रविंद्र शिऊरकर
आलापूरवाडी, तालुका वैजापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथील शेतकरी भगवान हरिचंद जाधव यांची १० एकर शेती आहे. त्यात पावसाच्या पाण्यावर अवलंबून असणारी पारंपरिक पिके ते घेत, ज्यात कपाशी, ज्वारी, बाजरी, हरभरा, गहू, तर काही प्रमाणात कांदा या पिकांचा समावेश असे. दरम्यान २०१७ मध्ये श्री. भगवान यांना रेशीम शेतीची माहिती मिळाली. त्यावेळेस कुठल्याही सरकारी योजनेतून रेशीम साठी अनुदान किंवा सहकार्य नव्हते हे विशेष. असं असतांना देखील त्यांनी आपल्याकडील जमापुंजी लावून एक एकर क्षेत्रात तुतीची लागवड केली. त्यानंतर जालना येथून अंडीपुंज उपलब्ध करून आपल्या पत्नी शोभाबाई यांच्या समवेत रेशीम उद्योगास सुरुवात केली. एक एकर पासून सुरू झालेली रेशीम शेती आता वाढत आहे. सध्या श्री. भगवान यांनी दोन एकर तुती लागवड केली असून ते वार्षिक ४ बॅच घेतात. रेशीम अळी संगोपनासाठी त्यांनी १००० चौ. मी. चे एक शेड उभारले असून यातून एक बॅचला १.५ ते २ क्विंटल पर्यंत रेशीमकोषचे उत्पादन मिळते. याला जालना येथील रेशीम बाजारात ४०० ते ४५० दर मिळत असून सरासरी एक बॅच मधून ६० ते ७० हजार रुपये उत्पन्न मिळतं.
रेशीममुळे सोन्याचे दिवसशेतकरी कुटुंबातील मुलांना बरेच शेतकरी आज नोकरी कर, व्यवसाय कर म्हणून सांगत आहेत. पण या उलट मी रेशीमशेती करा असे सांगेन. नियोजनबद्ध देखभाल केली, अभ्यास केला आणि काटेकोर निरीक्षण ठेवले तर रेशीम पारंपरिक शेतीला नेहमीच वरचढ असल्याचे भगवान जाधव सांगतात.
गावात रेशीम शेती आलापूरवाडी हे अवघ्या २००० लोकसंख्येचे गाव आहे. गावात ना कुठला दवाखाना ना गावाला कुठली सरकारी वाहतुक सुविधा सर्व गोष्टींसाठी हे गाव शेजारील ५ ते ७ किमीवर वसलेल्या शिऊरवर अवलंबून… मात्र गावातील भगवान यांनी केलेला रेशीम चा प्रयोग बघून गावात जवळपास ७० ते १०० शेतकरी रेशीम शेतीकडे वळाले. कोरोना काळात रेशीमचे बाजारभाव कमालीचे घसरल्याने काही शेतकरी हताश होऊन रेशीम मधून बाहेर पडले, मात्र तरीही आज काही शेतकरी पुन्हा नव्याने या शेतीपूरक व्यवसायाकडे वळाले आहेत.
चॉकी केंद्रांची निर्मिती श्री. भगवान यांनी आपल्या घरातंच १० × ३ फूट अंतराच्या दोन रॅक उभारल्या असून त्याला आर्द्रता स्थिर ठेवण्यासाठी विविध यंत्रं बसवले आहे. यात ते सरकारी ग्रेनेज केंद्र गडहिंग्लज येथून अंडीपुंज मागवताता व त्यांची दोन विविध स्तरांवर देखभाल करत ते अंडीपुंज शेतकऱ्यांना विकतात. ज्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना यासाठी दूर जाण्याची गरज भासत नाही.
माती परीक्षण गरजेचे भगवान जाधव सांगतात की ते नियमित वार्षिक माती परीक्षण करून त्याद्वारे मातीची गरज लक्षात घेऊन ठराविक खते वापरतात, ज्यामुळे खतांचा अवाढव्य खर्च वाचतो. शेतकऱ्यांनी वार्षिक माती परीक्षण केले तर त्यांना त्यांचे जमिनीचे आरोग्य कळेल ज्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होईल व खर्च कमी होईल.