Join us

Success Story : आसोला येथील शेतकरी सुधाकर कमवत आहेत हनुमान फळातून लाखोंचे उत्पन्न वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 09, 2024 1:05 PM

आसोला येथे दीड एकरात हनुमान फळाची यशस्वी लागवड केली आहे. वाचा सविस्तर (Success Story)

Success Story :

प्रमोद खडसे / वाशिम : पारंपरिक पीक पद्धतीला बगल देत शेतकरी नवनवीन प्रयोग शेतीत करीत आहेत. असाच आगळावेगळा प्रयोग वाशिम तालुक्यातील आसोला येथील शेतकरी सुधाकर इंगोले यांनी केला आहे. 

त्यांनी जवळपास दीड एकरात हनुमान फळाची यशस्वी शेती केली आहे. त्यांच्यासोबत गावातील इतरही शेतकरी हनुमान फळाची लागवड करण्याकडे वळले आहेत. ते वर्षाला लाखाचे उत्पन्न घेत आहेत. बाजारात अनेक फळे आहेत. 

त्यामध्ये रामफळ, सीताफळ व इतर फळे परिचित आहेत; परंतु हनुमान फळ फारच कमी ओळखले जाते. जवळपास २० वर्षांपूर्वी ह्या फळाची यशस्वी शेती करून असोला गावातील शेतकरी विठ्ठलराव बरडे यांनी हा प्रयोग केला होता. ते इंगोले यांनी पाहिले होते. त्यातूनच त्यांना हनुमान फळ शेतीची कल्पना आली. 

अत्यंत कमी पाण्यात येणारे हे पीक आहे. याला कोणतेही रासायनिक खत किंवा फवारणीची गरज नाही. सीताफळ आणि रामफळ याच प्रजातींचे हे फळ आकाराने मोठे आणि चवीलाही अत्यंत गोड आहे.

सीताफळ आणि रामफळापासून क्रॉस ब्रीडिंग करून हनुमान फळाची लागवड केली जाते.  या फळाचे शास्त्रीय नाव 'ॲनोना २' असे असून, स्थानिक भाषेत त्याच्या आकारामुळे त्याला 'हनुमान फळ' असे नाव पडले आहे. 

या फळात कॅन्सर प्रतिरोधक औषधी गुणधर्म असल्याचेही सांगितले जाते. तर इतरही आजारांवर हे फळ गुणकारी आहे. ह्या फळाचे आवरण जाड असल्याने तोडणीनंतर पाच ते सहा दिवस हे फळ चांगले टिकून राहते. 

त्यामुळे जिल्ह्यासह, मुंबई पुण्यालाही पॅकिंग करून ही फळे पाठवली जातात; तर वाशिम - शेलूबाजार रोडवर शेताजवळच स्टॉल लावूनही शेतकरी फळाची विक्री करतात. 

शंभर ते दीडशे रुपये किलोप्रमाणे या फळाला दर मिळतो. हे फळ महाग असले तरी सेंद्रीय पद्धतीने उत्पादन घेऊन नैसर्गिकरीत्या पिकवलेले असल्याने हनुमान फळाला चांगली मागणी असते. इतर पारंपरिक पिकांपेक्षा यातून चांगला नफा मिळत असल्याचे शेतकरी सांगतात. 

आसोला येथील सुधाकर इंगोले यांनी जवळपास दीड एकरात हनुमानफळाची शेती केली. पाच वर्षे लागवड खर्च झाल्यानंतर दरवर्षी हनुमान फळाचे उत्पादन घेतले जाते. एकदा लागवड केल्यानंतर प्रत्येक वर्षी हनुमानफळाचे उत्पादन घेता येते. यातून वर्षाला लाखभर रुपयाचे उत्पन्न मिळत असल्याचे सुधाकर इंगोले सांगतात.

हनुमान फळाला असते मागणी

• हनुमान फळात कॅन्सर प्रतिरोध औषधी गुणधर्म असल्याचेही सांगितले जाते. तर इतरही आजारावर हे फळ गुणकारी आहे.

• ह्या फळांचे आवरण जाड असल्याने तोडणी नंतर पाच ते सहा दिवस हे फळ चांगले टिकून राहते. 

• शंभर ते दीडशे रुपये किलोप्रमाणे या फळाला दर मिळतात.

• हे फळ महाग असले तरी सेंद्रिय पद्धतीने उत्पादन घेऊन नैसर्गिकरित्या पिकवलेले असल्याने हनुमान फळाला चांगली मागणी असते.

उत्पादन ते थेट विक्री

• आसोला येथील शेतकरी सुधाकर इंगोले हे त्यांच्या शेतात हनुमान फळाची शेती करतात.

• पिकांची वाढ चांगली असून रस्त्याच्या कडेलाही विक्री करतात. तसेच त्यांची फळे इतर शहरातही पाठविण्यात येतात.

टॅग्स :शेती क्षेत्रफळेपीक व्यवस्थापनशेतीशेतकरी