Lokmat Agro >लै भारी > भावनाताईंचा प्रवास आधुनिक शेतीकडून एफपीओच्या उद्योजकतेकडे

भावनाताईंचा प्रवास आधुनिक शेतीकडून एफपीओच्या उद्योजकतेकडे

Success story of Dabhadi woman farmer Bhavana Nikam | भावनाताईंचा प्रवास आधुनिक शेतीकडून एफपीओच्या उद्योजकतेकडे

भावनाताईंचा प्रवास आधुनिक शेतीकडून एफपीओच्या उद्योजकतेकडे

शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत मालेगाव तालुक्यातील दाभाडी येथील भावना निळकंठ निकम या प्रयोगशील शेतकरी महिलेने शेतातील जवळपास सर्वच कामे तसेच त्यासंबंधी व्यवहार लिलया सांभाळून त्या आज शेतकरी ते यशस्वी महिला उद्योजक म्हणून आत्मविश्वासाने शेती क्षेत्रात गगनभरारी घेत आहे.

शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत मालेगाव तालुक्यातील दाभाडी येथील भावना निळकंठ निकम या प्रयोगशील शेतकरी महिलेने शेतातील जवळपास सर्वच कामे तसेच त्यासंबंधी व्यवहार लिलया सांभाळून त्या आज शेतकरी ते यशस्वी महिला उद्योजक म्हणून आत्मविश्वासाने शेती क्षेत्रात गगनभरारी घेत आहे.

शेअर :

Join us
Join usNext

भावना निळकंठ निकम, दाभाडी येथील या एक प्रयोगशील महिला शेतकरी आहेत. या साधारणपणे १२ वर्षापासून शेती व्यवसायात असून त्यांचे शिक्षण एफवायबीए पर्यंत झाले आहे. भावना निकम यांच्याकडे ६ हेक्टर असून वहितीखालील असून त्यात प्रामुख्याने द्राक्ष, डाळींब, टोमॅटो, पॉली हाऊस व शेडनेट मध्ये शिमला मिरची व इतर भाजीपाला पिके घेतली जातात.

त्या अभिमानाने सांगतात की, मी नुसती बांधावरची नव्हे तर ढेकळातील अस्सल शेतकरी आहे. शेतीतील जवळपास सर्वच कामे जसे  निंदणी, फवारणी, ट्रॅक्टरचलीत साधनांचा वापर करणे एवढेच नव्हे तर ट्रॅक्टर चालविणे, बाहेर गावावरुन शेतमजुरांना कामासाठी शेतात आणने यासारखे कामेही मी वेळप्रसंगी करीत असते. शेतातील व घरातील विद्युत जोडणी, पाईपलाईन त्यासंबंधातील दुरुस्ती अशी जुजबी कामे करुन येणाऱ्या अडचणींचे निवारण करीते. तसेच शेतीसंदर्भात सर्व नियोजन करून निर्णय घेण्याची पूर्णत: जबाबदारी  मला कुटूंबाने दिली आहे, असे त्या आवर्जून सांगतात. 

शेततळे आणि अवजारांची जोड

परंपरागत शेतील फाटा देवून आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने शेतीमध्ये अनेक यशस्वी प्रयोग  करीत आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन उत्पादनात वाढीसोबतच खर्चात बचत करण्यावर त्यांनी भर दिला आहे. शेतीसाठी अत्यावश्यक असणाऱ्या पाण्याच्या उपलब्धतेसाठी 1१.२५ कोटी लिटर पाण्याची क्षमता असणारे शेततळे उभारले आहे. मजूरांची समस्या, वेळ व खर्चात बचत व्हावी म्हणून कृषि विभागाच्या मदतीने ट्रॅक्टर व ट्रॅक्टरचलीत अवजारे जसे ब्लोअर, रोटाव्हेटर, पल्टी नांगर, कल्टीवेटर इत्यादी कृषि यांत्रिकीकरणाची शेतीला जोड दिली आहे.

