Lokmat Agro >लै भारी > अनेकांनी चेष्टा केली, तरीही धनंजयरावांची सफरचंद शेती यशस्वी झाली

अनेकांनी चेष्टा केली, तरीही धनंजयरावांची सफरचंद शेती यशस्वी झाली

success story dhananjay shelake of apple cultivation in Pandharpur | अनेकांनी चेष्टा केली, तरीही धनंजयरावांची सफरचंद शेती यशस्वी झाली

अनेकांनी चेष्टा केली, तरीही धनंजयरावांची सफरचंद शेती यशस्वी झाली

महाराष्ट्रात, त्यातही सोलापूरात सफरचंदांची लागवड यशस्वी करणाऱ्या धनंजय शेळके यांची ही यशकथा.

महाराष्ट्रात, त्यातही सोलापूरात सफरचंदांची लागवड यशस्वी करणाऱ्या धनंजय शेळके यांची ही यशकथा.

शेअर :

Join us
Join usNext

सोलापूरात सफरचंद लागवड? कसं शक्य आहे? असा प्रश्न तुमच्याप्रमाणेच कुणाच्याही मनात येईल. कारण सफरचंद हे थंड प्रदेशातलं फळ. भारतात हिमाचल प्रदेश, कश्मीर यासारख्या थंड प्रदेशात येणारं सफरचंद सोलापूरसारख्या तुलनेनं ३० डिग्रीपेक्षा जास्त तापमान असलेल्या प्रदेशात कसं येणार? समजा कुणी अशी लागवड केलीच तर लोक त्याला वेड्यात काढणार.

पंढरपूर तालुक्यातील धनंजय शेळके या प्रयोगशील तरुण शेतकऱ्यालाही परिसरातील लोकांनी असंच वेड्यात काढलं, कुणी टोमणे मारले, कुणी चेष्टा केली. पण तो खचून गेला नाही आणि अडीच वर्षांच्या मेहनत आणि चिकाटीतून पंढरपुरात सफरचंद पिकवता येतात हे त्यानं सिद्ध केलं. शेळके यांची दहा गुं‌ठ्यातली सफरचंदाची बाग पाहायला कृषी अधिकाऱ्यांपासून तर प्रयोगशील शेतकऱ्यांपर्यंत अनेकजण भेट देतात. अनेक शेतकरी त्यांचा या संदर्भात सल्लाही घेतात. असं असलं, तरी सफरचंद लागवडीचा हा प्रयोग इतका सोपा होता का? तर मुळीच नाही.

नोकरी सोडून धरली सफरचंदाची कास 
धनंजय शेळके वडिलांना एकुलते एक. मुळचे मोहोळ तालुक्यातले पण नंतर मामाच्या गावी पंढरपुर तालुक्यातील देगाव येथे कुटुंबासह स्थायिक झाले. देगाव म्हणजे देवाचे गाव. पूर्वी परकीयांच्या हल्ल्यापासून वाचविण्यासाठी पांडुरंगाची मूर्ती याच गावातील विहिरीत लपवून ठेवली होती. त्यामुळे या गावाला अध्यात्मिक महत्त्वही आहे. तर या गावातील दीड एकरावर त्यांच्या कुटुंबाचा कसाबसा उदरनिर्वाह चालत असे. एम. ए. इंग्रजी केल्यानंतर आणि नंतर कॉम्युटर हार्डवेअर नेटवर्कींग केल्यानंतर धनंजय यांनी बँकेला सेवा पुरविणाऱ्या कंपनीत नोकरी धरली. फिरतीचे काम आणि पगार मात्र कमी. घरात कमावणारे एकटेच असल्याने त्यांनी सात वर्षे नोकरी केली, पण अचानक कंपनीने पगार कमी केला. स्वाभिमानी बाण्याच्या धनंजय यांनी नोकरी सोडून शेती करायचा निर्णय घेतला. अर्थात त्याआधी ते शेतात काम करत होतेच. त्यांनी घरच्यांकडे केवळ दहा गुंठे जमीन प्रयोगाच्या शेतीसाठी मागितली. तोपर्यंत त्यांच्या डोक्यात सफरचंदाच्या लागवडीची कल्पना आलेली होती. पण त्यासाठी घरच्यांचं मन वळवणं फार अवघड होतं. पण अखेर हो-नाही करत घरच्यांनी परवानगी दिली.

