Join us

Success Story : मेहनतीला मिळाली बाजारभावाची साथ; विनायक यांची आंतरपिकांत जोरदार कमाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2025 17:52 IST

Farmer Success Story : बारावीपर्यंत शिक्षण घेतलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील लाखनवाडा येथील विनायक यांनी नोकरीच्या शोधात मोठ्या शहरांकडे वळण्याऐवजी आधुनिक शेतीत अधिक उत्पन्न कसे घेता येईल, याचा विचार करून आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब केला.

संताराम तायडे 

बारावीपर्यंत शिक्षण घेतलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील लाखनवाडा (ता. खामगाव) येथील विनायक सावळे यांनी नोकरीच्या शोधात मोठ्या शहरांकडे वळण्याऐवजी आधुनिक शेतीत अधिक उत्पन्न कसे घेता येईल, याचा विचार करून आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब केला.

त्यानुसार खरिपात कपाशी घेतल्यानंतर शेतात काटकसरीने पाण्याचा वापर करून आंतरपीक पद्धतीने टरबूज आणि मिरचीची लागवड केली. ज्यातून १५०० क्विंटल टरबुजाचे उत्पादन मिळाले. त्याला प्रतिकिलो १०-१२ रुपये दर मिळून आठ लाख रुपयांचा निव्वळ नफा झाला सावळे यांना झाला.

त्याचवेळी मिरचीच्या उत्पादनातून दोन लाख रुपये अधिकचा नफा मिळाला. कोरडवाहू शेतीला पर्याय म्हणून अत्याधुनिक व नियोजनबद्ध शेतीची कास धरत लाखनवाडा येथील युवा शेतकरी विनायक सुभाष सावळे यांनी उन्नतीचा मार्ग शोधला.

सध्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या सहकार्याने टिश्यू कल्चर केळीची लागवड त्यांच्या शेतात आहे. केळीच्या प्रत्येक झाडाला १७-१८ किलोचा घड लागल्यास एकूण ६००-७०० क्विंटल उत्पादन मिळेल. दर टिकून राहिल्यास २ ते ३ लाख रुपयांचे उत्पन्न मिळू शकते, असा अंदाज सावळे यांनी व्यक्त केला.

शेततळ्यात साठवले पावसाचे पाणी

गट क्रमांक ११९ मध्ये शेततळे खोदून त्यात पावसाचे पाणी साठवले. शासनाच्या साहाय्याने मिळालेल्या शाश्वत जलसंधारणामुळे त्यांची शेती आता अधिक उत्पादनक्षम झाली आहे. त्यासाठी त्यांना कृषी सहायक गजानन ढोरे यांनी मार्गदर्शन केले.

पारंपरिक शेती परवडणारी नव्हती. मात्र, कृषी सहायक गजानन ढोरे यांच्या मार्गदर्शनामुळे शाश्वत सिंचन शेती करण्याचा निर्णय घेतला. - विनायक सावळे, शेतकरी, लाखनवाडा.

हेही वाचा : Farmer Success Story : आधुनिक शेती तंत्रज्ञानाने साधली प्रगती; गोपालरावांची ८ एकरात ४८ लाखांची कमाई

टॅग्स :शेतकरी यशोगाथाशेती क्षेत्रबुलडाणाविदर्भशेतीबाजार