Join us

Success Story : नोकरीचा नाद सोडला अन् शेतीची कास धरली; मनोजची यशस्वी आधुनिक शेती

By ऑनलाइन लोकमत | Published: September 02, 2024 12:15 PM

आपल्याकडे आहे त्या शेतीत दररोज उत्पन्न देणारं वाण निवडायचं अन् नोकरदारांच्या पगाराएवढं उत्पन्न काढायचं, असा संकल्प केलेल्या धाराशिव जिल्ह्यातील नायगावच्या मनोज श्रीरंग शितोळे यांनी 'नेट हाऊस' मध्ये तब्बल अर्धा किलो वजनाचं एक वांगं उत्पादित करत भरीत वांग्याची शेती यशस्वी केली आहे.

बालाजी आडसूळ

शिक्षण झालं, नोकरीचा पत्ता नाही. शेती करायचं ठरवलं तर अत्यल्प भूधारक असल्याने मोठा वाव नव्हता. यामुळे आहे त्या शेतीत दररोज उत्पन्न देणारं वाण निवडायचं अन् नोकरदारांच्या पगाराएवढं उत्पन्न काढायचं, असा संकल्प केलेल्या धाराशिव जिल्ह्यातील नायगावच्या मनोज श्रीरंग शितोळे यांनी 'नेट हाऊस' मध्ये तब्बल अर्धा किलो वजनाचं एक वांगं उत्पादित करत भरीत वांग्याची शेती यशस्वी केली आहे.

नायगाव येथील ३८ वर्षीय मनोज श्रीरंग शितोळे यांनी पदवीधर झालं तरी नोकरीचा पत्ता नसल्याने शेतीत झोकून द्यायचे ठरवलं. पण, जमीन जेमतेम अडीच एकर. यातच दररोज ताजे, तेही नोकरदारांच्या पगाराएवढं हाती पडणारं उत्पन्न घ्यायचे, असा त्यांनी संकल्प केला. पारंपरिक शेती व पिकांना बगल देण्याचा निर्णय घेतला.

यानुसार २०१४ मध्ये प्रथम राष्ट्रीय फलोत्पादन अभियानाचा लाभ घेत कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली दीड एकरावर पॉलीहाऊसची उभारणी केली. त्यात जरबेरा लागवड केली. विविध संघर्षांना तोंड देत या शेतीत जम बसवला. हैदराबाद मार्केटला कधी दहा तर कधी चारपाच रूपयांनी जरबेरा  फुलांची विक्री केली. आजही यात त्यांनी सातत्य राखले आहे. वर्षाकाठी यात दहाएक लाखांचे उत्पन्न घेतले जात आहे.

त्यांच्या या प्रयोगशील शेतीला मुरूड येथील कृषी मार्गदर्शक वैजनाथ कणसे, मंडळ कृषी अधिकारी संदीप आडसूळ, कृषी सहाय्यक गवळी यांचेही मार्गदर्शन लाभत आहे. जरबेरा शेतीत ऊन-पावसाळे खाल्ल्याचा अनुभव पदरी असताना मनोज शितोळे यांनी बारटोक या भरीत वांग्याच्या उत्पादनाचा संकल्प तडीस नेला आहे.

अर्धा किलोचे वांगे, दररोज अडीच क्विंटल माल...

मनोज शितोळे यांनी आपल्या उर्वरित एक एकर क्षेत्रात 'नेट हाऊस'ची उभारणी केली. यात त्यांनी मे महिन्यात ३ हजार २०० रोपांची ६ बाय २.५ फूट या आकारात भोद पाडत, ठिबक, मल्चिंग करत लागवड केली. चांगली मेहनत, योग्य मशागत करत जूनमध्ये याचे उत्पादन सुरू झाले. किमान ४०० ते कमाल ६०० ग्रॅम वजनाचे एकेक वांगे उत्पादित केले.

असे आहे नियोजन...

एक दिवसाआड २० मिनिटे पाणी देणे, आठ दिवसांतून एक स्प्रे देणे, एक दिवसाआड खताचा डोस देणे असे नियोजन असून, अतिशय कमी मजूर, पाणी लागते. एक मनुष्य फक्त दोन तासात अडीच क्विंटल मालाचा तोडा करतो, असे मनोज शितोळे यांनी सांगितले.

३५ ते ४० टन उत्पादनाची आशा...

जूनमध्ये पहिला तोडा हाती आला. आजवर एकूण ८ टन माल लातूरला विक्री झाला आहे. यास सर्वसाधारण ३० रूपये दर प्राप्त झाला आहे. पुढे मार्चपर्यंत किमान ३० ते ४० टन उत्पादनाची बेरीज जाईल. दहा लाखांच्या आसपास उत्पन्न हाती येईल, असे शितोळे यांनी सांगितले.

पोखराचा मिळाला मोठा आधार...

कृषी विभागाच्या काही योजना शेतकऱ्यांना कसे उभे करतात याची ही मोठी यशोगाथा आहे. कृषी विभागाच्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी अर्थात पोखरा योजनेने मनोज शितोळे या होतकरू तरुण शेतकऱ्याच्या पॉली व नेट हाऊस उपक्रमाला अनुदान स्वरूपात बळ दिल्यानेच आपण हे प्रयोग यशस्वी करून दाखवले असल्याचे मनोज शितोळे यांनी सांगितले.

हेही वाचा - Success Story : देवधानोऱ्यातील युवकाचा बिझनेस ॲनालिस्ट ते ॲग्रीकल्चर स्पेशालिस्ट कौतुकास्पद प्रवास

टॅग्स :शेती क्षेत्रकृषी योजनाशेतीशेतकरीमराठवाडाउस्मानाबाद