आणि सुरू झाला एक कष्टमय प्रवास
‘तुम्हाला सांगतो, अडीच ते तीन वर्षांचा काळ असा होता, की मला उठता बसता, जेवताना, झोपताना केवळ सफरचंदच दिसत असे. वडीलांशीही मी याच विषयावर बोलायचो. मी सतत सफरचंदाविषयी इंटरनेटवरून माहिती मिळवायचो, इतरांचे प्रयोग पाहायचो आणि त्याच विषयात गुंतलेलो असायचो. त्यामुळं घरच्यांना माझी काळजी वाटू लागली…’ धनंजय सफरचंद लागवडीबद्दल सांगतात. हा मुलगा अशक्य वाटणारा प्रयोग करतोय, उद्या अपयशी झाला तर निराश होईल, शिवाय नोकरीही नाही मग कमावणार काय आणि खाणार काय? पण घरच्यांना आश्वस्त करत त्यांनी सफरचंद लागवडीसाठी कंबर कसली. बराच शोध घेतल्यानंतर उष्ण कटीबंधातही सफरचंद लागवड होऊ शकतील असे आठ ते दहा वाण असल्याचे त्यांना समजले आणि त्यानुसार ते कामाला लागले. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथील नर्सरीतून त्यांना पाहिजे असलेल्या वाणाची रोपे मिळाली. एचआरएमएन ९९, डोरसेट गोल्डन, अन्ना अशी १०० रोपे त्यांनी खरेदी केली. त्यासाठी सुमारे १७ हजार रुपये खर्च आला.

बागेत लगडलेली सफरचंदं
बागेत लगडलेली सफरचंदं

लागवडीला सुरूवात
हिमाचल प्रदेशात घन पद्धतीने सफरचंद लागवड होते. पण तिथे सूर्यप्रकाश आपल्यासारखा नसल्याने रोपे वाढल्यानंतर त्यांना विशिष्ट पद्धतीने बाक दिला जातो किंवा वेळोवेळी त्याची कटींग करावी लागते, पण महाराष्ट्रात मात्र उजेड असल्याने त्यांनी १० बाय १२ आणि १२ बाय १२ या अंतरावर रोपांची लागवड केली. सुरवातीच्या काळात गवार, कलिंगड, वाळकं, लसूण, मुळ्याच्या शेंगा अशी आंतरपिके त्यांनी घेतली. गवारीच्या उत्पन्नातून १३ हजार रुपये मिळाले. याशिवाय कलिंगड वाळक्यातूनही त्यांना पैसे मिळाले आणि रोपांचा खर्च त्यातून सुटला. रोपांची लागवड केली, पण आता खरी कसोटी सुरू होणार होती. धनंजय सांगतात की रोपे लावल्यापासून मी आजतागायत रोज खुरपं घेऊन रानात जातोय.

सफरचंद हे तसं अवघड पीक. मेहनत केल्याशिवाय आणि पूर्ण ज्ञान मिळविल्याशिवाय हे पीक तसं हातात येणार नाही. म्हणून लागवड केल्यापासून रोजच मी सफरचंदाचा ध्यास घेतला. मोकळ्या वेळात मोबाईलवरून या पिकाबद्दल माहिती मिळवू लागलो. या पिकाला कुठली अन्नद्रव्य कमी पडतात, कुठले रोग येतात याचा बारकाईने अभ्यास केला. खोड किडा, सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता, त्यामुळं पानं पिवळी पडणे, आयर्न क्लोरोसिस, बुरशी अशा ३१ रोग-किडींचा अभ्यास  त्यांनी केलाय. त्यावर सेंद्रीय पद्धतीने कशी मात करायची याचे ज्ञानही श्री. शेळके यांनी आत्मसात केलंय.

मुलाचा प्रयोग पाहून वडीलांनाही आनंद झाला.
मुलाचा प्रयोग पाहून वडीलांनाही आनंद झाला.

