Lokmat Agro >लै भारी > जेव्हा हेवेदावे सोडून शेतकरी येतात एकत्र आणि होतात प्रयोगशील

जेव्हा हेवेदावे सोडून शेतकरी येतात एकत्र आणि होतात प्रयोगशील

story of group farming : When the farmers get rid of the heyday and become experimental | जेव्हा हेवेदावे सोडून शेतकरी येतात एकत्र आणि होतात प्रयोगशील

जेव्हा हेवेदावे सोडून शेतकरी येतात एकत्र आणि होतात प्रयोगशील

(गटाची गाथा १: )एकमेकांमधील हेवेदावे बाजूला ठेवून गावातले शेतकरी एकत्र आले, तर मोठा चमत्कार होऊ शकतो. या सदरातच्या माध्यमातून नियमित सांगत आहेत मराठवाडवाड्याचे प्रयोगशील शेतकरी दीपक जोशी.

(गटाची गाथा १: )एकमेकांमधील हेवेदावे बाजूला ठेवून गावातले शेतकरी एकत्र आले, तर मोठा चमत्कार होऊ शकतो. या सदरातच्या माध्यमातून नियमित सांगत आहेत मराठवाडवाड्याचे प्रयोगशील शेतकरी दीपक जोशी.

शेअर :

Join us
Join usNext

मी औरंगाबाद जिल्ह्यातला शेतकरी.  १९८४ साली पदवीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर देवगावला वडिलांच्या मार्गदर्शनात पूर्णवेळ शेती करण्यास सुरवात केली. सुरुवातीच्या काळात पारंपारिक पद्धतीने आम्ही शेती करत होतो. परंतु दिवसेंदिवस निसर्गातले बदल लक्षात घेऊन हळूहळू शेतीत तंत्रज्ञान बदल सुरू केला. देशी कापसाची जागा संकरित कापसाने घेतली बाजरीची जागा संकरित ज्वारीने घेतली. यातही नवीन नवीन समस्या वाढत गेल्या.

इ.स. २००० च्या आसपास संकरित कापसात बोंड अळीला प्रतिकार करणारे बी.टी.तंत्रज्ञान आले त्या तंत्रज्ञानाचा काही दिवस चांगला परिणाम दिसला, परंतु २००५ नंतर परत हळूहळू कापूस पिकात बोंड अळीचा शिरकाव झाला. निसर्गाच्या असमतोलामुळे शेती हळूहळू बेभरवश्याची होती चालली . त्यामुळे शेतीतही संघटन करण्याची गरज भासू लागली यातून २००५ साली पुणे येथे एका कृषी प्रदर्शनाला गेले असता आम्हाला मु.ओतूर ता.जुन्नर जि.पुणे येथील प्रगतशील शेतकरी विक्रमजी अवचट यांची भेट घेण्याची योग मिळाला. ते त्यांच्या गावातील शेतकऱ्यांसाठी जे काम करत होते त्यामुळे आम्ही प्रभावित झालो.  

अशी मिळाली प्रेरणा
परत येताना आमच्या बरोबरच्या गावातील सर्व सदस्यांनी शेतकरी गट स्थापन करण्याची शपथ घेतली यातूनच जय जवान जय किसान शेतकरी मंडळाची मुहूर्त मेढ रोवली गेली. याच काळात मुकेश महाजन हे कृषी विभागाचे कृषी सहाय्यक म्हणून आमच्या भागात कार्यरत झाले होते . त्यांनी कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकरी गटाची नोंदणी करून दिली. 

सुरूवातीचे प्रयोग
२००५ साली विक्रम अवचट यांच्या शेतावरती जो ठिबक संच पिकासाठी वापरला होता तो विना अनुदानित नॉन आय एस आय दर्जाचा होता . ते बघून देवगावला परत आल्यानंतर कापूस पिकासाठी ठिबक सिंचन वापरण्याचे ठरवले .ते बघून आमच्या गटातील घनश्याम गीते या शेतकऱ्याने पेप्सी ठिबक चा वापर करून कापसाचे उत्तम प्रकारे उत्पादन काढले.

या पेप्सी ठिबक साठी एकदम कमी खर्च लागत होता. याची दखल तत्कालीन इफको  चे विभागीय व्यवस्थापक (औरंगाबाद /छत्रपती संभाजीनगर ) श्री.ठाकरे यांनी घेतली आणि आमच्या शेतकरी मंडळातील १० शेतकरी सदस्यांना हेक्टरी १० हजार रुपये एव्हडी मदत केली याचा परिणाम असा झाला कि, ठिबक सिंचन वापरलेल्या शेतकऱ्यांचे पिक चांगले आल्यामुळे ठिबक तंत्रज्ञानाकडे इतर शेतकरी आकर्षित  झाले .

खत टंचाईवर अशी केली मात
 गटाच्या अशा नवीन नवीन उपक्रमामुळे गावाकडे ओढा जास्त वाढला २०१० साली डी.ए.पी या खताची अभूतपूर्व टंचाई औरंगाबाद जिल्ह्यात होती , तत्कालीन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री.डी.आय.गायकवाड साहेब यांनी शेतकऱ्यांना गट बनवून बांधावर खत पोहचवले याचा परिणाम ‘जय जवान जय किसान’ शेतकरी मंडळ २०१० पासून आजतागायत बांधावर खत योजना राबवीत आहेत. बांधावर खत योजनेमुळे शेतकऱ्यांना जो आर्थिक आणि मानसिक त्रास होता तो कमी झाला .

