Join us

Success Story : देवधानोऱ्यातील युवकाचा बिझनेस ॲनालिस्ट ते ॲग्रीकल्चर स्पेशालिस्ट कौतुकास्पद प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2024 2:15 PM

श्रीकृष्ण यांचे शिक्षण बी. कॉम., त्यानंतर 'एम.बी.ए. बिझनेस ॲनालिस्ट' हे पदव्युत्तर शिक्षण घेत पुण्यात जॉब सुरू केला. मात्र, लॉकडाऊनच्या पर्वात गाव गाठले अन् ते पुढे घरच्या शेतीमातीतच रमले. एकूणच एका 'बिझनेस ॲनालिस्ट' व्यक्तिमत्त्वाचा आपल्या प्रयोगशीलतेने होत असलेला 'ॲग्रिकल्चरल स्पेशालिस्ट' हा प्रवास कौतुकास्पद असाच आहे.

बालाजी आडसूळ

श्रीकृष्ण यांचे शिक्षण बी. कॉम., त्यानंतर 'एम.बी.ए. बिझनेस ॲनालिस्ट' हे पदव्युत्तर शिक्षण घेत पुण्यात जॉब सुरू केला. मात्र, लॉकडाऊनच्या पर्वात गाव गाठले अन् ते पुढे घरच्या शेतीमातीतच रमले. एकूणच एका 'बिझनेस ॲनालिस्ट' व्यक्तिमत्त्वाचा आपल्या प्रयोगशीलतेने होत असलेला 'ॲग्रिकल्चरल स्पेशालिस्ट' हा प्रवास कौतुकास्पद असाच आहे.

धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील देवधानोरा येथील श्रीकृष्ण चंद्रकांत बोंदर पाटील यांनी वाणिज्य शाखेत पदवी घेतली. यानंतर पुण्यातच 'एम.बी.ए.-बिझनेस ॲनालिस्ट' केले. हे पदव्युत्तर शिक्षण झाल्यानंतर लागलीच एक चांगली नोकरीही मिळाली.

सगळं काही अपेक्षानुरूप घडत असतानाच अचानक कोविड साथ अवतरली. यातील लॉकडाऊनच्या पर्वाने श्रीकृष्ण यांना गावाची वाट धरावी लागली. मग जिल्हा हिवताप कार्यालयात वैज्ञानिक अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या वडील चंद्रकांत बोंदर पाटील यांच्या हातात हात घालून ते शेतात रमले.

बोंदर यांना वडिलोपार्जित चाळीसेक एकर जमीन. दोन विहिरी, जमिनीची प्रतही चांगली. यामुळे एम.बी.ए. झालेल्या श्रीकृष्ण बोंदर पाटील यांनी 'आपला मुक्काम पोस्ट, आता गावीच' असा निर्धार करत पारंपरिक शेतीला नवप्रयोगाची जोड देण्याचा निर्णय घेतला.

शिमला चौथा प्रयत्नही फलदायी

जून महिन्यात श्रीकृष्ण बोंदर पाटील यांनी सहा बाय दोन फूट अंतरावर बेळगाव पोपटी या वाणाच्या २८ हजार रोपांची लागवड केली. योग्य मशागत व नियोजनाची फलनिष्पत्ती आज समोर दिसत असून, नुकताच ८०० किलोचा पहिला तोडा ३२ रुपये दराने विक्री झाला आहे. पुढे किमान २० ते २५ टन माल अपेक्षित आहे. यातून मोठी रक्कम हाती येईल, असा विश्वास व्यक्त केला.

एकरात बहरतो पेरू

श्रीकृष्ण बोंदर पाटील यांनी तीन वर्षांपूर्वी एका एकरात तैवान पिक या जातीच्या पेरूची लागवड केली. हा त्यांचा पहिलावहिला नवप्रयोग. योग्य नियोजन, मशागत करत यातून चांगले उत्पादन घेण्यास सुरुवात केली. पहिलाच बहर १६ टन भरला, त्यास किमान ४० ते कमाल ७० व सरासरी ६० रुपये किलोचा दर मिळाला. हा माल हैदराबाद, कांजीवरम येथे गेला.

टरबूज : साधली योग्य वेळ

आपल्या भारी जमिनीत श्रीकृष्ण बोंदर पाटील यांनी दोन एकरावर टरबुजाची लागवड केली. योग्य मशागत, द्विप व मल्चिंगचा अवलंब करत 'बाहुबली' या वाणाचे ४५ टन उत्पादन घेतले. रमजान महिन्याचा योग्य वेळ साधल्याने यास सरासरी ११ रुपयांचा किलोला दर पदरी पडला. सव्वालाखाचा खर्च वजा जाता बऱ्यापैकी पैसा हाती पडला.

.... तरीही टॉमेटो प्लॉट केला यशस्वी

तरकारी किंवा भाजीपाला पिके घेण्याचा बोंदर यांनी निर्णय घेतल्यानंतर दोन एकरांत लागवड करून तीनेक लाखांचा खर्च केला. त्यांचे साधारणपणे साडेतीनशे कॅरेट दीड हजाराने विक्री झाले. काहीकाळ करपा प्रादुर्भाव, तर कधी दराचा फटका जाणवला. तरी पण दीड हजारावर कॅरेट सरासरी साडेपाचशे रुपये दराने विक्री झाले. मागणी, दराची साथ राहिली असती, तर मोठे उत्पन्न हाती पडले असते, असे बोंदर यांनी सांगितले.

एक प्रवास : बिझनेस एक्स्पर्ट ते अॅग्रि. एक्स्पर्ट

श्रीकृष्ण बोंदर पाटील हे व्यवस्थापनाचे पदवीधर. यातही व्यवसाय विश्लेषक तथा बिझनेस ॲनालिस्ट, व्यवसाय, उद्योगाला नव्या वळणावर पोहोचविण्यात हातभार लावणारे शिक्षण झालेल्या या 'व्यवस्थापन' पदवीधराने आपले 'मॅनेजमेंट स्किल्स' व्यवसाय, उद्योगात नव्हे, तर चक्क शेतीत यशस्वी करून दाखवण्यास सुरुवात केली आहे. प्रत्येक वेळी नवे पीक यशस्वीरीत्या हातावेगळे करण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. इतर शेतकऱ्यांसाठी हे मोठे प्रेरक असल्याचे कृषी अधिकारी भुजंग लोकरे यांनी सांगितले.

हेही वाचा - Sericulture Success Story : पारंपरिक शेतीला फाटा देत महेशने शोधली रेशीम शेतीतून नोकरी

टॅग्स :शेती क्षेत्रमराठवाडाशेतकरीशेतीभाज्याबाजार