दत्ता पाटीलतासगाव : शेतीत काही राहिले नाही, अशी हाकाटी देणाऱ्या शेतकऱ्यांसमोर येळावीच्या सारिका व्हनमाने यांनी नवा आदर्श उभा केला आहे. शेतकऱ्यांचा बेदाणा व्यापाऱ्यांपेक्षा चढ्यादराने खरेदी करून त्यांनी तो स्वतः राज्य व देशभरात विक्री करत यंदा ब्राझीलला त्यांनी बेदाण्याची विक्री केली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या उमेद अभियानाने सारिका यांना उद्योजक बनवले आहे. द्राक्ष पट्टयात बदललेले वातावरण, शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांकडून होणारी फसवणूक, रोगराई व वाढलेला खर्च यामुळे द्राक्ष शेती धोक्यात आली आहे.
द्राक्ष चांगली पिकवली, तरी व्यापारी चांगला दर देईल याची आशा नाही. यामुळे अनेक शेतकरी नुकसान सोसत आहेत. मात्र, तासगाव तालुक्यातील येळावी येथील सारिका सुनील व्हनमाने या शेतकरी महिलेला शासनाच्या उमेद अभियानाची माहिती मिळाली.
ग्रामीण भागात राहात असलेल्या गरजू महिलांना देखील स्वतःचा उद्योग व्यवसाय सुरू करता यावा. स्वतःचा उद्योग सुरू करून पुरुषांच्या बरोबरीने प्रगती करता यावी, महिलांचे उपजिविकेचे स्रोत अधिक बळकट व्हावे. त्यांची गरिबी दूर व्हावी. यासाठी सरकार अभियान राबवत आहे.
सर्व बँकाकडून महिला बचत गटांना कुठलेही तारण न घेता कमी व्याज दरात कर्ज देते. स्वतःची अडीच एकर शेती असलेल्या या शेतकरी महिलेने आपल्या भागात बेदाण्याचे सगळ्यात जास्त उत्पादन होते.
यामुळे उमेदच्या मार्गदर्शनाखाली आपण बेदाण्याची विक्री करायची असे ठरवले. जिजाई स्वयंसहाय्यता बचत गट या नावाने त्यांनी बचत गटाची निर्मिती करून सात वर्षांपूर्वी बेदाणा पॅकिंग करून विक्री करण्यास सुरुवात केली.
यावेळी त्यांना घरातून पत्नी, भाऊ, बहीण यांसह कुटुंबाचे पाठबळ मिळाले. सारिका आता २५० ग्रॅमपासून एक हजार किलोपर्यंत पॅकिंग करून तो माल जम्मू-काश्मीर, ओडिशा, पंजाब, आंध्र प्रदेश, मुंबई, नागपूर असा देशाच्या कानाकोपऱ्यात जातो.
नागपूर येथे झालेल्या उमेद अभियानांतर्गत महिलांच्या मालाच्या प्रदर्शनावेळी त्यांचा बेदाणा नागपूर येथून थेट ब्राझील येथील एका व्यापाऱ्याने खरेदी केला.
सारिका या वर्षाला सहा ते सात टन बेदाणा खरेदी करून त्याची देश-विदेशात विक्री करतात. हे करत असताना, सुरुवातीला अनेक अडचणी आल्या, मात्र त्यावर मात करून त्या आज स्वतः उद्योजक झाल्या आहेत.
व्यापाऱ्यांपेक्षा देतात जादा दरसारिका या गेले सात वर्षे बेदाणा विक्रीचा व्यवसाय करत आहेत. त्या काळा, पिवळा व हिरवा खरेदी करतात. त्या येळावी गावातील शेतकऱ्यांचा बेदाणा खरेदी करतात व व्यापाऱ्यांपेक्षा जास्त दर देऊन खरेदी करतात. यामुळे शेतकऱ्यांमधूनही समाधान व्यक्त होत आहे.