Success Story : पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील सिंगापूर येथील अमन इंगळे या तरूणाने बिगर हंगामी काकडी पिकातून चांगले अर्थार्जन केले आहे. केवळ अर्ध्या एकराच्या काकडी लागवडीतून त्यांनी तीन महिन्यात चांगला नफा कमावला आहे. अंजीर आणि सिताफळासाठी प्रसिद्ध असलेल्या परिसरामध्ये वेगवेगळ्या पिकलागवडीचे प्रयोग करून इंगळे कुटुंबीय चांगले आर्थिक उत्पादन घेत आहेत. त्यांच्या शेतात अंजीर, सिताफळ, टोमॅटो, काकडी, सोयाबीन, फुले इत्यादी पिके आहेत.
पुरंदर तालुक्यातील दुष्काळी समजल्या जाणाऱ्या भागातील सिंगापूर गावात इंगळे कुटुंबिय राहतात. समील इंगळे हे मागच्या ३० वर्षांपासून प्रयोगशील शेती करतात. दुष्काळी भागांत त्यांनी पाण्याची सोय करून फळबागा जगवल्या. डाळिंब, अंजीर, सिताफळ या फळबागांमध्ये त्यांनी चांगला जम बसवला आणि २०१६ साली त्यांना महाराष्ट्र शासनाचा कृषीनिष्ठ हा पुरस्कार मिळाला.
वडिलांच्या प्रयोगशीलतेची प्रेरणा घेऊन अमनने पूर्णवेळ शेती करण्याचा निर्णय घेतला आणि शेतामध्ये विविध पिकांची लागवड करण्याचा निर्णय घेतला. अर्धा एकर क्षेत्रावर त्याने जून महिन्यात काकडीची लागवड केली होती. योग्य व्यवस्थापन आणि मेहनतीच्या जोरावर त्यांना चांगले उत्पादन मिळाले आहे.
लागवडकाकडीची लागवड करताना अर्ध्या एकर क्षेत्रावर कोंबडी खत, रासायनिक खते, बेसळ डोस टाकून बेड तयार करून घेतले. त्यावर ठिबक आणि मल्चिंग पेपर टाकून बांबू उभे करून जाळी बांधली. त्यानंतर जून महिन्याच्या सुरूवातील काकडीची लागवड केली.
व्यवस्थापनलागवड केल्यानंतर खतांची आणि फवारणीची वेळ ठरवून घेतली. वेळेत फवारण्या केल्यामुळे रोगांवर नियंत्रण राहिले. त्याचबरोबर बुरशीनाशक आणि कीटकनाशकाची वेळेवर फवारण्या केल्या. सर्व खते ठिबकद्वारे दिल्यामुळे खर्च आणि वेळ वाचला.
उत्पादनलागवडीनंतर ४० व्या दिवशी काकडीचा पहिला तोडा झाला. त्यानंतर पुढील दीड महिना काकडीची तोडणी चालते. आत्तापर्यंत ५०० कॅरेट माल निघाला असून अजून २०० कॅरेट माल निघण्याची शक्यता आहे. सध्या बाजारातील सरासरी दराचा विचार केला तर ४०० रूपये कॅरेटप्रमाणे दर मिळाला आहे. सरासरी ७०० कॅरेटचे २ लाख ८० हजार रूपयांचे उत्पन्न होते. तर यातून ८० हजारांचा खर्च वजा केला तर तीन महिन्याच्या या पिकांमधून इंगळे कुटुंबियांना २ लाखांचे निव्वळ नफा होणार आहे.
खर्च कमी, उत्पादन जास्तवेलवर्गीय पिकांसाठी जो सांगाडा उभा केला आहे त्यावर ते जास्तीत जास्त पिके घेण्याचा प्रयत्न अमनचा असतो. काकडी संपल्यानंतर त्याच बेडवर आणि त्याच जाळीवर दोडक्याची लागवड केली जाणार आहे. यामुळे दोन पिकांसाठी खर्च कमी होतो आणि त्यातून उत्पादन जास्त मिळते असं अमन सांगतो.