खत हे गावात वेळेवर आल्यामुळे पिकांना वेळेवर खत दिले गेले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ झाली. २०१२ साली महाराष्ट्रात अभूतपूर्व दुष्काळ पडला होता औरंगाबाद जिल्ह्यातील आमचा परिसर मोसंबी साठी पूर्वापार प्रसिद्ध आहे. २०१२ साली आमच्या भागातील मोसंबी वाचवण्यासाठी वेगवेगळे प्रयोग केले आमच्या देवगाव येथे गटातील १० शेतकऱ्यांनी पिंपळगाव बसवंत जि.नाशिक येथे स्वखर्चाने जाऊन ३० मायक्रोन चे मल्चिंग खरेदी करून मोसंबी पिक वाचवण्याचा यशस्वी प्रयत्न केला. 

राष्ट्रीय पातळीवर दखल
याची दखल तत्कालीन कृषी आयुक्त महाराष्ट्र राज्य श्री.उमाकांतजी दांगट साहेब , राष्ट्रीय फलोत्पादन संचालक दिल्ली श्री.डॉ गोरखसिंग तसेच फलोत्पादन संचालक महाराष्ट्र राज्य डॉ .दिगंबरजी बकवाड यांनी घेतली देवगाव येथे प्रत्यक्ष येऊन मोसंबी बागांची पाहणी केली आणि ज्या शेतकऱ्यांनी मोसंबी बागेला  आच्छादनाचा वापर केला त्यांना लगेच अनुदानाची रक्कम अदा केली. याचा परिणाम आमच्या परिसरातील मोसंबीच्या बागा वाचविण्यासाठी आर्थिक सहकार्य मिळाले.

२०१२ साली तत्कालीन कृषी विभागातील सर्व अधिकाऱ्यांनी गटाच्या कामाची दखल घेऊन राष्ट्रीय फलोत्पादन योजनेतून मोसंबी उत्पादक १५ शेतकरी मित्रांना ३० बाय ३० मिटर प्लास्टिक अच्छादनाचे शेततळी १००%अनुदानावर देण्यात आली.  २०१४ साली च्या दरम्यान नुजीविडू च्या माध्यमातून कापूस पिकात  सघन लागवडीचा प्रयोग डॉ.बैनाडे सरांच्या माध्यमातून शहादेव ढाकणे यांच्या शेतावर प्रथम केला गेला त्याचा परिणाम पूर्ण गावात त्या तंत्रज्ञानाचा वापर केला गेला. 

त्याच वर्षी मॉन्सेंटोचे प्रतिनिधी डॉ.परब सिंग यांच्या मार्गदर्शनात कापूस लागवडीसाठी ट्रॅक्टर चलित पेरणी यंत्रचा वापर २५ एकर क्षेत्रावर केला गेला. यातून संकरित कापसाची पेरणी होऊ शकते हे सिद्ध झाले . तसेच कापूस संशोधन केंद्र नांदेड यांच्या माध्यमातून काही शेतकऱ्याच्या शेतावर देशी कापूस आणि संकरित बी.टी,कापूस यांच्या तुलनात्मक अभ्यास पाच वर्ष केला गेला. याची दखल तात्कालीन कुलगुरु वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ परभणी श्री.बी.व्यंकटेश्वरलु यांनी प्रत्यक्ष शेतावर येऊन घेतली. 

गटशेतीचे फायदे
गावातील युवकांना वेळोवेळी मिळणाऱ्या तज्ज्ञ मार्गदर्शकामुळे गावात युवा पिढी शेतीकडे मोठ्या प्रमाणात आकर्षित झाली आहे.जसजसे ग्लोबल वर्मिग मुळे निसर्गाचे रूप बदलत चालले आहे. त्याचा परिणाम शेतीवर मोठ्या प्रमाणात होत आहे. यावर मत करण्यासाठी २०१८ ला गटातील शेतकरी श्री.शहादेव ढाकणे यांनी सुरवात केली आणि त्यांचे अनुकरण जवळपास २५ शेतकऱ्यांच्या रेशीम शेती चा गट तयार झाला.
रेशीम शेती ही शाश्वत आहे. यात खताचा आणि औषधाचा वापर नगण्य आहे. त्यामुळे यातूनच आम्ही हळूहळू नैसर्गिक शेतीकडे वाटचाल करत आहोत. 

शेतीकडे युवा शेतकऱ्यांना आकर्षित करायचं असेल तर गट शेती ही काळाची गरज आहे. आमचे एकच दुर्दैव आहे कि, आम्ही शेतकरी स्वतःच्या स्वार्थासाठी एकत्र येत नाही. आजची राजकीय परिस्थिती पाहिली, तर जे एकमेकांचे तोंडही पाहत नव्हते ते मांडीला मांडी लावून बसले आहेत. याचा सर्व शेतकरी मित्रांनी गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे.

 जाता जाता : करोना काळात जवळपास एक वर्षभर शेतकरी ते ग्राहक या तत्त्वावर भाजीपाला आणि मोसंबीची विक्री केली.

-दीपक पुरुषोत्तम जोशी, प्रयोगशील शेतकरी
मु.देवगाव ता.पैठण जि.औरंगाबाद 

Web Title: story of group farming : When the farmers get rid of the heyday and become experimental

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.