रविंद्र शिऊरकर
शेतीला मजुरांची गरज, त्यात मजुरांच्या समस्येपुढे अनेक शेतकरी हतबल. यातून मार्ग शोधत फळबाग लागवडीसह दोन भावांनी आता शेततळ्यात शिंपल्यांची शेती करण्यास सुरुवात केली आहे.डाळींब उत्पादनातून भरघोस उत्पन्न घेत आता सिताफळासह शिंपले शेतीची कास धरली आहे.
छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूरमधील खरज तालुका. वासुदेव कुंदे यांना वडीलोपार्जित ४० एकर शेती. दुष्काळी पट्टा. मजुरांच्या समस्येपूढे संपूर्ण शेतीतून पीक घेणं अशक्य झालं. दोन्ही मुलं मोठी झाल्यावर त्यांनी शेतीची जबाबदारी मुलांवर सोपवली.नोकरीमागे न जाऊ देता दोघांनाही शेतीत रुजविले. दिपक व अविनाश हे आज आपल्या परिवाराच्या मदतीने आपली शेती उत्तम रितीने पाहत आहे. चांगलं उत्पन्नही कमवत असल्याचे समाधान वासुदेव यांनी व्यक्त केले.
सध्या कुंदे यांच्या ४० एकर क्षेत्रात १६ एकर डाळिंब, सुपर गोल्डन जातीचे ७ एकर सिताफळ गेल्या वर्षात लावले आहे. उर्वरित क्षेत्रात पारंपरिक कपाशी, मका, हरभरा, ज्वारी अशी पिके घेतली जातात.
डाळिंब लागवड, व्यवस्थापन
अविनाश व दिपक यांनी शेती बघण्यास सुरुवात केली आणि पुढे फळबाग कारण्याचे ठरवले. त्यातून २०१३ मध्ये त्यांनी भगवा जातीच्या कलमांची १३×८ अंतरावर साडे सात एकर मध्ये लागवड केली.अनुभवातून शिकत सुधारणा करत आज ही बाग टप्याटप्याने १६ एकर पर्यंत विस्तारली असून ज्यात १५×७ अशी नेहमीची लागवड आहे. सोबत एक प्रयोग म्हणून त्यांनी १५×४.६ घन पद्धतीची देखील काही एकरांत लागवड केली होती. ज्यात लागवड करून पुढे एक किंवा दोन तोडे घेत त्यानंतर मधले झाड काढले जाते, यामुळे आतील जागा वापरात येत असल्याचे अविनाश सांगतात.
वार्षिक एकरी टन शेणखत डाळिंबास दिले जाते तसेच विविध सेंद्रिय अन्नद्रव्य दिले जाते. तेल्या व इतर बुरशींसाठी वेळोवेळी बुरशीनाशकांच्या फवारण्या घेतल्या जातात. मात्र यात ही जमिनीची जैविकता जपून ठेवली तर बुरशींचा त्रास अधिक होत नसल्याचे ते सांगतात. पाणी व्यवस्थापन
पाण्यासाठी जवळील मन्याड तलावातून दोन पाईपलाईनद्वारे शेतातील विहिरीत पाणी आणले जाते. जे शेतीसाठी उपयोगात घेतले जाते. तसेच १ एकर १० गुंठे क्षेत्राचे एक शेततळे केले असून त्यातून उन्हाळ्यात बाग जगवली जाते.
शेततळ्यात शिंपले व मासे
शेततळ्यातील पाण्यात कोंबडा जातीच्या माशांचे बीज टाकले असून त्यासोबत या पाण्यात २०२२ डिसेंबरमध्ये ३००० शिंपले सोडले. त्याद्वारे आता मोती विक्री होणार आहे.सध्या हे मोती विक्रीयोग्य आहे. मात्र, बाजारभाव कमी असल्याने त्यांनी काढलेले नाही.
शिंपल्यांचे व्यवस्थापन, विक्री मूल्ये व खर्च
१०० रुपये प्रति शिंपला या भावाने हे शिंपले विकत घेऊन ते पाण्यात सोडले. त्यांना वेळोवेळी स्पिरुलिनाचे खाद्य दिले जाते. तसेच माश्यांच्या हालचालीमुळे शिंपल्यांना ऑक्सिजन मिळतो. यातून वार्षिक साधारण ३-३.५ लाख खर्च या शिंपल्यांचे संगोपन करताना येतो.सध्या विक्री योग्य असलेल्या या मोत्यांमधून १२ ते १५ लाख रुपये अपेक्षित उत्पन्न अविनाश यांना आहे.
डाळिंब उत्पादन व उत्पन्न
विविध टप्यात लागवड असल्याने काही बागेतून उत्पादन कमी असून सरासरी गेल्या वर्षी १२०-३० टन डाळिंब उत्पादन मिळाले. जागेवर योग्य दर न मिळाल्याने नाशिक, नामपूर, सटाणा, राहता, मालेगाव मार्केट ला सरासरी ७० ते ८५ रुपये दराने विक्री केली असल्याचे अविनाश सांगतात.