के. एम. कवडे
हिमायतनगर येथील युवा शेतकरी धनंजय गोविंद तुप्तेवार यांनी आपल्या परिश्रमातून शेततळ्याच्या पाण्यावर १७ एकरांमध्ये ड्रॅगन फळाची लागवड करून शेती फुलवली आहे.
पारंपरिक शेतीतून मिळणारे उत्पन्न आणि लागणारा खर्च याचा वर्षाअंती हिशेब काढला तर शेतकऱ्यांच्या हातात काहीच शिल्लक राहत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांपुढे कर्जाचा डोंगर उभा होऊन त्यातून सावरताना नाकीनऊ येतात. अशी परिस्थिती बहुतांश शेतकऱ्यांची आहे.
तुप्तेवार यांनी युट्यूबवरून ड्रॅगन फ्रुट शेतीची माहिती घेतली आणि काही तज्ज्ञांकडून मार्गदर्शन घेऊन ड्रॅगन शेती करण्याचा निश्चय केला, २०१७ मध्ये सुरुवातीला पाच एकरांमध्ये लागवड केली. त्यात ते यशस्वी झाले.
त्यानंतर सेंद्रिय पद्धतीने पुन्हा १३ एकरांमध्ये विदेशी 'ड्रॅगन फ्रूट'ची लागवड केली. पुन्हा क्षेत्र वाढवून एकूण २० एकरच्या जवळपास शेती केली. कमी पाण्यावर येणारे ड्रॅगन फळ आहे.
या पिकाला कमी पाणी लागत असल्याने ड्रीप इरिगेशनचा वापर करावा लागतो. लागवड एकदाच करावी लागते. ड्रॅगन फ्रूटची विक्री विविध जिल्ह्यांमधील बाजार समित्या तसेच मुंबई, पुणे, हैदराबाद आणि बंगळूरू मध्ये विक्री केली जाते.
दोन शेततळी मिळाली
कृषी विभागाकडून दोन शेततळी मिळाली आहेत. यात पाणी साठवण क्षमता दोन कोटी ३० लाख लिटर साठवले जाते. पैनगंगा नदीपासून पाइपलाइन करून पाणी शेततळ्यात साठवले जाते.
एकदा लागवडीनंतर तब्बल २५ ते ३५ वर्षे फळ देणारे पीक
ड्रॅगन पीक जोमात आले असून, फळाने लगडून गेले आहे. त्यामुळे भरघोस उत्पादन होण्याचे संकेत आहेत. सध्या फळाला मोठी मागणी आहे. तीन वर्षांपासून मुंबई, बंगळूरचे व्यापारी थेट शेतातूनच फळे घेऊन जातात. तेथून ते विदेशात व अन्य राज्यात पाठवतात.