विश्वास साळुंके
रब्बी व खरीप हंगामामध्ये म्हणावी तशी निसर्ग साथ देत नाही, हे पाहून हिंगोली जिल्ह्याच्या पोत्रा (ता. कळमनुरी) येथील दोन शेतकऱ्यांनी पेरूची लागवड केली.
पेरूच्या लागवडीतून जवळपास अडीच ते तीन लाखांचे उत्पन्न काढले. पेरूतून लाभझाल्यामुळे 'पेरू घ्या पेरू, छान छान पेरू' असे शेतकरी म्हणत असून, पेरूची लागवड करा, असे आवाहन करू लागले आहेत.
पोत्रा येथील शेतकरी हिराजी शितळे (सेवानिवृत्त विस्तार अधिकारी) व संतोष शितळे यांनी आपल्या पाच एकर जमिनीमध्ये पारंपरिक शेती पद्धतीला बगल देऊन फळबाग लागवडीचा निर्णय घेतला.
पूर्वी ज्या जमिनीत कापूस, तूर, सोयाबीन, हरभरा अशी कोरडवाहू पिके घेत असताना केलेला खर्च निघेल की नाही याची शाश्वती नव्हती. त्याच जमिनीत हिराजी शितळे यांनी विस्तार अधिकारी पदावरून निवृत्त झाल्यानंतर भावासोबत फळबाग लागवडीचा निर्णय घेतला.
अवघ्या ३० गुंठे जमिनीवर पेरूची लागवड केली व त्यातून २ लाख ६० हजार रुपयांचे उत्पन्न दोघांनी घेतले. यासाठी फळबागेकरिता ठिबकचा वापर अधिक केला. तसेच जैविक कीड नियंत्रणही केले.
तसेच हे सर्व करत असताना फळमाशी रोखण्यासाठी ट्रॅप, फ्रूट फोम नेट व त्यावर कॅरीबॅग यांचा वापर केला. फवारणीसाठी जैविक कीटकनाशक, जसे निंबोळी अर्क, दशपर्णी अर्क तसेच रासायनिक खतांचा वापर टाळून गांडूळ खत, शेण खत, जीवामृत आदी खतांचा वापरही केला.
फळझाडे लागवड करणार
खरीप व रबी हंगामातील पिके नेहमीच घेतली जातात. आता उर्वरित जमिनीवरही फळबाग लागवड आमचा मानस आहे. यासाठी कृषी विभागाकडे भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना व मग्रारोयो फळबाग लागवड योजनेअंतर्गत कृषी सहाय्यक सुरेश कदम यांचे वेळोवेळी मार्गदर्शन घेतले आहे - हिराजी शितळे, शेतकरी, पोत्रा.
खर्च जास्त येत नाही
माझ्या मोठ्या बंधूंच्या मार्गदर्शनाखाली मी फळझाडांची लागवड करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात पेरूला प्रथम प्राधान्य दिले. पेरू हे फळधारणा झाल्यापासून एक ते दीड महिन्यात संपणारे पीक असून, खर्चही जास्त येत नाही. इतर शेतकऱ्यांनी कृषी सल्ल्यानुसार शेती केल्यास लाभ होतो. - संतोष शितळे, शेतकरी, पोत्रा.