अनिल गवई
शेती पिकविणे जिकरीचे झाल्याची ओरड होत असतानाच बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील अंत्रज येथील दोन युवा शेतकऱ्यांनी दोन एकर शेतात तब्बल ३६ टन सेंद्रिय कोहळ्याचे (काशिफळ) उत्पन्न घेतले आहे. या उत्पादनातून त्यांना तीन लाख ८० हजार रुपयांचे भरघोस उत्पन्न मिळाले. अवघ्या दोन ते अडीच महिन्यांमध्ये भरघोस उत्पादन मिळाल्याने दोन्ही भावंडांच्या यशोगाथेची परिसरात चर्चा होत आहे.
सततच्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती व्यवसाय संकटात सापडल्याची ओरड आहे. त्याचवेळी पावसाचाही लहरीपणा शेतकऱ्यांच्या मुळावर उठला असतानाच, खामगाव तालुक्यातील अंजत्र येथील युवा शेतकरी नितीन गजानन काळबांधे व पंकज काळबांधे या दोघा भावंडांनी सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून तसेच गत दहा वर्षांत सेंद्रिय शेतीच्या विविध प्रयोगांतून प्रगती साधली आहे. दोन एकरांत त्यांनी ३६ टन कोहळ्याचे उत्पादन घेतले.
सेंद्रिय खतामुळे जमिनीचा पोत सुधारला
काशिफळासाठी या शेतकऱ्यांनी मे महिन्यामध्ये जमिनीची नांगरटी करून रोटावेटर केले. नंतर आठ फुटांवर ट्रॅक्टरच्या सहाय्याने अडीच फूट रुंद आणि एक फूट उंच बेड तयार केले. ट्रॅक्टरनी बेड तयार करत असताना त्या भागामध्ये बायोडायनामिक पद्धतीने शेणखत व पालापाचोळ्यापासून कंपोस्ट खत तयार केले. तसेच एकरी चार ट्रॉली कंपोस्ट खताचा वापर केल्यामुळे जमिनीचा पोत सुधारल्याचे उत्पादनात वाढ झाल्याचा शेतकऱ्यांचा दावा आहे.
२५ किलोपर्यंतचे चकाकीदार फळ
सेंद्रिय पद्धतीमुळे दोन एकरांत या शेतकऱ्यांना आतापर्यंत ३६ टन उत्पादन झाले असून, १२ ते २५ किलो आकाराचे एक फळ आहे. या फळांना सुरुवातीला १५ रुपये तर शेवटी १० रुपयांपर्यंत भाव मिळाला. खामगाव, शेगाव, अकोट, अकोला येथील बाजारात या काशिफळांची विक्री करण्यात आली. उत्पादन खर्च ७० हजारांचा खर्च जाता शेतकऱ्यांना तीन ते तीन लाख २० हजार रुपयांपर्यंत नफा मिळाला.
गत आठ ते दहा वर्षांपासून सेंद्रिय शेतीकडे वळलो आहे. सातत्यपूर्व मेहनतीची फळ आता मिळायला लागली आहेत. सेंद्रिय शेतीत लहान भाऊ पंकजचे मोठे योगदान आहे. - नितीन काळबांधे