Join us

Success Story : दुष्काळातही शेडनेट शेतीच्या मदतीने लाखोंचे उत्पन्न घेणारे प्रयोगशील भुतेकर; वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 03, 2024 6:54 PM

कोरडवाहू शेतीमध्ये शेडनेटच्या मदतीने भाजीपाला पिकातून वर्षाला खर्च वजा जाता त्यांना साडेतीन लाख रुपये इतका निव्वळ नफा मिळत आहे. शेडनेट शेतीतून भुतेकर यांना आर्थिक स्थैर्य प्राप्त झाले आहे. वाचा सविस्तर (Success Story)

भगवान भुतेकर

जालना तालुक्यातील हिवर्डी येथील पुंजाराम भुतेकर या तरुण शेतकऱ्याने जिद्द, चिकाटी आणि परिश्रमाच्या जोरावर शेतीमध्ये असाध्य अश्या गोष्टी साध्य करून दाखविल्या आहेत. पुंजाराम यांनी कोरडवाहू शेतीमध्ये शेडनेट उभारून भाजीपाल्याची लागवड करत आधुनिक शेतीची कास धरली. आज याच शेतीतून आर्थिक स्थैर्य मिळविले आहे. 

हिवर्डी हे दीड हजार लोकवस्तीचे गाव. शेतकरी कुटुंबात जन्मलेले पुंजाराम तीन वर्षाचे असताना त्यांच्यावरील आईचे छत्र हरवले. दुःखाचा डोंगर उभा असताना वडिलांनी दहावीपर्यंत शिक्षण दिले. घरातील दारिद्रय आणि चार एकर कोरडवाहू शेती. कुटुंबाचा गाडा हाकताना वडिलांची होणारी दमछाक पाहवत नसल्याने दहावीनंतर पुंजारामने वडिलांबरोबर शेती करण्याचा निर्णय घेतला.

कोरडवाहू शेतीतून फारसे उत्पन्न मिळत नसले. तरी, कोलमडून न जाता जिद्द, चिकाटी आणि परिश्रमाचे सातत्य कायम ठेवले. सुरूवातीला पारंपारिक कपाशी, सोयाबीन हे पीक घेत असताना खर्चाच्या तुलनेत अपेक्षित उत्पन्न मिळत नव्हते. त्यांनी शेतीतील नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती नव्हती. 

त्यासाठी त्यांनी खरपुडी येथील कृषी विज्ञान केंद्राचे मार्गदर्शन घेतले. शेतीला जोड व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसाय, शेळीपालन, म्हैसपालन असे व्यावसायासोबतच दहा गुंठ्यावर शेडनेट करुन भाजीपाला उत्पादन करण्यास सुरुवात केली. 

कोरडवाहू शेतीमध्ये शेडनेटच्या मदतीने भाजीपाला पिकातून वर्षाला खर्च वजा जाता त्यांना साडेतीन लाख रुपये इतका निव्वळ नफा मिळत आहे. शेडनेट शेतीतून भुतेकर यांना आर्थिक स्थैर्य प्राप्त झाले आहे.

जिद्दीची शासनाकडून दखलअनेक जण शेतीमध्ये नुकसान झाल्याने किंवा थोड्याच्या अपयशाने खचून जाऊन टोकाचे पाऊल उचलतात. परिणामी, ते कुटुंबीयांची देखील पर्वा करत नाहीत.

पुंजाराम यांनी मात्र शेतीमध्ये सातत्याने अपयश आले तरी, न डगमगता घरच्यांना आणि स्वतःला धीर देत कोरडवाहु असलेल्या शेतीमध्ये सातत्याने विविध प्रयोग करून यशस्वी व प्रयोगशील शेतकरी म्हणून यश मिळविले. त्यांच्या या कष्टाची राज्य शासनाने दखल घेऊन त्यांना सन २०१८ मध्ये शेतीनिष्ठ पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीकृषी योजनाशेती