नितीन कांबळे
कडा : अनेक वर्ष बटईने दिलेल्या शेतात उत्पन्न कमी येऊ लागल्याने स्वतः च शेतीकडे लक्ष दिल्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे आता नोकरी बरोबरच शेतात गोदावरी तुरीची लागवड करून मेहनत, जिद्द व चिकाटीच्या जोरावर कुटुंबातील सदस्याच्या मदतीने 'खर्च हजारात अन् उत्पन्न लाखात' मिळवत झक्कास शेती केलीय.
आष्टी तालुक्यातील तवलवाडी येथील शेतकरी राजेंद्र अशोक धोंडे यांच्याकडे वडिलोपार्जित ७ एकर शेती आहे. वडिल अशोक धोंडे हे शासकीय नोकरीत करत असल्यामुळे तसेच आमचे शिक्षण सुरू होते. त्यामुळे शेतीकडे लक्ष देता आले नाही. त्याच कारणाने ही शेती बटईनी दिली होती. पण वर्षानुवर्ष शेतीतून उत्पन्न कमी येऊ लागल्याने स्वतः च शेतीत लक्ष घालण्याचा निर्णय राजेंद्र यांनी घेतला.
आष्टी कृषी कार्यालयात सहायक तंत्रज्ञान व्यवस्थापक म्हणून नोकरी करणारे राजेंद्र धोंडे यांनी शेती करण्याचा निर्णय घेतला आणि जुलै महिन्यात अडीच एकर क्षेत्रात गोदावरी जातीच्या तुरीची लागवड केली. मेहनत, जिद्द व चिकाटी आणि कुटुंबातील सदस्यांच्या मदतीने तुरीच्या शेंगाने झाडे लगडली.
शेंडे खुडल्याने उत्पन्न वाढले
झाडांची शेंडे खुडल्याने जवळपास ४० टक्के उत्पन्न वाढले. आणि आता अडीच एकरात खर्च २५ हजार रूपये झाला तर २ लाख उत्पन्न हाती येणे अपेक्षित आहे.
यांचे मार्गदर्शन ठरले मोलाचे
तत्कालीन तालुका कृषी अधिकारी राजेंद्र सुपेकर यांची तुरीचे उत्पादन वाढीसाठी शेंडे खुडणे ही संकल्पना होती. त्याच बरोबर तालुका कृषी अधिकारी गोरख तरटे व कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे देखील वेळोवेळी मार्गदर्शन मिळत गेल्याने या शेतीसाठी त्याचे मार्गदर्शन मोलाचे ठरले.
स्वतः हून लक्ष घातल्यास शेती उत्तम
आधुनिक तंत्रज्ञान अवगत झाले आहे. तरूणांनी मोबाईलमध्ये वेळ देताना शेतीविषयक माहिती घेऊन तेवढा वेळ स्वतः हून दिल्याशिवाय
शेतीसारखा पैसा कुठेच नाही. त्यामुळे आजच्या तरूणानी शेतीकडे वळावे. व स्वतः हून लक्ष दिल्यास शेती उत्तम असल्याचे शेतकरी राजेंद्र धोंडे यांनी 'लोकमत ऍग्रो' ला सांगितले.
तालुक्यात अनेक शेतकरी प्रयोगशिल शेती करत आहेत. यातुन मोठ्या प्रमाणावर आर्थिक उन्नती होत असून यासाठी कृषी विभागाकडून वेळोवेळी मार्गदर्शन केले जाते. फळबाग असो किंवा इतर नवीन शेती याकडे सध्या तरूणाईचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे तालुका कृषक अधिकारी गोरख तरटे यांनी 'लोकमत ऍग्रो' ला सांगितले.