Pune : स्ट्रॉबेरी म्हटलं की आपल्याला महाबळेश्वर, पाचगणी किंवा वाई आठवतं. पण पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात म्हणजेच भिमाशंकर परिसरात आता स्ट्रॉबेरीचं नवं क्लस्टर तयार होतंय. मागच्या दोन वर्षात येथील शेतकऱ्यांची आणि स्ट्रॉबेरी क्षेत्राची १० पटीने वाढ झालीये.
पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्याचा पश्चिम परिसर म्हणजेच भिमाशंकरचा परिसर हा प्रामुख्याने दुष्काळी भाग. सर्वांत जास्त पाऊस पडूनही याच भागात सर्वांत आधी पाण्याची टंचाई भासू लागते. त्यामुळे येथील शेतकऱ्यांना केवळ भातशेती आणि रब्बी हंगामात कमी पाण्यावर किंवा शून्य पाण्यावर येणाऱ्या पिकांची निवड करावी लागते. पण मागच्या वर्षीपासून या परिसरात स्ट्रॉबेरीची लागवड होऊ लागली आहे.
डिंभे धरणाच्या वर म्हणजेच आदिवासी शेतकऱ्यांच्या भागात दोन वर्षाआधी केवळ ३ ते ४ शेतकरी प्रायोगिक तत्त्वावर स्ट्रॉबेरी लागवड करायचे. पण आता आदिवासी विभागाच्या न्युक्लिअस बजेट या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना स्ट्रॉबेरी लागवडीसाठी अनुदान देण्यात येतंय. पहिल्या टप्प्यात म्हणजेच २०२४-२५ मध्ये २५८ शेतकऱ्यांना अनुदान देण्याचे टार्गेट आहे. पण जानेवारी २०२५ च्या पहिल्या आठवड्यापर्यंत ५५ शेतकऱ्यांना अनुदान मिळालंय आणि त्यांनी प्रत्येकी ५ गुंठे क्षेत्रावर स्ट्रॉबेरीची लागवड केलीये. काही शेतकऱ्यांनी स्वखर्चानेही लागवड केलीये.
सध्या या परिसरात ३०० गुंठे पेक्षा जास्त म्हणजे जवळपास ३ हेक्टरच्या वर स्ट्रॉबेरीची लागवड झालीये. दोन वर्षापूर्वी हेच क्षेत्र केवळ २० ते ३० गुंठे एवढंच होतं. आदिवासी विभागाच्या योजनेनुसार २५८ शेतकऱ्यांनी स्ट्रॉबेरी लागवड अनुदानाचा लाभ घेतला तर येणाऱ्या काळात स्ट्रॉबेरीच्या क्षेत्रात अजून वाढ होणार आहे.
दरम्यान, या योजनेची अंमलबजावणी कृषी विभागाकडून करण्यात येत असून प्रत्येक गावातील कृषी सहाय्यक शेतकऱ्यांमध्ये याबाबत जागृती करत आहेत. या योजनेतून शेतकऱ्यांना स्ट्रॉबेरीची रोपे, ठिबक, मल्चिंग पेपर आणि जैविक खतांचा पुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना केवळ पाच ते सात हजार रूपयांचा खर्च स्ट्रॉबेरी लागवडीसाठी करावा लागत आहे.
विशेष म्हणजे या आदिवासी शेतकऱ्यांचा शेतातील केमिकल खतांचा वापर अगदी शून्यापर्यंत आहे. त्यामुळे स्ट्रॉबेरीसाठी केमिकल खतांचा वापर खूप कमी केला जातो.
सध्या स्ट्रॉबेरी पिकवत असलेले शेतकरी ३०० ते ५०० रूपये किलोप्रमाणे स्ट्रॉबेरीची विक्री करतात. अजून सक्षम बाजारपेठ स्ट्रॉबेरीसाठी तयार झाली नाही पण लोकांना जसं माहिती होईल तसं स्ट्रॉबेरीची बाजारपेठ भिमाशंकरला निश्चित तयार होईल.
स्ट्रॉबेरी हे पीक आम्हाला आधी माहितीच नव्हतं. मागच्या दोन वर्षापूर्वी आम्ही पहिल्यांदा याची लागवड केली आणि त्यातून चांगले उत्पन्न यायला लागले. त्यामुळे आम्ही क्षेत्र वाढवत गेलो. येणाऱ्या काळात क्षेत्रामध्ये अजून वाढ करण्याचा आमचा मानस आहे.
- ढवळा रढे (फळोदे, ता. आंबेगाव)
शेतकऱ्यांमध्ये स्ट्रॉबेरीची जागृती होण्यासाठी मी स्वतःच्या शेतात स्ट्रॉबेरीची लागवड केली आणि शेतकऱ्यांना दाखवली. सध्या आदिवासी शेतकऱ्यांसाठी योजना असली तरी मी जेवढं शक्य होईल तेवढं महाविद्यालयात किंवा गरीब शेतकऱ्यांना स्वखर्चाने स्ट्रॉबेरीची रोपे वाटप करतो.
- ज्ञानेश्वर लोहकरे (कृषी सहाय्यक, पोखरी, ता. आंबेगाव)