Join us

राज्य शासनाचा पहिलाच मराठी उद्योजक पुरस्कार 'सह्याद्री'चे विलास शिंदे यांना जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2023 5:17 PM

रतन टाटा, आदर पुनावाला, गौरी किर्लोस्कर यांचाही होणार सन्मान

राज्यशासनाकडून महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या धर्तीवर आता राज्याच्या उद्यमशीलतेत विशेष छाप उमटविणाऱ्या व्यक्तिमत्वांना उद्योगरत्न पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. हा पहिलाच ‘मराठी उद्योजक' पुरस्कार सुप्रसिद्ध उद्योजक रतन टाटा, सिरम इन्स्टिट्यूटचे आदर पुनावाला, किर्लोस्कर उद्योग समुहाच्या गौरी किर्लोस्कर यांच्यासह नाशिक येथील ‘सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनी‘चे अध्यक्ष विलास शिंदे यांना जाहीर झाला आहे.  राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी शनिवारी ही घोषणा केली.

येत्या 20 ऑगस्टला वांद्रे-कुर्ला संकुलातील जिओ कन्व्हेन्शन सेंटर येथे राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार आदींच्या उपस्थितीत या पुरस्कारांचे वितरण होणार आहे. पाच लाख, सन्मानचिन्ह आणि मानपत्र असे  पुरस्कारांचे स्वरुप आहे..

शेतकऱ्यांच्या समुहशक्तीचा सन्मानमहाराष्ट्रातील फलोत्पादन पिकांतील मुल्यसाखळीचे प्रत्यक्षातील उदाहरण म्हणून ‘सह्याद्री‘ समोर आली आहे. फळे व भाजीपाला पिकांतील शेतकऱ्यांच्या या कंपनीने ‘सीड टू प्लेट’ ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवली आहे.  शेतकऱ्यांमध्ये उद्योजकीय दृष्टीकोन रुजवून सामुहीक स्वरुपात शेतकऱ्यांची प्रगती साधली आहे. शेतीतील प्रश्‍न सोडविण्यापासून सुरवात झालेली असतांना ‘सह्याद्री’ ही भारतीय शेतकऱ्यांची जागतिक दर्जाची संस्था म्हणून नावारुपास आली आहे.  आजमितीस भारतातील सर्वाधिक द्राक्ष निर्यात करणारी व सर्वात मोठी टोमॅटो प्रक्रिया करणारी कंपनी म्हणूनही ओळखली जात आहे.

नाशिक जिल्ह्यातील मोहाडी येथे सुमारे 120 एकराच्या विस्तीर्ण भूमीवर सह्याद्री फार्म्सचा प्रकल्प उभारण्यात आला असून त्यामार्फत  ताजा शेतीमाल आणि प्रक्रियायुक्त शेती उत्पादने यांची 42 देशांमध्ये मोठया प्रमाणात निर्यात केली जाते. ‘सह्याद्री’ने ग्रामीण भागातील 6000 तरुणांना रोजगार उपलब्ध करुन दिला आहे.

‘‘शेतकऱ्यांनी संघटित होऊन उद्योजक म्हणून एकत्रित काम केले तर नक्कीच शेती आणि ग्रामीण भागात सकारात्मक बदल होऊ शकतो याची मला खात्री आहे. तोच प्रयत्न आम्ही ‘सह्याद्री फार्म्स‘च्या माध्यमातून करत आहोत त्यातून आम्हाला सकारात्मक बदल जाणवत आहे.‘‘–विलास शिंदे, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक-सह्याद्री फार्म्स, मोहाडी

टॅग्स :शेतकरीशेती