मराठवाडा आणि डाळबट्टी हे अनेक पिढ्यांचं समीकरण आहे. चविष्ट आणि इथल्या विविध सोहळ्यात रुचकर ठरणाऱ्या या डाळबट्टीतून आता उद्योग उभा राहिला आहे. पळसगाव (ता. खुलताबाद) येथील प्रदीप या तरुणाने डाळबट्टीसाठी लागणारे तयार पीठ (रेडी आटा) उद्योग उभारला आहे. ज्यातून प्रदीप आज वार्षिक ५० लाखांची उलाढाल करत आहे.
वडीलोपार्जित केवळ साडे पाच एकर क्षेत्र असल्याने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्यातील १५०० लोकसंख्येच्या पळसगाव येथील प्रदीप भोसले हा तरुण पदवीचे शिक्षण पूर्ण करून परिसरात संगणक प्रशिक्षण केंद्र चालवायचा. मात्र ग्रामीण भाग असल्याने अपेक्षित यश हाती लागलं नाही. ज्यामुळे त्याने नवीन काहीतरी सुरू करण्याचा निर्णय घेतला.
कुटुंबाच्या चर्चेनंतर प्रदीपने तयार बट्टी पीठ (आटा) तयार करण्याच्या प्रक्रियेस प्रारंभ करण्याचे ठरवले. मात्र अल्प भांडवल आणि मनुष्यबळाची कमतरता अशा विविध अडचणी समोर आल्या. या अडचणींवर मात करण्यासाठी प्रदीपने एका मित्राशी चर्चा केली आणि त्याच्या मदतीने (भागेदारी तत्वावर) उद्योग सुरू करण्याचे ठरवले.
यातून पुढे २०१७ मध्ये ४५ बाय ३५ शेड उभारून काही यंत्रांची खरेदी करून प्रदीप आणि मित्र युवराज भवर यांनी 'गजराज तयार बट्टी आटा' प्रक्रिया उद्योग सुरू केला. मात्र गेल्या दोन वर्षांपूर्वी काही अडचणी निर्माण झाल्याने भागीदारी संपवून सध्या प्रदीप एकट्याने हा प्रक्रिया उद्योग चालवत आहे. ज्यातून परिसरातील छत्रपती संभाजीनगर, जालना, जळगाव, अहिल्यानगर अशा चार जिल्ह्यांत पवार यांच्या तयार बट्टी पिठाची विक्री होते.
.. अन् तयार होतं 'डाळबट्टी पीठ'
बाजार समितीच्या अधिकृत परवाना द्वारे शेतकऱ्यांकडून मका, गहू, सोयाबीन, ओवा, बडीशोप आदींशी खरेदी केली जाते. शेतमाल खरेदी केल्यानंतर त्याची स्वच्छता आणि गुणवत्तेनुसार वर्गीकरण केले जाते. ज्यातून चांगल्या दर्जाच्या शेतमालाची निवड करून त्यावर पुढे प्रक्रिया जाते. ज्यात सर्वात आधी मका भरडून घेतला जातो. भरडलेला मका, गहू, सोयाबीन, बडीशोप, ओवा आदी घटक नंतर एकत्र करून त्याचे दळून बारीक पीठ तयार केले जाते. ज्यात हळद आणि खाण्याचा सोडा मिसळला जातो. त्यानंतर एक किलोच्या आकर्षक पॅकिंगमध्ये पीठ हवाबंद केले जाते.
विक्री व्यवस्थापन व प्रक्रिया उद्योगातून अनेकांना रोजगार
पिठाची विक्री करण्यासाठी प्रदीपने परिसरातील तरुणांना नोकरीवर ठेवले आहे. तसेच, शेतमालाची प्रक्रिया, पीठ तयार करणे आणि पॅकिंगसाठी काही तरुणांना वार्षिक रोजगार दिला जातो. ज्यातून भोसले यांच्या 'गजराज तयार बट्टी आटा' मध्ये आज दहा पेक्षा अधिक व्यक्ती काम करत आहेत.
शेतकऱ्यांनी शेतमालावर प्रक्रिया करायला शिकावं
शेतकरी शेतात पिकणारा शेतमाल थेट बाजारात विकून टाकतो. ज्यामुळे मोजकेच पैसे हातात येतात, यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती तशीच राहाते. नैसर्गिक संकटे, कमी दर, आणि कमी उत्पादन यामुळे शेतकऱ्यांना टिकाव ठेवायचा असेल तर शेतमालावर प्रक्रिया करणे अत्यंत गरजेचे आहे. - प्रदीप भोसले.