नितीन कांबळे
गेल्या काही वर्षांपासून शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांना प्रभावी गुंतवणुकीतून अधिक उत्पन्न मिळवण्यास मदत होत आहे. अनेक शेतकरी सध्या पारंपरिक पद्धतीने शेती न करता, शेतामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत, वार्षिक लाखोंचे उत्पन्न मिळवत आहे.
काही जण गलेलठ्ठ पगाराच्या नोकरीला रामराम ठोकत, शेतीमध्ये आपले नशीब आजमावत आहेत. आष्टी तालुक्यातील दादेगाव येथील शेतकरी मुरलीधर पठारे यांनी जिद्द व चिकाटीच्या जोरावर तैवान पिंक पेरूच्या माध्यमातून अडीच लाखांच्या खर्चात १५ लाखांचे उत्पन्न घेत उत्तम शेतीचा प्रयोग यशस्वी केला आहे. मुरलीधर पठारे यांनी कर्जत तालुक्यातील पाटेगाव येथील नातेवाइकांनी केलेली फळबाग शेती पाहिली आणि इथूनच प्रेरणा घेत बागेची तयारी केली.
त्यांनी २०२१ साली पाटेगाव येथून १८५० तैवान पिंक पेरूची रोपे आणली. ७० गुंठ्यांत १० बाय ५ पद्धतीने लागवड करून ठिंबक सिंचनच्या माध्यमातून पाण्याची सोय साली पाटेगाव येथून १८५० तैवान पिंक पेरूची रोपे आणली.
७० गुंठ्यांत १० बाय ५ पद्धतीने लागवड करून ठिंबक सिंचनच्या माध्यमातून पाण्याची सोय केली. साधारण २२ महिन्यांपासून फळाला सुरुवात झाली. तीन वर्षांत रोपे, फवारणी, मजुरी, ठिंबक सिंचन असा एकूण २ लाख ५० हजार रुपये खर्च झाला. या बागेत मुरलीधर पठारे व त्यांची पत्नी सुनंदा पठारे यांनी मेहनत करत आजपर्यंत १५ लाख रुपयांचे उत्पन्न घेतले आहे.
कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन
शेतकरी पारंपरिक शेती शक्यतो करत नाही. प्रत्येक घरात मुले शिकल्याने व नवीन शेतीविषयक तंत्रज्ञान अवगत झाल्याने शिक्षणाचा व ज्ञानाचा फायदा आधुनिक शेती करताना वापरत आहेत. कृषी विभागाकडूनदेखील शेतकयांना वेळोवेळी मार्गदर्शन केले जात आहे.- गोरख तरटे, तालुका कृषी अधिकारी, आष्टी.
व्यापारी करतात तोडणी अन् खरेदी
■ विशेष म्हणजे दादेगावसारख्या दुष्काळी ग्रामीण भागातील पेरू थेट गुजरातच्या बाजारपेठेत दाखल होत असून, तिथे मागणीही चांगली आहे.
■ आधी शेतकऱ्याने पिकवलेल्या फळबागा स्वखर्चाने तोडणी करत मुंबई, पुणे, नगर यासह अन्य ठिकाणच्या बाजारपेठेत घेऊन जावे लागायचे. पण आता व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांच्या शेतात येऊन तोडणी व खरेदी केली जात आहे.
■ यामुळे शेतकऱ्याचा खर्च वाचत असून भावही चांगला दिला जात असल्याचे कडा येथील फळ व्यापारी इब्राहिम सय्यद यांनी 'लोकमत अॅग्रो' ला सांगितले.