Join us

Success Story मंगरूळच्या श्रीहरी माळी यांना सतरा गुंठ्यांतील झेंडूच्या विक्रीतून अडीच लाखांचे उत्पन्न

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2024 6:00 PM

कळंब तालुक्यातील मंगरूळ येथील तरुण शेतकरी श्रीहरी रंगनाथ माळी हे झेंडूचे उत्पादन घेताहेत. पुणे, मुंबई, कल्याण, हैदराबाद या बाजारपेठेत मागणीप्रमाणे किंवा बाजारभावाची खात्रीशीर पडताळणी करून झेंडू ते पाठवित असून यातून त्यांना चांगला नफा देखील मिळत आहे.

रामरतन कांबळे

दसरा-दिवाळी असो की लग्नसराई, सकाळी उठल्यानंतर पूजेसाठी असो की स्वागत समारंभासाठी, वाढदिवस असो की फुलदाणी सजविण्यासाठी, घराच्या सजावटीसाठी असो की उधळण्यासाठी, फुलं ही नित्याचीच.

याचाच विचार करून कळंब तालुक्यातील मंगरूळ येथील तरुण शेतकरी श्रीहरी रंगनाथ माळी हे झेंडूचे उत्पादन घेताहेत. खासगी कंपनीतील चांगल्या पदाची नोकरी सोडून ते व्यवसायाकडे वळले असून, यातून ते चांगले उत्पन्नही मिळवीत आहेत. श्रीहरी माळी यांनी पारंपरिक शेतीला बगल देत आधुनिक शेतीची कास धरली.

यासाठी त्यांनी १७ गुंठे क्षेत्रात मध्यम प्रतीच्या जमिनीवर तग धरणारे, कमी कालावधीत व कमी खर्चात आणि वाजवी मेहनतीत येणारे इंदस पितांबरी व्हरायटीच्या झेंडूची एप्रिल महिन्यात लागवड केली. तब्बल एक महिन्यानंतर झेंडू बहरत असताना मे महिन्यात झेंडूला पाण्याच्या आवर्षणाचा फटका बसू नये यासाठी त्यांनी सहा हजार लिटर पाण्याचे टैंकर सात वेळा विकत घेऊन ही बाग जोपासली.

रासायनिक व जैविक खतांच्या मिश्र डोस, तसेच विविध फवारण्यांचे योग्य व्यवस्थापन केले. परिणामी जून महिन्यात झेंडू फुलांचा तोडा चालू होऊन दर दहा दिवसाला चार ते पाच क्विंटल झेंडूचे उत्पादन त्यांना मिळत आहे. सध्या ७० ते ११० रुपयांपर्यंत भाव मिळू लागल्याने माळी यांना या उत्पादनातून अडीच लाखांपर्यंत उत्पन्न मिळाले. पुणे, मुंबई, कल्याण, हैदराबाद या बाजारपेठेत मागणीप्रमाणे किंवा बाजारभावाची खात्रीशीर पडताळणी करून झेंडू ते पाठवित आहेत.

शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकांवर अवलंबून न राहता आधुनिक पद्धतीने कमी पाण्यावर येणाऱ्या पिकांचे उत्पादन घ्यावे. शेती हा अत्यंत चांगला व्यवसाय असून, त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. - श्रीहरी रंगनाथ माळी, शेतकरी.

हेही वाचा - मराठवाड्याच्या पैठण तालुक्यातील विजयराव; आषाढात कमवत आहे 'या' शेतीतून महिना लाख रुपये 

टॅग्स :शेतकरीफुलंशेतीबाजारमराठवाडाशेती क्षेत्र