नातलगांचे टोमणे आणि घरच्यांची काळजी
नोकरी सोडल्यानंतर एका समारंभासाठी धनंजय गेले होते. तिथं त्यांना नातलगांनी टोमणे मारायला सुरूवात केली.  नोकरी सोडली आता दीड एकरवर तू काय शेती करणार आहेस, असं त्यांनी चिडवायला सुरूवात केली. त्यावर धनंजय म्हणाले की मी त्यावर प्रयोग करणार आणि एक दिवस सर्वांना कौतुक वाटेल असं काम करून दाखवणार. त्यांच्या वडीलांनाही त्यांची काळजी वाटायची, त्यावर त्यांनी वडीलांना सांगितलं की  आज जग माझ्यावर हसतंय पण मी एक दिवस पुरस्कार मिळवणार आणि तुमच्या हातात ठेवणार. धनंजय सांगतात की सुरूवातीला असा त्रास झाला खरा.

पण मी त्याकडे लक्ष न देता माझे प्रयोग करत गेलो. मी शेतात काय लावलंय याचा कुणालाच थांगपत्ता लागू दिला नाही. पण जेव्हा सफरचंद झाडाला लगडली, तेव्हा मात्र अनेकांची पावले माझ्या शेताकडं वळू लागली. टोमणे मारणाऱ्यांची बोलती बंद झाली. मात्र त्यासाठी माझी अडीच वर्षे मी घालवली. आजही माझ्या डोक्यात सफरचंदाचाच विचार असतो. अडीच काय दहा वर्षे गेली तरी मी हा प्रयोग सफल करेन आणि विठ्ठलाच्या गावातली सफरचंद लोकांपर्यंत घेऊन जाईन.

आणि मिळाले प्रयोगात यश
वडिलांना दिलेला शब्द धनंजय यांनी खरा केला. त्यांच्या शेतातील सफरचंदाला आता बहारही येऊ लागलाय. आणि तो पाहायला अनेक शेतकरी, अधिकारी, पत्रकार त्यांच्याकडे येऊ लागले आहेत. प्रत्येक मातीतल्या फळाची चव वेगळी असते, त्यानुसार येथील फळांची चवही वेगळी आहे. थोडीशी आंबट-गोड, पण खाणाऱ्या प्रत्येकाला ती आवडत आहे. प्रयोगाअंती धनंजय यांच्या असं लक्षात आलंय की चार वर्षानंतरच बहार घेणं चांगलं. म्हणून आता ते चौथ्या वर्षी बहार घेणार आहेत. कोरोना काळात त्यांनी ही लागवड केली होती. स्व परागीभवन करणारी ही झाडे आहेत. तर काही अंतर्गत परागीभवन करतात. म्हणजे त्यासाठी मधमाशा किंवा बाह्य बाबींची मदत घ्यायला लागत नाही. येथील फळ सुमारे १०० ते  १५० ग्रॅम वजनाचे येते. मे ते जून या कालावधीत सफरचंदाचा बहार येतो. एका झाडाला सुमारे पंधरा किलो पर्यंत उत्पन्न मिळते.

लागवड केल्यावर अकरा महिन्यातच सफरचंदाचा बहार आला होता. केवळ घरच्यांचा आणि टोमणे मारणाऱ्यांचा विश्वास बसावा म्हणून तो बहार घेतला, आता मात्र चार वर्षांनीच बहार घेणार असे धनंजय सांगतात.

सेंद्रीय पद्धतीचा अवलंब
मी सफरचंदाची शेती पूर्णपणे सेंद्रीय पद्धतीने करतो. जीवामृताचा वापर, सेंद्रीय खत, हरळ यांचा नैसर्गिक वापर मी करतो, असे धनंजय सांगतात. सफरचंदांला त्यांनी ड्रीप बसवले आहे. तसेच गांडुळांचाही वापर ते शेतात करतात. सफरचंदासाठी हलकी जमीन लागते, पण धनंजय शेळके यांची जमीन तर काळी कसदार होती. त्यात पाण्याचा निचरा कसा होणार? मग त्यांना उपाय सूचला. त्यांनी शेतात वाढणारी हरळ तशीच ठेवली. त्याची निंदणी केली नाही. त्यामुळं होतं काय की ही हरळ जमिनीतील अतिरिक्त पाणी शोषून घेते. तसेच कीड येते, तेव्हा ती सर्वप्रथम या हरळीवर जाते.

