पुणे: जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी-भटकळवाडी येथील अशोक रासकर हे शेतकरी आपल्या शेतात विविध प्रयोग करून चांगले उत्पन्न घेत आहेत. त्यांनी सध्या दुधी भोपळा या वेलवर्गीय पिकाची लागवड केली असून त्यांना यातून २५ टन उत्पादन होणार आहे. भोपळ्याला सध्या २५ ते ३० रूपयांचा दर मिळत आहे. थेट सुपर मार्केट आणि मॉलला विक्री होत असल्यामुळे त्यांना चांगला फायदा होत आहे.
अशोक रासकर यांची भटकळवाडी येथे वडिलोपार्जित शेती आहे. त्यांनी अनेक वर्षे द्राक्षाची शेती केली. द्राक्षाचे उत्पन्न अलीकडच्या काळात कमी झाल्यामुळे त्यांनी द्राक्ष शेती न करण्याचा निर्णय घेतला. पुढे द्राक्ष शेतीसाठी केलेल्या स्ट्रक्चरवर त्यांनी वेलवर्गीय पिके घेण्याचा निर्णय घेतला आणि दुधी भोपळ्याची लागवड केली.
सुरूवातील त्यांनी दुधी भोपळ्याचे बी आणून नर्सरीमध्ये रोपे तयार केली. यासाठी बेडमध्ये शेणखत, गांडूळखत, निंबोळी पेंड, कृषीअमृत ही खते भरून ठिबक आणि मल्चिंग टाकून बेडवर लागवड केली. २१ दिवसांमध्ये रोपे तयार झाल्यानंतर ६ फूट बाय ३ फूट अंतरावर लागवड केली. लागवड केल्यानंतर ४५ ते ५० दिवसांमध्ये माल काढणीसाठी आला आहे. सध्या ६ ते ७ तोडे झाले आहेत.
व्यवस्थापनवेल मोठे झाल्यानंतर त्यांना स्टॉपिंग करणे, वेळेवर वॉटर सोल्यूबल खते सोडणे, रोग येण्याआधीच फवारण्या करणे हे रासकर यांच्या चांगल्या उत्पादनामागचे गमक आहे. त्यांच्या बागेत तणाचा एक ठोंबही दिसत नाही. वेलीची स्टॉपिंग केल्यामुळे फळे मोठे होण्यास मदत होते आणि मालाची उत्पादकता वाढते.
उत्पन्नदोन-अडीच महिन्यात त्यांचे सहा ते सात तोडे झाले असून यातून ५ ते ६ टन माल विक्री झाला आहे. या मालाला ३२ रूपये प्रमाणे ते विक्री करतात. यातून त्यांना २५ टन मालाची अपेक्षा आहे. बाजारभाव सरासरी २५ रूपयांचा जरी पकडला तरी ७ लाख ५० हजार रूपयांचे उत्पादन त्यांना या एका एकरातील दुधी भोपळ्यातून होणार आहे. सर्वसाधारणपणे १ ते दीड लाख रूपयांचा खर्च वगळला तर त्यांना ६ लाखांचा निव्वळ नफा राहणार आहे.