गोपाल माचलकर
पाण्याचे टंचाई असणाऱ्या भागात संरक्षित सिंचन सुविधा अधिक आवश्यक असते. अशा भागात शेतकऱ्यांना सिंचन सुविधेसाठी पाणी साठवणूकीसाठी शेततळे बांधण्यासाठी एकात्मिक फलोत्पादन विकास योजनेअंतर्गत अनुदान दिले जाते.
या योजनेचा लाभ घेत वाशिम जिल्ह्याच्या हिसई (ता. मंगरुळपीर) येथील बाळासाहेब जाधव या शेतकऱ्यांनी शेततळे साकारले आणि आपल्या फळपिकांना जीवदान देत चांगले उत्पादन मिळविले आहे.
जाधव यांनी ३४ मी. लांब ☓ ३४ मी. रुंद आणि ४.७० मी खोल असे शेततळे तयार केले आहे. ज्यास प्लास्टीकचे आच्छादनही करण्यात आले आहे. पावसाळ्यामध्ये विहिरीचे पाणी टाकून सदरील शेततळे पूर्ण भरून ठेवले जाते तर उन्हाळ्यात टंचाई निर्माण होताच या पाण्याचा सुयोग्य वापर केला जातो.
या संरक्षित सिंचनावर संत्रा, सीताफळ, पेरू इ. फळबाग जाधव यांनी यशस्वी जगविल्या आहेत. सद्यस्थितीत देखील मुबलक पाणी सिंचनासाठी उपलब्ध आहे. विशेष की, जाधव यांनी आपल्या फळबागांत ठिबक सिंचनाचा प्रभावी वापर करुन सिंचनाखाली आणल्या आहेत.
'असे' आहे बाळासाहेबरावांचे उत्पन्न
यावर्षी एक हेक्टर पेरू फळबागेतून फोम न लावता अडीच लाखाचे उत्पन्न झाले आहे. तर तीन एकर सिताफळ या फळबागेतून दोन लाखांचे उत्पन्न झाले आहे. तसेच संत्रा पिकातूनही भरघोस उत्पन्न होऊ शकते असे बाळासाहेब जाधव यांनी सांगितले आहे.
कृषी विभागाची मोलाची साथ
कृषी सहाय्यक पुरुषोत्तम उखळकर, कृषी पर्यवेक्षक भास्कर लढाड, मंडळ कृषी अधिकारी शिवाजी अंभोरे, तत्कालीन कृषी सहाय्यक अमोल हीसेकर आदींचे बाळासाहेब यांना वेळोवेळी मार्गदर्शन लाभत असल्याचे ते सांगतात.
कृषी विभागाच्या अनुदानातून शेततळे उभारून पारंपारिक पिकांना फाटा देत कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली फळबागेची लागवड केली. ज्या माध्यमातून आज माझे आर्थिक स्त्रोत अधिक बळकट झाले आहे. - बाळासाहेब जाधव, शेतकरी, हीसई.