त्यामुळे प्रत्यक्ष रोपाला त्रास होत नाही. याशिवाय जमिनीवर आच्छादन असल्याने उन्हाचा त्रास होऊन गांडुळांची कार्यक्षमता कमी होण्याचा धोकाही वाचतो, असे कितीतरी उपयोग या हरळीचे होतात.  त्यांनी सफरचंदाच्या प्रत्येक रांगेच्या शेवटी तुळशीचे रोपही लावले आहे. याशिवाय ॲव्हॅकॅडो, अंजीर अशी फळझाडेही शेतात लावून मिश्र पीक पद्धतीचा वापर केला आहे. म्हणजे भविष्यात सफरचंदाच्याच उत्पन्नावर अवलंबून न राहता इतरही फळझाडांपासून उत्पन्न मिळेल.

इतरांनाही करतात मार्गदर्शन
धनंजय शेळके यांच्या जिद्दीचा हा प्रयोग बऱ्याच शेतकऱ्यांना आता माहीत झाला आहे. असे शेतकरी त्यांना माहिती आणि अनुभवासाठी व कृषी सल्ल्यासाठी संपर्क करतात. त्यांनाही ते मार्गदर्शन करतात. मध्यंतरी यवतमाळ येथील जगदीपसिंह काळे या शेतकऱ्याला त्यांनी मार्गदर्शन केलं. श्री काळे यांच्या शेतातही सफरचंदे पिकली आणि त्यांनी ती थेट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पाठवली. गडकरी यांनीही या महाराष्ट्रीय सफरचंदाचे कौतुक केलेच शिवाय त्यांच्या कार्यालयातून धनंजय शेळके यांना सफरचंदावर मार्गदर्शन करण्यासाठी पाचारणही करण्यात आले. मी हा सल्ला मोफत देतो, शिवाय युट्यूब, फेसबुकवर व्हिडीओद्वारेही शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतो, असे शेळके नम्रपणे सांगतात. आज त्यांना टोमणे मारणारी आणि त्यांच्यावर हसणारी तोंडं बंद झाली आहेत. त्याच्या घरच्यांनाही त्यांचा अभिमान वाटतोय.

मध्यंतरीच्या काळात कौटुंबिक जबाबदारीमुळं त्यांनी वर्षभरापूर्वी पुन्हा नोकरी धरली. पण त्यांचं लक्ष मात्र अजूनही सफरचंदाकडेच असतं. लवकरच पावसाळ्यानंतर छाटणी करने आणि मग पुढच्या वर्षी चौथ्या वर्षाचा बहार येईल. तेव्हा मी स्वत: सफरचंद मार्केटमध्ये विकणार असल्याचे त्यांनी मोठ्या आत्मविश्वासाने सांगितले. माझ्या या प्रयोगामुळे दुष्काळी सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उत्पन्नाचे नवे साधन मिळेल. शिवाय हवामान व बदलत्या पाऊसमानावरही त्याचा उपयोग होईल अशी आशाही ते व्यक्त करतात.

धनंजय शेळकेंचा अनुभवाचा सल्ला 
मित्रांनो, जेवढे विकता येईल तेवढेच पिकवायला शिकले पाहिजे आपल्या मालाची किंमत आपल्याला ठरवता आली पाहिजे.. शंभर रुपये खर्च करून दोन रुपये फायदा घेण्यापेक्षा, दोन रुपये खर्च करून शंभर रुपये कसे मिळतील याचा विचार आपण जोपर्यंत करणार नाही तोपर्यंत मित्रांनो आपला जगाचा पोशिंदा, माझा शेतकरी राजा कधी सुखी होणार नाही. शेती करताना विचार बदला नशीब नक्कीच बदलेल. 

संपर्क: 
धनंजय शेळके, देगाव, पंढरपूर
मो. क्र. :91 99601 29427

Web Title: success story dhananjay shelake of apple cultivation in Pandharpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.