दहीकळंबा येथील शेतकरी भीमाशंकर पुटेवार यांनी आपल्या शेतात दहा एकरांत जवळपास १०० क्विंटल मेडिकल लाल मिरची काढून तीस लाखांचे उत्पन्न काढले. कंधार तालुक्यातील टंचाईग्रस्त गाव म्हणून दहीकळंबा या गावाची ओळख आहे. दुष्काळी गावातही योग्य नियोजन केल्यास लाल मिरची लालेलाल करू शकते हे त्यांनी दाखवून दिले.
दहीकळंबा येथील भीमाशंकर पुटेवार हे ऑटोमोबाइल्सचा व्यवसाय करत ते शेतीही पाहतात. शेती तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी दहा एकर शेतीत किशन जाधव व राम शिंदे यांच्या सहकार्याने मेडिकल मिरची ऑक्टोबर २०२३ मध्ये दोन लाख ३५ हजार रोपांची लागवड केली. चार फुटांच्या अंतरावर बेड मारून ब्लिचिंग अंथरूण एक फुटाच्या अंतरावर मिरचीची लागवड केली. ठिबकद्वा पाणी, खते वेळेवर देण्यात आले. तीन फुटांपर्यंत वाढलेले मिरचीचे डेरेदान झाड अक्षरशः फळांनी लगडून गेले.
अशी केली मिरची पिकाची लागवड
■ भीमाशंकर पुटेवार यांनी १० ऑक्टोबर रोजी दहा एकरांमध्ये चार फुटांच्या अंतरावर बेड मारून एक फुटाच्या अंतरावर दोन लाख ३५ हजार रोपांची मल्चिंगवरवर लागवड केली. ठिबक सिंचन, खतपाणी, मजुरी फवारणीसाठी त्यांना दहा एकरांसाठी आठ लाख रुपये खर्च आला.
■ अवघ्या सहा महिन्यांत मिरचीचे पीक बहरले असून सर्व शेत लालभडक दिसून येत आहे. दहा एकरांमध्ये १०० क्चिटल उत्पन्न होत असून त्यांना तीस लाखांचे उत्पन्न मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.