उत्पादन घेत प्रथम क्रमांक पटकावला आहे. पेरणीपूर्व मशागत, पेरणीच्या वेळेची मशागत, पिकाच्या विविध अवस्थामधील मशागत, पीक काढण्याच्या वेळेची निगराणी अशा विविध स्तरावर त्यांनी केलेले नियोजन हे वैशिष्ट्यपूर्ण ठरले.
तत्कालीन उपविभागीय कृषी अधिकारी मिसाळ, कृषी सहायक व्ही.डी. लहाने यांच्या मार्गदर्शनाखाली गजानन देशमुख यांनी विक्रमी उत्पादन घेतले आहे.