परिस्थिती कितीही बिकट असली किंवा माणूस कितीही गरीब कुटुंबातून आला तरी मनात जिद्द असेल तर यशाला गवसणी घालू शकतो. असे अनेक उदाहरण आपण पाहिले असतील. सोलापूर जिल्ह्यातील खेड्यागावातल्या अश्पाक मुलानी या तरूणानेही असंच काहीसं करून दाखवलंय. मुळात शेतकरी कुटुंबात जन्माला आलेल्या अश्पाकने यूपीएससीकडून कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयातील गंभीर गुन्हे तपास कार्यालयात सहाय्यक संचालक या पदासाठी घेण्यात आलेल्या परिक्षेत सातवा क्रमांक मिळवला आहे. विशेष म्हणजे एकूण १३ जागेसाठी अश्पाक हा महाराष्ट्रातून एकमेव उमेदवार यासाठी पात्र झाला आहे.
(Solapur Farmer Son UPSC Exam Success Story)
सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील देवडी हे अश्पाकचे मूळ गाव. अत्यंत गरीब, शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या अश्पाकचे आजोबा पारंपारिक मटण विक्रीचा व्यवसाय करायचे. घरी जमीन असल्यामुळे शेतीसुद्धा सुरू होती. पण आपली येणारी पिढी शिकली पाहिजे, त्यांनाही आपल्यासारखे काम करावे लागू नये असे मटण विक्री करणाऱ्या अश्पाकच्या आजोबांचे ध्येय होते.
रयत शिक्षण संस्थेच्या महाविद्यालयामध्ये कमवा आणि शिका या योजनेंतर्गत अश्पाकच्या वडिलांनी शिक्षण घेतले आणि ते पुढे शिक्षक म्हणून रुजू झाले. तर अश्पाकने विधीचे शिक्षण पूर्ण करून स्पर्धा परिक्षांच्या अभ्यासाला सुरूवात केली. पुढे मंत्रालयातील विधी व न्याय विभागासाठी एमपीएससीच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या परिक्षेमध्ये महाराष्ट्रात आठवा रँक मिळवून यश आले आणि तो मंत्रालयात लॉ ऑफिसर म्हणून रूजू झाला.
दरम्यान, डिसेंबर २०२३ मध्ये कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाच्या १३ पदांसाठी यूपीएससीकडून घेण्यात आलेल्या परिक्षेमध्ये अश्पाकला यश मिळाले आहे. तर या मंत्रालयातील गंभीर गुन्हे तपास कार्यालयात सहाय्यक संचालक म्हणून या अश्पाकची निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे १३ जागांसाठी झालेल्या या भरतीमध्ये अश्पाकने सातवी रँक मिळवली असून या पदासाठी महाराष्ट्रातील तो एकमेव मुलगा असल्याचं अभिमानाने सांगतो.
कॉर्पोरेट कंपन्यांचे व्यवहार आणि फसवणुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय स्थापन करण्यात आले आहे. कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये होत असलेल्या गंभीर फसवणुकीच्या गुन्ह्याचा सखोल तपास करणे, माहिती घेणे आणि सत्यता पडताळणीचे काम हे कार्यालय करते.
खऱ्या अर्थाने मटण विक्री करणाऱ्या आणि शेतकरी पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबात जन्माला आलेल्या अश्पाकने केवळ २४ व्या वर्षी हे यश मिळवून दाखवलं आहे. कितीही बिकट परिस्थिती असली तर आपण कशासाठी आलोय आणि आपल्याला कुठे जायचंय हे ध्येय पक्के असेल तर आपण नक्कीच तिथपर्यंत पोहचू शकतो असं सांगणाऱ्या अश्पाकने शेतकरी आणि ग्रामीण भागांतील तरूणांसमोर वेगळा आदर्श निर्माण केलाय.