एकात्मिक पीक व्यवस्थापन

एकात्मिक पीक व्यवस्थापनाचा पुरेपुर अवलंब केला जातो. पिकांवर निव्वळ रासायनिक किटक नाशकांची फवारणी न करता एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा अवलंब करुन ट्रायकोकार्ड, फवारणीसाठी निंबोळी अर्क, दशपर्णाकाचा वापर करतात. त्याचबरोबर फेरोमन ट्रॅप्स, पक्षी थांबे यांचाही वापर त्या करत आहेत. रासायनिक खतांच्या अति वापराने शेतजमीन व पर्यावरण यांच्यावर विपरीत परिणाम होत असल्याने खर्चात बचत व्हावी व पीक उत्पादन गुणवत्ता वाढावी यासाठी सेंद्रीय खतांचा जसे कंपोस्ट खत, गांडुळखत, हिरवळीचे खत, बायोगॅस स्लरीचा वापर करुन जमीनीची सुपीकता वाढवीत व टिकवित आहे.  बाजाराभावाचा कल, जमिनीचा स्तर व पीक फेरपालट यांचा विचार करुन पिक घेतली जात आहेत.

शेतीला जोडधंद्याची मदत

शेतीला जोडधंदा म्हणून १२ हजार पक्षांचे कुक्कुट पालन शेड उभारुन व्यवसाय सुरु केला आहे. पॉली हॉऊसची उभारणी ०.१२ हेक्टर क्षेत्रात करुन त्यात ढोबळी मिरचीची लागवड केली असून त्याची विक्री वाशी, नवी मुंबई येथील मार्केटमध्ये होते. शेतातील राहत्या घरापासुन १० कि. मी. अंतरावरील जिरायत क्षेत्राची सपाटीकरण करुन त्यात १ हेक्टर क्षेत्रावर भव्य शेडनेटची उभारणी केली असून त्यात फॉगर्स व ठिंबक सिंचनाद्वारे संरक्षित पाणी देण्याची व्यवस्था व पिकांसाठी अनुकूल वातावरण निर्माण करुन दर्जेदार व चांगल्या गुणत्तेचा भाजीपाला पिकांचे उत्कृष्ट उत्पन्न घेतले. १हेक्टर क्षेत्रावर द्राक्षाच्या थॉमसन या वाणाची लागवड करुन त्यासाठी ठिबकद्वारे Ferti-irrigation ची सुविधा देऊन निर्यातक्षम चांगल्या गुणवत्तेचे उत्पादन घेवून व्यापाऱ्यांमार्फत निर्यात केली.

भावना निकम यांनी राष्ट्रीय फलोत्पादन विकास कार्यक्रमांतर्गत संरक्षित पाण्यासाठी  शेततळयाचा लाभ घेतला आहे. डॉ. शामाप्रसाद मुखर्जी रुरबन योजनेंतर्गत शेडनेट व पॉलीहाऊसचा लाभ घेवून पिकांसाठी अनुकूल वातावरण निर्मिती करुन चांगल्या दर्जेदार व गुणवत्तापूर्ण भाजीपाल्याचे पिक घेतले आहे. बायोगॅसचा शेतीसाठी व कुटूंबाच्या स्वयंपाकासाठी इंधन म्हणून वापर केला जात असून सौर कंदील, एल.ई.डी बल्बचा वापर करुन उर्जा बचत केली जात आहे.

कृषिक्रांती महिला फॉर्मर प्रोड्युसर कंपनी

परिसरातील सर्व शेतकऱ्यांना रास्त दरात चांगल्या दर्जाची खते, बियाणे, किटक नाशके उपलब्ध व्हावीत म्हणून तालुक्यातून वेगवेगळया गावांमधील महिलांनी एकत्रित येवून तालुकास्तरावर कृषिक्रांती महिला फॉर्मर प्रोड्युसर कंपनीची स्थापना केली असून आजमितीस त्या कंपनीत 10 संचालक आहेत. या कंपनीच्या अंतर्गत गावपातळीवर राजमाता महिला फॉर्मर प्रोड्युसर कंपनीची दाभाडीत स्थापना केली आहे. या कंपनीत सदस्य नोंदणी सुरु असून अल्प भूधारक व बचत गटातील महिलांनी सदस्यत्व देण्यात येणार आहे. महिलांच्या संघटनासाठी कृष्णा स्वयंसहायता समुह स्थापन करून त्याचे रुपांतर भरारी या ग्रामसंघात केले. ज्यात२०० महिला सदस्य असून महाराष्ट्र शासनाच्या रुरबन योजनेतून महिला गटांना विविध लघु उद्योगांचा लाभ मिळत आहे. महिला शेतकऱ्यांसाठी कृषि विभागाच्या माध्यमातून महिला शेतीशाळा घेवून प्रात्याक्षिकाद्वारे आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात केले जात आहे.

ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ग्रामसेवा

दरवर्षी १५ ऑक्टोंबर रोजी जागतिक शेतकरी महिला दिन साजरा करुन स्तुत्य उपक्रम करणाऱ्या महिलांचा सत्कार व सन्मान केला जातो. त्यात शासकीय योजनांची माहिती प्रचार व प्रसार त्या करत असतात. भावना निकम या दाभाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच असतांना त्यांनी शेतीतील विविध प्रयोगांसाबेतच सामाजिक, आर्थिक उपक्रम गावात राबविले आहेत. त्यांनी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ग्रामसेवा, समाजसेवा करण्याची संधी म्हणून माझी वसुंधरा, वृक्षारोपण,अंधश्रध्दा निर्मुलन, व्यसनमुक्तीसाठी दारुबंदी, हागणदारीमुक्त गाव अभियान, स्वच्छता अभियान असे विविध उपक्रम राबविले. तसेच विधवा व निराधार आदिवासी महिलांसाठी संजय गांधी निराधार योजनेतून मानधन मिळून देण्यासाठी त्यानी विशेष प्रयत्न केले. तसेच लक्ष्मीमुक्ती योजनेंतर्गत मालेगाव तालुक्यातील साकुरी या गावातील महिलांची नावे पुरुषांबरोबर सातबाऱ्यावर लावण्यासाठी गावातील कुटूंब प्रमुखांचे प्रबोधन व मतपरिवर्तन करुन या गावातील काही महिलांची नावे सातबाऱ्यावर लावण्यात आली. आदिवासी वस्तीतील अंगणवाडी डिजिटल करुन विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण केली. महिला सक्षमीकरण करण्यासाठी मोफत ब्युटी पार्लर, शिवणक्लास, होमकुकचे वर्ग चालू केले. भावना निकम यांच्या कार्याची दखल घेत आदर्श महिला शेतकरी म्हणून विविध संघटना व सेवाभावी संस्थानी गौरव देवून पुरस्कृत केले आहे.

शेतकऱ्याला प्रतिष्ठा लाभावी यासाठी

कृषी क्षेत्रात मला काम करतांना विशेष आनंद होत आहे. कृषीक्षेत्राला पर्यायाने शेतकऱ्याला प्रतिष्ठा लाभावी यासाठी मी नेहमीच प्रयत्नशील असते. कृषी विभागाच्या कृषी अभ्यास दौराअंतर्गत वाई, सातारा महाबळेश्वर, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहूरी, कृषी विज्ञान केंद्र बारामती येथे भेट देवून विविध पिकांची पाहणी करुन माहिती घेतली. पॉली हाऊस, मत्स्य शेती इ. ची माहिती घेवून त्याचा नजीकच्या काळात प्रत्यक्षात अवलंब करण्याचा मानस आहे. तसेच जास्तीत जास्त महिलांनी संघटीत होऊन शेतीक्षेत्रात सहभागी घेवून त्यांना आत्मनिर्भर व स्वयंपूर्ण होण्यासाठी महिला शेतकरी संघटना स्थापना करण्याचा मानस असून त्यामाध्यमातून जास्तीत जास्त महिला फॉर्मर प्रोड्युसर कंपन्या तयार व्हाव्यात यासाठी प्रयत्न करणार आहे. महिलांना शेतीक्षेत्रात येण्यासाठी प्रोत्साहन व भक्कम पाठबळ मिळाल्यास जसे एखाद्या यशस्वी पुरुषामागे स्त्री असते, त्याप्रमाणे एखाद्या यशस्वी स्त्रीमागे पुरुषही असला पाहिजे. त्यामुळे अनेक भावना तयार होऊन स्वयंपूर्ण व सक्षम होतील, असे भावना निकम सांगत होत्या. माझे पती व सासुबाई यांच्या सहकार्यामुळेच मी शेतीची धुरा आत्मविश्वासाने सांभाळत आहे. मी या सर्वांची ऋणी व आभारी आहे, असे भावना निकम भरभरुन सांगत असतांना त्यांचे मन आंनदाने भरुन आले होते.

Web Title: Success story of Dabhadi woman farmer Bhavana Nikam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.