सुभाष सुरवसे
कल्पकता, त्यातून निर्माण होणारी स्वप्न अन् ती पूर्णत्वात नेण्यासाठी कष्ट करण्याची तयारी अंगी असली की हमखास यश पदरात पडतेच. परभणी जिल्ह्याच्या सोनपेठ तालुक्यातील नरवाडी येथील शेतकरी कृष्णकुमार जोगदंड यांनी काळ्या आईच्या कुशीत घेतलेले काकडीचे उत्पादन हे याचे एक बोलके उदाहरण आहे.
त्यांनी १ एकर काकडी लागवडीतून तब्बल ११ लाखांचे उत्पादन मिळविले आहे. नरवाडी येथील कृष्णकुमार जोगदंड यांनी पारंपरिक शेतीला फाटा देत शेडनेटमधील काकडीच्या उत्पादन घेण्याचा निर्णय घेतला.
काकडी उत्पादन घेणाऱ्या राज्यातील शेतकऱ्यांशी संपर्क साधून काकडी उत्पादनासाठी वाणाची निवड, खते, औषधी आर्दीची माहिती घेतली. त्यानंतर कृष्णा यांनी तीन शेडनेट तयार केले. त्यातील एक एकरमध्ये काकडीची लागवड केली. या एक एकर शेडनेट मधील काकडीचे जवळपास ४३ टन काकडीचे उत्पादन मिळाले आहे.
निव्वळ उत्पन्न ९ लाख रुपये
• कृष्णकुमार जोगदंड यांनी काकडीचे १२ तोडे करून विक्री केली.
• गुणवत्ता आणि दर्जा चांगला असल्याने बाजारात दरही चांगला मिळाला. त्यांना ११ लाखांचे उत्पन्न झाले.
• यासाठी त्यांना दोन लाखांचा खर्च आला. एक एकर शेतीमधून त्यांना जवळपास निव्वळ ९ लाख रुपयाचे उत्पादन झाले आहे.
कोल्हापुरी बंधाऱ्याचा फायदा
कृष्णा जोगदंड यांच्या शेताच्या शेजारीच कोल्हापुरी पद्धतीचा बंधारा बांधलेला असून या बंधाऱ्यांमध्ये पावसाळ्यामध्ये मुबलक प्रमाणात पाऊस झाल्यामुळे या पावसाचे पाणी साचले आहे. याच साचलेल्या पाण्याचा निचरा होऊन त्यांच्या शेतातील इंधन विहिरीला मुबलक प्रमाणामध्ये पाणी आहे. त्यामुळे कोल्हापुरी बंधाऱ्याचा फायदा या इंधन विहिरीला झाला आहे.
शिमला मिरचीचे उत्पादन
कृष्णा जोगदंड यांनी आपल्या शेतामध्ये एक एकरचे एक याप्रमाणे तीन एकर मध्ये तीन शेडनेट घेतले असून दोन शेडनेट मध्ये त्यांनी काकडी तर एका शेडनेट मध्ये शिमला मिरचीचे उत्पादन घेत आहेत.
आमदारांनाही आवरता आला नाही मोह
सोनपेठ तालुक्यातील नरवाडी येथील शेतकरी कृष्णा जोगदंड यांनी आगळ्या वेगळ्या पद्धतीने शेती करून काकडीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतल्याची माहिती मिळताच आमदार राजेश विटेकर यांनी जोगदंड यांच्या शेतातील काकडी, शिमला मिरची पिकाची पाहणी करून आढावा घेतला, यावेळी कृष्णकुमार जोगदंड, अर्जुनकुमार जोगदंड उपस्थित होते.